पुणे, ता. १ : ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’च्या (आरबीएसके) पथकांकडून शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील (शासकीय व निमशासकीय) शून्य ते १८ वयोगटातील मुला – मुलींची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येते. मात्र, या ‘आरबीएसके’च्या पथकासाठी असलेल्या चारचाकी वाहनांच्या चालकांचा पगार गेल्या वर्षभरापासून कंत्राटदाराने थकवला आहे. त्यामुळे बालकांची आरोग्य तपासणी ठप्प झाली आहे.
मुलांची तपासणी करून, त्यांच्यात आढळणारे जन्मजात व्यंग, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, विकासात्मक विलंब, अपंगत्व आदी बाबींचे वेळेवर निदान करून, त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट ‘आरबीएसके’ कार्यक्रमाचे आहे. त्यामध्ये त्यांना इतर उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज पडली तरी ती मोफत पुरविली जाते. याआधी हजारो बालकांच्या ह्रदयरोग, अस्थिव्यंगोपचार व इतर शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांतून मोफत झालेल्या आहेत. गेल्या १३ वर्षांपासून महाराष्ट्रात हा कार्यक्रम सुरू असून, त्यामध्ये अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळा तर त्यापुढील वर्षातून एक वेळा तपासणी करण्यात येते. एका पथकात एक महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी असतात. पुण्यात अशी ७३ पथके आहेत.
‘आरबीएसके’ या पथकाला शाळांपर्यंत प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहने आहेत. त्यामधून ही पथके गावोगावी किंवा शहरात जाऊन मुलांची तपासणी करून त्यांचे आजार वेळेवर शोधून काढतात. त्यापैकी काही आदिवासी भागातील शाळांमध्ये जातात. पण सध्या ही सेवा बंद असल्यामुळे अनेक मुलांची तपासणी ठप्प झाली आहे. त्यामुळे कित्येक गरजू मुलांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी एंटरप्रायझेस या कंत्राटदाराकडे या वाहनसेवा पुरवठ्याची जबाबदारी आहे.
-------
‘‘ आम्हाला दरमहिना १८ हजारांचे मानधन कंत्राटदाराकडून मिळायला हवे. कंत्राटदाराला शासनाकडून वेळेवर निधी येतो. जर कंत्राटदार आम्हाला वेळीच वेतन देत नसेल तर शासनाकडून त्याचे कंत्राट रद्द का केले जात नाही? आमचे मानधन त्याने इतर ठिकाणी वळविले असल्याची सांगण्यात येत आहे.
– एक चालक, पुणे
..............
‘‘या समस्येबाबत ‘महालक्ष्मी एंटरप्रायझेस कंत्राटदाराला वेळोवेळी नोटिसा दिल्या आहेत. परंतु, त्याच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही. वाहनपुरवठा करण्याचे कंत्राट हे राज्याच्या आरोग्य विभागाकडून झाले असून, त्याची सेवा समाप्त बाबत निर्णय स्थानिक स्तरावर घेता येत नाही.
– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे
............
तालुका – वाहनांची संख्या– बंद असलेली संख्या – सेवा बंद केल्याचा महिना
१. राजगड– १ – १ – नोव्हेंबर २०२४
२. जुन्नर – ४ – ४ – मे २०२५
३. मुळशी – २ – २ – ऑगस्ट २०२५
४. दौंड – ५ – ५ – जुलै २०२५
५. बारामती – ६ – ५ – एप्रिल २०२५
६. पुरंदर – ३ – २ – जुलै २०२५
७. आंबेगाव – ३ – ३ – मे २०२५
८. मावळ – ४ – ४ – ऑगस्ट २०२५
९. हवेली – ५ – १ – सप्टेंबर २०२५
१०. पुणे महापालिका क्षेत्र – १३– २– जून २०२५
११. शिरूर – ५ – ४ – ऑगस्ट २०२५
................................................
एकूण – ५१ – ३३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.