थेऊर, ता. ८ : जूनमध्ये शाळा सुरू होऊन देखील अद्याप प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटला नसल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षक बदल्यांबाबत संभ्रमावस्थेत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात संवर्ग एक ते तीन या संवर्गातील सर्व शिक्षकांच्या बदली प्रक्रिया पार पडली आहे. परंतु संवर्ग चार मधील शिक्षकांना बदल्यांसाठी पोर्टलवर अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात संवर्ग चार मधील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बदलीसाठी असलेले पोर्टल लवकर सुरू होत नाही. पोर्टलवर माहिती भरण्यासाठी ८ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत होती. बहुसंख्य शिक्षकांना आपले बदली फॉर्म पोर्टलवर भरताना अडचणी येत आहेत.
यावर तोडगा म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून आता १० तारखेपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली. परंतु पोर्टल व्यवस्थित चालले नाही तर ही मुदत पण पुरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पोर्टल सुरू करण्यासाठी ओटीपी उशिरा येतोय, त्यामुळे पोर्टल सुरू होत नाही, पोर्टल सुरू झाले तर त्यामध्ये तालुके लवकर दिसत नाहीत, तालुके दिसले तर गाव आणि शाळा दिसत नाहीत अशा अनेक अडचणींमुळे माहिती लवकर भरली जात नाही. माहिती भरली गेली तर माहिती जमा होत नाही किंवा अचानक लॉग आउट होऊन दिलेली माहिती गायब होते. या अशा प्रकारच्या अडचणी पुणे जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात सतावत आहेत. त्यामुळे बदली पोर्टलवर माहिती भरण्यासाठी विलंब होतोय वा भरलीच जात नाही. जर बदली पोर्टलवर माहिती भरून सबमिट झाली नाही तर अनेक शिक्षक विस्थापित होऊन, पुढे अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता जास्त असल्याने, शिक्षकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेने सॉफ्टवेअर अद्ययावत करावे व संवर्ग चारसाठी मुदत वाढवून द्यावी, अशा मागणीने जोर धरला आहे, मात्र शिक्षक आमचे नाव घेवू नका असे बोलत आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होऊन देखील अद्याप प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटला नसल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये बदली पोर्टलबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. सॉफ्टवेअर कंपनी विषयी नाराजी निर्माण झाली आहे. बदली संदर्भात प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने व्यक्त केली आहे.
पोर्टल चालत नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही पोर्टल सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडे याबाबत तक्रार केली आहे.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.