पुणे, ता. ८ : विमाननगरमधील एका स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्पा चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
किरण आडे ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय २८, रा. खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आडे हिने स्पा सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी काही मुलींना कामास ठेवले होते. त्यांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. याबाबत विमानतळ पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका १९ वर्षीय तरुणीसह दोन १६ वर्षीय मुली आढळून आल्या. विमानतळ पोलिसांनी स्पा सेंटर चालविणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.