पुणे

पश्‍चिम क्षितीजावर शुक्राचे अर्धप्रकाशित बिंब

CD

सायंकाळी पश्‍चिम क्षितीजावर तेजस्वी शुक्र चमकताना दिसत आहे. गेले पाच महिने तो सूर्यापासून दूर होत क्षितीजावर हळूहळू उंच चढत आहे. या महिन्याच्या चार तारखेला तो सूर्यापासून दूरात दूर अशा ४५.४ अंशावर पोहोचेल. यामुळे तो सूर्यास्तानंतर जवळजवळ साडेतीन तासानंतर मावळताना दिसेल. शुक्र उणे ४.३ तेजस्वितेने चमकत असून दुर्बीणीतून पाहता त्याचे बिंब अर्ध प्रकाशीत रूपात दिसेल.

चंद्राप्रमाणे शुक्राच्या देखील कला दिसतात. शुक्र सूर्याभोवती पृथ्वीच्या आतील कक्षेतून फेरी मारत असतो. यामुळे त्याची पृथ्वीसापेक्ष स्थिती सारखी बदलत असल्याने त्याच्या कला दिसतात. जेव्हा शुक्र सूर्यापलीकडे जातो, तेव्हा त्याचे बिंब काहीसे छोटे व पूर्ण प्रकाशीत दिसते. एका अर्थाने ते पौर्णिमे सारखेच असते. त्यानंतर जेव्हा शुक्र पृथ्वीकडे येऊ लागतो. त्यावेळी त्याच्या बिंबाचा आकार मोठा दिसायला लागतो. मात्र, बिंबाचा प्रकाशीत भाग कमी होऊ लागतो. जेव्हा शुक्र हा सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये येतो. त्यावेळी अमावस्येसारखी स्थिती होऊन शुक्राचा अप्रकाशित भाग आपल्याकडे असतो. ज्यावेळी आपणास शुक्र सूर्यापासून दूरात दूर दिसतो. त्यावेळी त्याचे अर्धप्रकाशित बिंब दिसू लागते. या आठवड्यात ही स्थिती येत असून ४ तारखेला शुक्राचे बिंब अर्धप्रकाशित दिसेल व त्याचा आकार २२ विकलांएवढा होईल. बॉयनॉक्युलर किंवा लहान दुर्बीणीतून देखील शुक्राचे अर्धप्रकाशीत बिंब पाहता येईल.

ग्रह-बुध : गेल्या महिन्याच्या अखेरीस बुध सूर्यापासून दूरात दूर अंतरावर पोहचला होता. या महिन्यात तो पूर्व क्षितीजावर पहाटे साडेचारच्या सुमारास उगवताना दिसेल. तो हळूहळू सूर्याकडे सरकत असल्याने उशीरा उगवत जाईल. असे असले तरी तो तेजस्वी होत असल्याने महिन्याच्या पूर्वार्धात ठळकपणे दिसत राहील. त्यानंतर बुध उशिरा उगवत जाऊन दिसेनासा होईल. चंद्रकोरीच्या खालच्या बाजूस बुध १६ जून रोजी दिसेल. यावेळी त्याची तेजस्विता उणे ०.६ असेल.

शुक्र ः सूर्यास्तानंतर जवळजवळ साडेतीन तास पश्‍चिम क्षितीजावर तेजस्वी शुक्र दिसत राहील. तो जून ४ रोजी सूर्यापासून दूरात दूर अशा ४५.४ अंशावर पोहोचेल. महिन्याच्या प्रारंभी तो मिथून राशीच्या ‘कश व प्लव’ या दोन ठळक ताऱ्यांच्या ओळीत असेल. तेथून तो पुढील तीन दिवसांत कर्क राशीत प्रवेश करेल. त्याचा प्रवास पुष्य नक्षत्राकडे (एम-४४) व तसेच पुढे असलेल्या मंगळाच्या रोखाने होताना दिसेल. शुक्र एम-४४ या तारकागुच्छाच्या उत्तरेकडच्या भागाजवळून सरकताना १३ जून रोजी दिसेल तर महिना अखेरीस मंगळाजवळ दिसेल. यावेळी या दोन ग्रहांमधील अंतर ३.६ अंश असेल. शुक्राचे बिंब महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्ध प्रकाशित दिसेल तर त्याची तेजस्विता उणे ४.३ असेल. चंद्रकोरीजवळ शुक्र २२ जून रोजी दिसेल.

मंगळ ः अंधार पडताच कर्क राशीच्या परीसरात व तेजस्वी शुक्राच्या वरच्या बाजूस मंद तेजाचा व नारिंगी रंगाचा मंगळ दिसेल. तो पुष्य नक्षत्रामध्ये म्हणजे एम-४४ तारकागुच्छात २ जून रोजी दिसेल. द्विनेत्रीमधून पाहता तो पुष्य नक्षत्रातून पूर्वेकडे सरकताना दिसू शकेल. या महिन्यात मंगळाचे बिंब फारच छोटं म्हणजे पाच विकलांचे व १.६ तेजस्वितेचे दिसेल. जून महिन्यात रात्री अकराच्या सुमारास मावळणारा मंगळ महिना अखेरीस तासभर लवकरच मावळेल. चंद्रकोरीच्या जवळ मंगळ २२ जून रोजी दिसेल. या दोघांच्या खालच्या बाजूस तेजस्वी शुक्र दिसत असून महिनाअखेरीस मंगळ व शुक्र एकमेकांपासून अवघे ३.६ अंश अंतरावर दिसतील. याच सुमारास सिंह राशीचा मघा तारा मंगळापासून ६ अंश अंतरावर दिसेल.

गुरू ः पहाटे पूर्व क्षितीजावर तेजस्वी गुरू उगवताना दिसेल. महिन्याच्या प्रारंभी पावणे चार वाजता उगवणारा गुरू लवकर उगवत जात महिना अखेरीस सव्वा दोन वाजता मेषेत असताना उगवेल. त्याची तेजस्विता उणे २.२ असल्याने तो पूर्वेस सहज दिसू शकेल. गुरू व त्याच्या भोवतालच्या चार मोठ्या चंद्राची पिधाने व ग्रहणे पाहण्यासाठी महिना अखेरपर्यंत वाट पहावी कारण त्यावेळी गुरू अंधाऱ्या आकाशात उंचपर्यंत दिसू लागेल. चंद्रकोरीजवळ गुरू १४ जून रोजी दिसेल.

शनी ः दक्षिण पूर्वेस असलेल्या कुंभ राशीत रात्री शनी दिसेल. महिन्याच्या प्रारंभी तो मध्यरात्री एकच्या सुमारास उगवताना दिसेल. तर महिन्याभरात लवकर उगवत जात महिना अखेरीस तो रात्री अकराच्या सुमारास उगवेल. शनीची तेजस्विता ०.८ असल्याने जवळच असलेल्या मीन, मीनास्य व महाश्वच्या ताऱ्यांमध्ये देखील तो सहज ओळखू येईल. शनीचे बिंब १७ विकलांचे दिसत असून त्याची कडी जास्तीत जास्त कललेली (जवळ जवळ ७ अंश) दिसतील. चंद्राजवळ शनी १० जून रोजी दिसेल.

युरेनस-नेपच्यून ः युरेनसची सूर्याबरोबर युती नुकतीच झाल्याने तो या महिन्यात ठळकपणे दिसणार नाही. तो गुरूच्या पूर्वेस सुमारे १६ अंशावर मेष राशीत दिसेल. या राशीच्या डेल्टा ताऱ्याजवळ युरेनस दिसेल. नेपच्यून मीन राशीच्या लॅम्डा ताऱ्याजवळ दिसेल. तो शनीच्या पूर्वेस सुमारे २० अंशावर असेल. नेपच्यूनचे २.३ विकलांचे बिंब ७.८ तेजस्वितेचे दिसेल.

चंद्र-सूर्य ः ज्येष्ठ पौर्णिमा ४ जून रोजी ९.११ वाजता तर अमावस्या १८ जून रोजी सकाळी १०.०५ वाजता होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३, ६४,८६० किलोमीटर) ७ जून रोजी तर पृथ्वीपासून दूर (४, ०५, ३८५ किलोमीटर) २३ जून रोजी असेल. सूर्य २२ जून रोजी ‘विष्टंभ’ स्थानावर पोहोचेल. या दिवशी तो कर्क वृत्तावर असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्तरेस दिसतो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT