पुणे - मोतीचूर लाडू ते चकली... अनारसे ते करंजी... असा खमंग अन् रुचकर रेडिमेड फराळ पुणेकरांच्या पसंतीस उतरला. बचत गट, घरगुती व्यावसायिक, होलसेल व्यापारी आणि लघु उद्योगांद्वारे तयार केलेल्या रेडिमेड फराळाला यंदा मोठी मागणी होती. दिवाळीत ५० कोटी रुपयांहून अधिक रेडिमेड फराळाची उलाढाल झाली. तर सुमारे ५० टनाहून अधिक फराळ विकला गेल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. विशेष म्हणजे सुमारे ८०० बचत गटांनी तयार केलेल्या रेडिमेड फराळाला मोठी मागणी होती. त्यासाठी बचत गटांनी दोन महिन्यांपासूनच तयारी सुरू केली होती.
मोतीचूर लाडू, चकली, अनारसे, चिरोटे अशा प्रकारच्या फराळाला सर्वाधिक पसंती मिळाली. प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर खास डिझाईन केलेल्या बॉक्समध्ये फराळ पॅक करून देण्यावर व्यावसायिकांनी भर दिला.
रेडिमेड फराळ तयार करण्यात बचत गटांचाही सहभाग मोठा होता. परदेशात सुमारे ५० लाख रुपयांचा ५ टन फराळ विकला गेला असून, कुरिअर कंपन्यांनी त्यासाठी विशेष तयारी केली होती. काही ई-कॉमर्स कंपन्यांनीही ऑनलाइन ऑर्डरद्वारे फराळ विक्री केली.
घरगुती व्यावसायिकांच्या फराळालाही प्रतिसाद
यंदा घरगुती व्यावसायिकांनी तयार केलेल्या मोतीचूर लाडू, करंजी, चकली, चिवडा, अनारसे आणि चिरोटे या फराळाला अधिक मागणी होती. अंदाजे एक कोटी रुपयांचा घरगुती व्यावसायिकांचा रेडिमेड फराळ विकला गेल्याची माहिती किशोर सरपोतदार यांनी दिली. एकूण उलाढालीपैकी रेडिमेड फराळाची २० टक्के उलाढाल ही घरगुती व्यावसायिकामार्फत झाली.
महापालिकेच्या समाज विकास विभागाने पुण्यात सहा ठिकाणी दिवाळी बचत बाजार प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यात ८०० बचत गटांनी सहभाग घेतला. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या फराळालाही चांगला प्रतिसाद मिळाला. काही बचत गटांना प्रदर्शनाद्वारे रेडिमेड फराळाच्या ऑर्डरही मिळाल्या.
- मुकुंदा महाजन, उपसमाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग, पुणे महापालिका
मागील वर्षीपेक्षा यंदा १५ टक्क्यांनी रेडिमेड फराळाची मागणी वाढल्याचे दिसून आले. सुमारे तीन ते पाच किलोचा रेडिमेड फराळ ग्राहकांनी विकत घेतला. बचत गटांसह घरगुती फराळालाही मागणी होती. तर परदेशातील आप्तेष्टांनाही मोठ्या प्रमाणात फराळ पाठविण्यात आला.
- किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन
द पूना मर्चंट्स चेंबर्सकडून पुण्यात १२ ठिकाणी होलसेल भावात फराळ विक्री केंद्र उभारले होते. एक लाख किलो चिवडा आणि एक लाख किलो लाडू विकला गेला. संपूर्ण मिळून दोन लाख किलो फराळ विकला गेला.
- पोपट ओसवाल, अध्यक्ष, द पूना मर्चंट्स चेंबर्स
घरगुती फराळाची विक्री - अंदाजे एक कोटी रुपये
परदेशामधील विक्री - ५० लाख रुपये
यंदाची मागणी - गेल्यावर्षीपेक्षा १५ टक्के जास्त
बचत गटांतील महिलांनी तयार केलेला फराळ यंदा घेतला. त्यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ होते. ते सर्व चविष्ट अन् दर्जेदारही होते.
- दीपा तावरे, ग्राहक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.