सोमेश्वरनगर, ता. १२ः लोणंद आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ४०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बाजारात आणलेला कांदा मातीमोल दराने जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारच्या धोरणांच्या धरसोडीने कांदा उत्पादकांना स्थैर्य लाभलेले नाही. गतवर्षी रब्बी कांद्याला निदान डिसेंबर, जानेवारीत तरी बरे दर मिळाले होते. चालू वर्षी जानेवारीपासूनच दर कोसळू लागले आहेत. त्यामुळे काही दिवसांत फुकट कांदा देण्याची किंवा रानातच गाडून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ येणार आहे. शुक्रवारी पुणे व सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या लोणंद समितीत अवघा ४०० ते १४०० रुपये तर पुणे बाजार समितीतही ५०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. म्हणजेच सरासरी प्रतिक्विंटल १००० ते ११०० रुपये असे नीचांकी दर आहेत. ३१ डिसेंबरला हाच सरासरी दर १४०० रुपये प्रतिक्विंटल होता. कांदा हे जिरायती शेतकऱ्याचे हक्काचे पीक आहे. मशागत, लागवड, खते, औषधे, काढणी यासाठी त्याला एकरी सत्तर हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. कांदा भरण्यासाठीच दहा रुपयांना पिशवी मिळते आणि पुण्यापर्यंत पाठवायला पिशवीमागे ५० ते ६० रुपये खर्च येतो; मात्र आताच्या दरात भांडवलही निघणार नाही. दरम्यान, भारताच्या कांद्याला बांगलादेश आणि आखाती देशांतून मोठी मागणी असायची; परंतु अलीकडच्या काळात परराष्ट्र संबंधांत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे होणारी निर्यात ठप्प झाली आहे. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातून कांद्याची आवक जास्त आहे आणि निर्यात मंदगतीने सुरू आहे.
आधी पावसाशी संघर्ष करत रोपे कशीतरी जगविली. लागवडीनंतर अनेक रोगांचे आक्रमण झाले. आता कष्टाने पीक पदरात पडले तर मला हजार-बाराशे इतकाच भाव मिळाला. सरकारने किमान २५ रुपये दर द्यावा.
- भगवान पिंगळे, शेतकरी
बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. एप्रिलअखेरपर्यंत आवक सुरू राहील अशी शक्यता आहे.’’
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी आवक आहे. मात्र कांदा निर्यात मंदावली आहे. सरकारकडून खरेदीचे उपायही होऊन गेले आहेत. निर्यातीला गती आली तरच दर वाढतील.
-बिपिन शहा, निर्यातदार
पुणे बाजार समितीतील दर (प्रतिक्विंटल)
ता. किमान ते कमाल सरासरी
१२ फेब्रु. ५०० ते १५०० १०००
३० जाने. ५०० ते १८०० ११५०
२० जाने. ५०० ते २००० १२५०
४ जाने. ५०० ते २२०० १३५०
३१ डिसें. ६०० ते २२०० १४००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.