नसरापूर, ता. ३ : येथे एका फळविक्रेत्या महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. दुकानात येऊन अश्लील नजरेने पाहणे, हात पकडणे, विनयभंग करणे, शिवीगाळ व धमकी देण्याच्या आरोपावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शरद रामचंद्र गोडसे (वय ५०, रा. कात्रज जैन मंदिर जवळ, पुणे) यास अटक केली आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडसे हा १ जुलै रोजी पीडितेच्या फळ दुकानावर येऊन अश्लील हावभाव करत हसत पाहू लागला. महिलेने त्याला झटकले असता तो तेथून निघून गेला. मात्र, काही वेळाने त्याने आपल्या दुचाकीवर (क्र. एमएच १२ केएस ३३५२ येऊन, ‘तुम्हाला मी घरी सोडू का? चहा पिण्यासाठी माझ्यासोबत याल का?’ असे विचारले. महिलेने त्याच्या वागणुकीविषयी मुलांना सांगून तक्रार केल्यानंतर तो निघून गेला. यानंतर, दुपारी महिला घराकडे पायी चालली असताना आरोपीने रस्त्यात दुचाकीवरून अडवले. तिला गाडीत बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत तिचा हात धरला आणि नकार दिल्यावर शिवीगाळ व दमदाटी केली. महिलेने आरडाओरड केली असता आरोपी पळून गेला.
या घटनेची माहिती महिलेच्या मुलाला मिळाल्यावर त्याने इतर नागरिकांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला व त्याला पकडून राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. तक्रारदार महिलेच्या जबाबात, गोडसेने यापूर्वीही गावातील इतर दोन महिलांना अशाच प्रकारे त्रास दिल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी आरोपी गोडसे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.