aruna dhere
aruna dhere 
संपादकीय

लोभस बंडखोर कवयित्री (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य.

अ खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिकांची सन्मानाने निवड व्हावी आणि स्त्री-साहित्यिकांचा या पदाने सन्मान व्हावा, या मराठी वाचकांच्या दोन्ही इच्छा नुकत्याच पूर्ण झाल्या. साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीऐवजी निवड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिला मान ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना देऊन मराठी साहित्यप्रेमींना आनंदाचा धक्का दिला. कवितेच्या वाटेवरून साहित्यक्षेत्रात उतरलेल्या डॉ. ढेरे यांनी कथालेखन, प्रवासवर्णने, ललितलेखन, संशोधनपर लेखन, संपादने, आस्वादक समीक्षा अशी बहुविध निर्मिती केली आहे. प्राचीन काश्‍मिरी कवी कल्हण यांच्या ‘राजतरंगिणी’ या ऐतिहासिक महाकाव्याचा अनुवाद हे त्यांचे अलीकडचे मोठे काम. त्यांच्या निर्मितीच्या वाटा बहुआयामी, विस्तीर्ण अर्थवत्ता धारण करणाऱ्या आहेत. कोणत्याही प्रकारात त्यांनी लिहिलेले असो, त्यांच्या सर्वच लेखनाचा पिंडधर्म मूलतः कवितेच्या प्रभावाने आकारित झालेला आहे. कुठल्याही जटिल गद्यप्राय आशयाला त्या काव्यात्मतेच्या अतितरल भावनिक पातळीवर अलगद नेऊन ठेवतात. बहुविध प्रकारच्या अभिव्यक्तीनंतरही ‘कवयित्री’ अशीच त्यांची ओळख का करून दिली जाते, याचे उत्तर यात दडलेले आहे. त्यांचे ‘काळोख आणि पाणी’सारखे महाभारतीय कथांचा व लोकपरंपरांचा परस्पर अन्वय लावणारे पुस्तक असो, की ‘कृष्णकिनारा‘सारखे राधा, कुंती, द्रौपदी यांचे भावबंध उलगडणारे पुस्तक असो, ‘महाद्वार‘ किंवा ‘मैत्रेयी’ यांसारख्या लघुकादंबऱ्या असोत, ‘लावण्ययात्रा‘, ‘रूपोत्सव‘, ‘वेगळी माती, वेगळा वास’ हे लेखसंग्रह असोत, या सर्वच लेखनात सापडते ती त्यांच्यातील कवयित्री. कवितेविषयीचे हे विलक्षण ममत्व त्यांच्या सर्व लेखनाला व्यापून टाकताना दिसते.
अरुणाताईंच्या कवितेवर गीतकाव्य परंपरेचा, लोकसाहित्याचा ठसा आहे. भल्या पहाटे थंडीत उठून त्या वासुदेव, पिंगळा यांची गाणी ऐकायला वडील डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याबरोबर जात. कुसुमाग्रज, बोरकरांच्या कविता गात त्यांची दुपार सरायची. मंदिरातील कीर्तने ऐकत रात्र यायची. त्यातून लोकसंस्कृतीचे थेट संस्कार त्यांच्यावर झाले. एकीकडे त्यांच्या लेखनात परंपरा, लोकसाहित्य, पुराणकथा आहेत. त्याच वेळी उत्तर आधुनिकतेशी नाते सांगणारी नवी मिथकेंही आहेत. मिथकांचे आणि धर्माचे अवघड नाते त्यांना पुरते ठाऊक आहे, त्यामुळेच त्या मिथकांविषयी लिहितानाही ना कधी धार्मिक होत, ना अश्रद्ध. उलट या लेखनात बहुतेकदा स्त्रीवादी बंडखोरी दिसते. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याच्या लोभस बंडखोरीचा हा वारसा त्यांनी वडिलांकडूनच घेतला आहे. कवितेपासून सुरुवात करणाऱ्या अरुणाताईंनी सर्व प्रकारचे सर्जनशील साहित्याचे प्रकार हाताळल्यानंतर संशोधनपर गद्य लेखनावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. त्यांच्या सगळ्याच लेखनात निर्मितीचे अनोखेपण असते. अभिजात वाङ्‌मयापासून लोकपरंपरेतील साहित्यापर्यंतचा व्यासंग एखाद्या विषयाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. त्यांच्या लेखणीचा वेग अफाट आहे. लेखनाचा कस उणावू न देता लिहीत राहणे इतके सोपे नाही. संस्कृतीच्या किती तरी व्यक्त-अव्यक्त छटांना उजाळा देताना अरुणाताई स्मरणरंजनात रमून जात नाहीत, तर त्यापलीकडे धर्मरीती, कर्मकांड, अंधश्रद्धा यामुळे येणाऱ्या दुःखभाराचे ओझे साहणारी माणसे समजून घेतात. मूलभूत मानवी क्रिया व्यापारांच्या खेळातले नाट्य आणि समष्टीचा व्यवहार यातील संबंध ठसठशीतपणे मांडतात. त्यांच्या लेखनात, बोलण्यात प्रत्येकाविषयी आस्था आणि कौतुक असते. त्या दुसऱ्यांच्या लेखनाचे सुंदर स्मरण करून देतात. दुसऱ्या लेखकानी त्यांच्या समकालातील लेखनात किती महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, हे समजावून सांगतात. आपल्या आधीच्या, समकालीन आणि उगवत्या पिढीतील साहित्यिकांविषयी उत्सुकता, कौतुक, आस्था असणाऱ्या लेखिकेकडे मराठी साहित्यविश्‍वाचे नेतृत्व येणे, ही त्यामुळेच साहित्यविश्‍वाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.

साहित्य महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करतानाच काही गोष्टींची जाणीवही करून द्यायला हवी. संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील राजकारणाने ही निवडणूक आणि महामंडळ टीकेचे धनी होत होते. या वर्षी अनावधानाने काही गोष्टी घडलेल्या दिसतात. ज्या साहित्यिकाचे नाव सुचवायचे असेल त्याची पूर्वसंमती घेण्यात आली पाहिजे. संमेलनाच्या एकूण व्यवहारावर टीका करणारे भालचंद्र नेमाडे यांचे नाव वृत्तपत्रातून चर्चेत आणण्यात आले आणि महामंडळाच्या बैठकीत मात्र यावर चर्चा टाळण्यात आली, हे योग्य झाले नाही. या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकाचे नाव चर्चा होऊन टाळले गेले असेल, तर त्यामागची कारणे जाहीर करायला हवीत. तसेच, जी नावे सुचवली जातील, ती गोपनीय ठेवणे महामंडळाकडून अपेक्षित आहे. म्हणजे एकाचा सन्मान होताना इतरांचा अवमान होणार नाही. पुढच्या काळात ही पथ्ये महामंडळ पाळेल, अशी अपेक्षा; आणि मराठी साहित्यव्यवहारात नवे चैतन्य यावे यादृष्टीने साहित्यआस्थेचे उपक्रम राबविण्यासाठी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT