संपादकीय

हिशेब मराठीच्या आयुष्याचा

डॉ. केशव देशमुख

‘‘जगात आज मराठी भाषा दहाव्या क्रमांकावर असून, मराठी भाषाविषयक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मराठी भाषा जगातील अधिक प्रभावी व अधिक व्यापक भाषा बनेल. जगातील प्रथम प्राधान्याची भाषा बनण्याची क्षमताही मराठी भाषेत असून, त्या स्पर्धेसाठी पुढील काळात मराठी भाषा सक्षम ठरेल,’’ असा सुस्पष्ट निष्कर्ष २०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीने काढला आहे. विचारवंतांना, तसेच भाषेच्या काही अभ्यासकांना मराठीच्या भविष्याची चिंता छळताना दिसते. मराठीपुढे फार आव्हाने असल्याचाही पाढा घोकला जातो आहे; पण सत्य वेगळेच असल्याने त्या केल्या जाणाऱ्या अनाठायी चिंतेला काही अर्थ नाही, हे नीट लक्षात घ्यायला हवे.

मुळात बीजगणितामधील आकडेमोडीने भाषेचा हिशेब करू नये. कारण कुठलाच समाज वाचाहीन नसतो आणि कुठल्याही भाषेचा विचार ज्ञानशाखांच्या परिघांमध्ये करता येत नसतो. आमच्या विद्यापीठांच्या बाहेर आणि महाविद्यालयांच्या बाहेरही भाषा नावाची संस्था अधिक जिवंत व अधिक प्रवाही स्वरूपात ‘संवाद आणि व्यवहार’ म्हणून कालानुकाल उपयोगात असतेच की! भाषेचा इतिहास करणे किंवा तिचा एकूण तापमानदर्शक अभ्यास करणे हे योग्यच; पण म्हणून मराठीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा गलका करण्यातही काहीच अर्थ नसतो. नवतंत्रज्ञानाची कारणे पुढे केली जातात. जागतिकीकरणाचे भय स्पष्ट करून सांगितले जाते. मराठी ज्ञानभाषा कशी नाही, यावर खलबते केली जातात. या एकूण म्हणण्यात तथ्य थोडे असले तरी यामुळे भाषेच्या उपासकांनी प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट होते. मात्र मराठीचा मरणपथ नमूद करणे सर्वस्वी चूक आहे. म्हणूनच नकाराचा हाकारा करून मराठीच्या आयुष्याचा हिशेब मांडता येत नाही; आणि तसा हिशेब कुणी मांडू नये. उलट दुःखद गोष्ट अशी, की मराठीचे काय होईल अशी चिंता मराठी भाषा बोलणारेच करत असतात!

दुसरा एक मुद्दा असा, की तीच ती उदाहरणे देत हेपण म्हटले जाते, की अमकी भाषा बोली बोलणारी ही शेवटची व्यक्ती आहे आणि ती गेली की भाषा जाणार... अगदी दुर्गम भागात, दुर्गम अपरिचित बोलीबद्दल हे तथ्य खरे असेलही. पण आज शिक्षण, संधी व वर्तमान या तीन विषयांचा विचार करू जाता ‘माझ्या आजोबांची वा माझ्या गावाची भाषा मी बुडू कसा देईन?’ एखादेवेळी माळेतून मणी गळून पडावेत, त्याप्रमाणे व्यवहारांतून वस्तू, शब्द गळून जातील; पण भाषा-बोली सगळीच मरू कशी शकेल? तर ती मरणार नाही. मराठी अजिबात मरणार नाही!  समाज हा व्यक्ती, देश, भाषा यांवर प्रेमच करत असतो. आपण हे मान्य करू, की भाषेबद्दलची आत्मियता आटू शकत नसते. आपल्याकडे कायम दोन जग सतत असतात. एक जग शिक्षितांचे आणि दुसरे जग लेखन-वाचन अवगत नसलेल्यांचे. यातील दुसरेही जग ‘मराठी’ म्हटल्या जाणाऱ्या जनतेचे जग आहेच की! मराठी भाषाविषयक धोरणाच्या म्हणण्यानुसार ‘‘मराठी ही देशातील जवळपास एकदशांश लोकांची मातृभाषा आहे,’’ असे असेल तर मराठीच्या आयुष्याचा हितवादी हिशेब इथेच झाला आहे. उगीच तिची चिंता कशासाठी? कोटी संख्येत असणारा आपला हा नागरिक किंवा साधा माणूस हिंदी - इंग्रजीत बोलतच नाही. तो खास ‘मऱ्हाटी’ भाषेतच बोलतो आणि हे कालानुकाल सुरू आहे; सुरू राहीलच. शिवाय, खास मराठीची लकब, तिचा विशेष लहेजा हा तर सामान्य माणसानेच सांभाळला! तेव्हा चिंतावीरांनी मराठीची चिंता करू नये... या अनुरोधाने ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत विजय तेंडुलकरांचे पुढील मत समजून घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, ‘‘भाषा आणि साहित्य याच्या मुळाशी माणसातली सर्वकालीन उत्सुकता आणि अभिव्यक्तीची गरज असेल तर भाषा आणि साहित्य या दोन्ही गोष्टी अमर आहेत.’’ (लेखकाचे मनोगत ः ‘कन्यादान’ ः पृ.११)

 मराठीच्या अभिव्यक्तीची गरज कधीच न संपणारी आहे. मराठी काय किंवा कुणीही भाषिक वाचावंत, भाषावंत जन्मभर असतोच. कायिक भाषेतून सर्व संवाद, सर्व व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून बोलणारे आहेत, तोवर मराठी आहेच आणि बोलणारे मानवी जग कधीच नष्ट होत नसते. मराठीच्या अमरत्वाचा एवढा दाखला पुरेसा आहे.तेंडुलकरांनीच एका ठिकाणी भाषेचा व आत्मीयतेचा मुद्दा विशद केला आहे. तोही या संदर्भात विसरता न येणारा ठरावा. अभिव्यक्तीची निकड संपणारी नसते. इतके समजून घेतले, तरी ‘राजभाषा’ म्हणून मनी असलेल्या मराठीच्या भविष्याची फार चिंता करून मराठी माणसाने चिंतातूर व्हावयाचे काहीएक कारण नाही. मराठीच्या आयुष्याचा हिशेब करणाऱ्यांना तो हिशेब जरूर करू द्या; मात्र मराठी बोलणारा माणूस हा मराठीतून संवादांची साखळी जोडत राहील. त्याचा मराठी दळणवळणाचा वा देवाण-घेवाण करण्याचा मार्ग मात्र अमर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT