पुणे

खेडमधील राजकीय दिग्गजांचा हिरमोड

CD

राजगुरुनगर, ता. १३ : खेड पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय दिग्गजांचा हिरमोड झाला असून, राजकीय वर्तुळात ‘खुशी कम, जादा गम’ अशी भावना पसरली आहे.
खेड तालुका पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले असल्याने अनेकांच्या आकांक्षांवर आधीच पाणी फिरले होते. आज गणनिहाय आरक्षण जाहीर झाल्यावर या तगड्या इच्छुकांच्या जागांवर वेगवेगळी आरक्षणे पडल्याने त्यांची निराशेची भावना अधिकच गडद झाली. ज्याठिकाणी महिला आरक्षण पडलेले आहे, त्याठिकाणी कुटुंबातील महिलेला उभे करण्याचा पर्याय काहीजणांकडे शिल्लक आहे. खेड पंचायत समितीच्या १६ जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी १, अनुसूचित जमाती महिलेसाठी १, अनुसूचित जातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी २ आणि सर्वसाधारण महिलांसाठी ४ जागा आरक्षित झाल्या. पंचायत समितीत सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५ जागा शिल्लक राहिल्या आहेत.
आर्थिकदृष्ट्या सधन असलेले महाळुंगे, कुरुळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, काळूस, आंबेठाण हे गण राखीव झाल्याने येथून इच्छुक असलेले हे सक्षम उमेदवार हिरमुसले आहेत. वाडा गण अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव झाला आहे. या गणातून गेल्यावळी माजी सभापती भगवान पोखरकर सदस्य होते. चास गणातून गेल्यावळी माजी सभापती अंकुश राक्षे सदस्य होते. हा गण राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली आहे, पण त्यांच्या पत्नी वसुधा येथून निवडणूक लढवू शकतात. पिंपळगावतर्फे खेड महिला राखीव झाल्याने पिंपळगाव, दावडी, कन्हेरसर या मोठ्या गावांतील कार्यकर्त्यांची संधी हुकली आहे.
काळूस गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने माजी उपसभापती ज्योती अरगडे यांची संधी हुकली आहे. महाळुंगे गण महिला राखीव झाल्याने माजी उपसभापती अमोल पवार यांची संधी हुकली आहे. नाणेकरवाडी गण अनुसूचित जातीच्या महिलेकरिता राखीव झाल्याने माजी उपसभापती वैशाली जाधव यांची संधी हुकली आहे. या सर्वांमध्ये माजी सभापती अरुण चौधरी नशीबवान ठरले असून, या वेळीही त्यांचा मतदारसंघ खुला राहिला आहे.
खेड पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले असल्याने चास, पिंपळगावतर्फे खेड, पाईट, आंबेठाण, महाळुंगे, कुरुळी, नाणेकरवाडी, वाडा या गणांतून निवडून येणाऱ्या महिला सदस्याला संधी आहे. त्यामुळे या गणांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. तसेच जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने तेथील इच्छुक खुल्या पंचायत समिती गणांत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

नवीन समीकरणांची नांदी
खेड पंचायत समिती सन २०१७ मध्ये शिवसेनेने काबीज केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दिलीप मोहिते पाटील आमदार झाले. त्यांनी २०२१ मध्ये शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पंचायत समितीवर आणली. मात्र हे सत्तांतर होताना मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या. यावेळी राज्यपातळीवर पक्षफुटी झालेली असल्याने त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. माजी आमदार मोहिते आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यामध्ये निवडणुकीनंतरही संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पंचायत समितीवरील सत्तेसाठी दोघेही ताकद लावतील आणि जबरदस्त रणधुमाळी खेड तालुक्यात पाहावयास मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती होऊ शकते, पण त्यांच्यात शिवसेना सामील होण्याची शक्यता कमी आहे. कारण, शिवसेनेतील नेते आणि माजी आमदार मोहिते यांच्यातील राजकीय वैराची धार अद्यापही बोथट झालेली नाही. तुलनेने शिवसेनेला महाआघाडीतील तिन्ही पक्ष जवळचे आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध इतर, अशी लढत तालुक्यात अपेक्षित आहे.

गणनिहाय आरक्षण : वाडा : अनुसूचित जमाती- स्त्री, वाशेरे : अनुसूचित जमाती, कडूस : सर्वसाधारण, चास : सर्वसाधारण स्त्री,
वाफगाव : सर्वसाधारण, रेटवडी : सर्वसाधारण, पिंपळगावतर्फे खेड : सर्वसाधारण-स्त्री, मरकळ : सर्वसाधारण, मेदनकरवाडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग, काळूस : नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, आंबेठाण : सर्वसाधारण स्त्री,
महाळुंगे : सर्वसाधारण स्त्री, नाणेकरवाडी : अनुसूचित जाती स्त्री, कुरूळी : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, आळंदी ग्रामीण : सर्वसाधारण.

या माजी सदस्यांची हुकली संधी : अंकुश राक्षे, भगवान पोखरकर, अमोल पवार, चांगदेव शिवेकर, ज्योती अरगडे, वैशाली जाधव, मंदा शिंदे, नंदा सुकाळे, सुनीता सांडभोर, अमर कांबळे, सुभद्रा शिंदे.
या माजी सदस्यांना संधी : अरुण चौधरी, वैशाली गव्हाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT