पुणे, ता. १८ : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) आणि वैज्ञानिक तसेच औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) व केंद्रीय खाद्य प्रौद्योगिक अनुसंधान संस्थान, म्हैसूर (सीएफटीआरआय) यांच्या वतीने पुण्यात ‘सीएसआयआर-सीएफटीआरआय अन्नप्रक्रिया उद्योग परिषदे’चे आयोजन केले होते. सुमारे २५० हून अधिक उद्योजकांचा सहभाग असणारी ही परिषद भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात नावीन्य, भागीदारी आणि दीर्घकालीन सहकार्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण होती.
या परिषदेला ‘सीएफटीआरआय’च्या संचालिका डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग, सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे, ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबाने, ‘एमसीसीआयए’च्या अन्नप्रक्रिया समितीचे अध्यक्ष आनंद चोरडिया उपस्थित होते. याप्रसंगी एमसीसीआयए आणि सीएफटीआरआय यांच्यात तांत्रिक सहकार्य, क्षमता वाढ आणि संयुक्त संशोधन उपक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. ‘‘हा करार उद्योगांसाठी उपयुक्त अशा व्यावसायिक तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना देईल,’’ असा विश्वास चोरडिया यांनी व्यक्त केला.
डॉ. सिंग यांनी संस्थेच्या व्यापक क्षमतांचे प्रदर्शन करताना परवान्यासाठी उपलब्ध असलेल्या संस्थेच्या ४०० हून अधिक तंत्रज्ञानांची माहिती दिली. ‘‘यापैकी बहुतांश तंत्रज्ञान हे परवडणारे, शाश्वत आणि भारतीय बाजारपेठेच्या गरजांशी सुसंगत आहेत. ज्यामुळे ते अत्यंत प्रभावी ठरते,’’ असे त्यांनी सांगितले.
संशयाच्या धुक्यातून भारतीय दूध उद्योगाला बाहेर काढण्यासाठी १९६० पासून भारतीय दूध उद्योगासाठी तयार केल्या जाणाऱ्या दूध पावडर प्रक्रियेचा विकास कसा झाला, याची माहिती डॉ. मांडे यांनी दिली. ‘‘नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी संवाद आणि सहकार्य आवश्यक आहे,’’ असे गिरबाने यांनी व्यक्त केले. अन्न सुरक्षा व गुणवत्ता नियम, मिलेट संशोधन व पोषण, साठवण व पॅकेजिंगचे आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छ व शाश्वत उत्पादन प्रक्रिया आदी विषयांवर या परिषदेत चर्चा झाली.
पुणे : अन्नप्रक्रिया उद्योजकांसाठी आयोजित परिषदेत एमसीसीआयए आणि सीएफटीआरआय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी (डावीकडून) डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग, प्रशांत गिरबाने, डॉ. शेखर मांडे आणि आनंद चोरडिया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.