पुणे, ता.२५ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वाकड येथील इफेंन्ट जिसस स्कूलने मंगळवारी (ता.२५) गतविजेत्या फुलगावच्या लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल संघाला पराभवाचा धक्का देताना विजेतेपद पटकाविले. स्टीफन कुमार हा विजयाचा शिल्पकार ठरला. वडगावचा हेलिओस स्कूलचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर हे सामने खेळविण्यात आले. भारती विद्यापीठाचे ए.के.डी.एस. अनिल राकाटे यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘इफेंन्ट जिसस’ने लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचा १-० असा पराभव केला. या सामन्यात ‘इफेंन्ट’ आणि ‘लोकसेवा’ संघांत मोठी चुरस पाहायला मिळाली.
सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दोन्ही संघांनी प्रभावी आक्रमणे, प्रतिआक्रमणे आणि पासिंगचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात दोन्ही संघांतील आघाडीच्या (फॉरवर्ड) खेळाडूंनी गोलसाठी अनेक प्रयत्न केले. परंतु दोन्ही संघांतील बचाव फळी आणि गोलरक्षकांनी त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. मात्र, शेवटच्या मिनिटाला ‘इफेंन्ट जिसस’ला मिळालेल्या ‘फ्री-कीक’वर स्टीफन कुमार याने गोल करुन संपूर्ण मैदान दणाणून सोडले. स्टीफनच्या याच गोलाने गतविजेता ‘लोकसेवा’ संघाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य फेरीचा सामना इफेंन्ट जिसस आणि हडपसरच्या बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगला. त्यामध्ये पूर्वार्धात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले. मात्र, उत्तरार्धात इफेंन्ट जिससच्या चैतन्य पांगुळ याने एक गोल केला. यानंतर लगेच स्टीफन कुमार याने सलग दोन करत सामना एकतर्फी केला. इफेंन्ट जीससने ‘बिल्लाबोंग’ला ३ -० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीत ‘लोकसेवा’ने ‘हेलिओस’ वर २-० असा विजय मिळविला. लोकसेवाच्या होंकप वलीम आणि मायाका तान्खा याने प्रत्येकी एक गोल केले. स्पर्धेत नवीन हिरेकेरुर, करण अंगिवाल, प्रतीक आवळे, सूरज मसीलान यांनी पंच म्हणून काम पाहिले.
‘हेलिओस’ तिसऱ्या स्थानी
तिसऱ्या क्रमांकासाठी वडगावच्या ‘हेलिओस’ आणि ‘बिल्लाबोंग’ मध्ये सामना झाला. यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. परंतु दोन्ही संघांना गोल करता आला नाही. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये हेलिओस स्कूलने बिल्लाबोंग स्कूलचा ३-१ असा पराभव करत तिसरा क्रमांक प्राप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.