पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या शुद्ध पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असून घरगुती वापर आणि व्यावसायिक कारणांसाठी अनधिकृत नळजोड घेतले जात आहेत. बेकरी, हॉटेल्स, आरओ प्लांट, वॉशिंग सेंटर, खासगी टॅंकर व्यावसायिक, बांधकाम प्रकल्प अशा विविध स्वरूपात थेट महापालिकेच्या जलवाहिन्यांवर सर्रास बेकायदेशीरपणे नळजोड घेऊन पाणी वापरले जात आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाकडून कारवाईची भूमिका थंड असल्याचे चित्र आहे.
शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन खडकवासला, भामा आसखेड या धरणांमधून पाणी घेते. दरम्यान, महापालिकेकडून पाण्याचा होणारा वापर, पाण्याची गळती आणि पाण्याचा पुनर्वापर यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महापालिकेकडून १४ टीएमसी पाण्याचा वापर होतो, मात्र आठ टीएमसी पाण्याची गळती होते. हे आठ टीएमसी पाणी नेमके जाते कुठे? असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध घेण्यासाठी विशेष कृती दल (टास्क फोर्स) तयार करून त्यांच्याद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने पाण्याचा नेमका किती वापर होतो, हे निश्चित करण्यासाठी पाणी मीटर बसविण्याचे काम गांभीर्याने करण्यास सुरवात केली आहे. मात्र घरगुती वापरासाठीचे अनधिकृत नळजोड, व्यावसायिक कारणांसाठी अनधिकृत पद्धतीने पाणी घेण्याचे प्रकार सुरू आहेत.
इथे पाणी मुरते!
शहराच्या विविध भागांत रात्री रस्त्याची खोदाई करून आपल्या परिसरातील जलवाहिनीवरून थेट नळजोड घेण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. काही व्यक्ती घरगुती वापरासाठी नळजोड घेत असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र घरगुती वापराच्या नावाखाली व्यावसायिक कारणांसाठी महापालिकेच्या पाण्याचा वापर होतो. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, केटरिंग व्यावसायिक, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव, बेकरी, चिकन-मटणची दुकाने, छोटी-मोठी बांधकामांपासून ते शुद्ध पाणी पुरवठ्याचा दावा करणारे आरओ प्लांट, खासगी टॅंकर व्यावसायिक अशा विविध कारणांसाठी थेट महापालिकेचे पाणी घेतले जात आहे. मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील नऱ्हे, आंबेगाव, वाघोली, धायरी, नांदेड सिटी यासह वेगवेगळ्या भागांत हा प्रकार सुरू आहेत.
अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर कारवाई कधी ?
अनधिकृत नळजोड कोण, कोठून घेतो, यावर देखरेख ठेवण्याची व्यवस्था महापालिकेकडे नाही. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर किंवा कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतरच पुढील कारवाई होते. मात्र अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सक्षम व्यवस्थेचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दंडात्मक किंवा ठोस कारवाई होत नाही. अनेकदा राजकीय व्यक्तींचे नाव सांगून किंवा संबंधित राजकीय व्यक्तींकडूनच अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांना पाठीशी घातले जाते. परिणामी महापालिका प्रशासन ठोस कारवाई करत नाही. कधी दंडाची रक्कम आकारून नळजोड नियमित करण्याचे काम महापालिका करते. बहुतांश अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.
अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांना दंड भरून नळजोड नियमित करण्यास सांगितले जाते. तर, व्यावसायिक कारणांसाठी अनधिकृत नळजोड घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर पाणी पुरवठा विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, महापालिका
अनधिकृत नळजोड कारवाई (जून २०२४ ते जून २०२५)
- महापालिकेने तोडलेले अनधिकृत नळजोड - ९८४
- महापालिकेने नियमित केलेले अनधिकृत नळजोड - १४०
- अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांकडून वसूल केलेला दंड - ६ ते ७ लाख रुपये
आकडे बोलतात
अधिकृत नळजोड - ३ लाख १८ हजार
एकूण मीटर नळजोड - ४०,२१२
व्यापारी नळजोड - १७,३०८
घरगुती नळजोड - १८, १३८
वैद्यकीय कारणांवर आधारित नळजोड - ४७६६ टेरिफ कोड - १०२)
(टेरिफ कोड म्हणजे बिल आकारणी क्रमांक आहे. त्यानुसार संबंधितांना पाणी पुरवठ्यासंबंधीचा दर व किमान आकार ठरवून त्यांच्याकडून शुल्काची आकारणी केली जाते.)
अशी आहे स्थिती
महापालिकेने बसविलेले एकूण पाणी मीटर - २ लाख ६३ हजार
आत्तापर्यंत बसविलेले पाणी मीटर - १ लाख ८५ हजार
उर्वरित पाणी मीटर बसविण्याची संख्या - ७७ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.