पुणे, ता. २ : विठ्ठलवाडीतील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी तळजाई टेकडीवरील झाडांना दिले जाणार आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकाऱ्यांची महापालिकेसोबत बैठक पार पडली असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
हिरवाईने नटलेल्या टेकड्या पुणे शहराची फुफ्फुसे आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी आक्रमक भूमिका घेतात, तर महापालिका, वनविभागाकडूनही प्रयत्न केले जातात. तळजाई टेकडीवर दररोज शेकडो नागरिक फिरण्यासाठी, व्यायामासाठी जातात. सुमारे २५७ हेक्टर क्षेत्रात वनराई असलेल्या टेकडीवर अनेक प्रकारच्या पक्षी, प्राण्यांचा अधिवास आहे. या वनसंपदेचे जतन करण्यासाठी महापालिकेने विठ्ठलवाडी येथील एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला. यासंदर्भात वनविभागाला पत्र पाठविले होते. या वनक्षेत्रासाठी सध्या महापालिकेकडून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या पाण्याची बचत करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे.
उन्हाळ्यामध्ये टेकडीवरील झाडांसाठी, प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची गरज अधिक भासते. तळजाई टेकडीसह शेजारील पाचगाव पर्वती वनक्षेत्रातील वनीकरणासाठी दररोज किती पाण्याची आवश्यकता आहे, तसेच पाणी कोठे पोचवायचे आहे, याची माहिती सादर करावी, अशी विनंती महापालिकेच्या विद्युत विभागाने वनविभागाला केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाठविलेल्या पत्राला वनविभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. पण आज बुधवारी यासंदर्भात वनविभागाचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यात प्राथमिक बैठक पार पडली आहे.
तळजाईवरील वनसंपदेसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी स्वीकारावे, यासाठीच्या प्रस्तावावर वनविभागाकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिकेला पाणी टेकडीवर पोचविण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे.
- मनीषा शेकटकर,
प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका
असा होणार फायदा
- उन्हाळ्यातही टेकडीवरील हिरवळ कायम राहणार
- वनीकरण मोहिमेत लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन होणार
- उन्हाळा असला तरी प्रक्रिया केलेले सांडपाणी उपलब्ध
- टेकडीवरील जमिनीची धूप रोखता येणार
- पिण्याच्या पाण्याची बचत होणार
- टँकरवर होणारा कोट्यवधीचा खर्च होणार कमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.