asha bhosle lata mangeshkar
asha bhosle lata mangeshkar 
संपादकीय

बाजार सुरांचा भरला! (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

संगीत ही थेट ईश्‍वराशी संवाद साधणारी हृदयाची भाषा असल्याच्या ठाम धारणेतून सप्तसुरांचा वावर बव्हंशी मंदिराच्या गर्भागारात राहिला. भक्‍तीची भाषाच तेव्हाही संगीत हीच होती आणि आजही तीच आहे. मात्र, कालौघात हे संगीत जानपदी लोकगीतांमध्ये थोडाफार खट्याळपणा करू लागले. भावभावनांची अभिव्यक्‍ती करू लागले. तिथून ते थेट समष्टीतल्या रंजनव्यवस्थेत उतरले. त्याचे आधुनिक रूप म्हणजे आत्ताचे चित्रपट संगीत म्हणावे लागेल. भारतीय मनांना भुरळ घालणारी मेलडी आणि विलोभनीय स्वरावल्या या प्राय: चित्रपटसंगीताचा आत्मा होत्या. लता मंगेशकर आणि आशा भोसले या भगिनींनी तब्बल सहा-सात दशके ही मेलडीची भाषा मोठ्या निगुतीने जतन केली, बहराला आणली. किंबहुना, सर्वसामान्य रसिकांच्या त्या ‘मनाचा आवाज’ बनल्या. वयोमानापरत्वे आणि बदललेल्या संगीत क्षेत्रामुळे या दोघींचे दैवी आवाज पहिल्याप्रमाणे रसिकमनांची तृप्तता आताशा करत नाहीत. तथापि, ‘पूर्वीच्या काळची ती गंमतही आताच्या ध्वनिमुद्रणात राहिली नाही,’ असे उद्‌गार आशा भोसले मध्यंतरी त्यांच्या ८५व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात काढले. ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’च्या चालीवर या मेलडीच्या महाराणीने व्यक्‍त केलेली ही खंत अंतर्मुख करायला लावणारी आहे. ज्या प्रतिभावान कंठाने भारतीय रसिकता घडवली, त्या कंठामधून ही भावना व्यक्‍त झाली असल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

नवनवे तंत्रज्ञान हल्लीच्या पिढीतील संगीतकारांच्या दिमतीला आहे. डिजिटल चोऱ्यामाऱ्या, उचलेगिरी, पैसेबुडवूगिरी यांच्या लाटालाटीत आजही संगीतात अद्‌भुत प्रयोग होत आहेत, ही जमेची बाजू मानावी लागेल. मेलडीचा सोस कमी झाला असला, तरी जागतिक स्तरांवर नोंद घेतली जाईल, असे संगीत आपले नवनवे प्रतिभावान संगीतकार निर्माण करत आहेत. सारे काही मनोहर असले तरी उदास वाटायला लावणारेही काहीतरी आहे, हीदेखील एक वस्तुस्थितीच. हेच आशा भोसले यांच्या उद्‌गारांमधून मुखरित झाले आहे. कुठलीही कला रोजीरोटीचा मामला बनली की त्यात यथावकाश उद्यमी भावना येते. लेखनकला हीसुद्धा आपल्या भारतीय शास्त्रानुसार चौसष्ट कलांपैकी एक. पण लेखणी चालवणे हा रोजीरोटीचा दैनंदिन मामला बनला आणि त्यातली ‘कला’ हरवत गेली. तसेच काहीसे चित्रपट संगीताचे होते आहे काय? विचार करण्याजोगा मुद्दा आहे. एकेकाळी चित्रपटासाठी गाणे म्हणणे किंवा वादन करणे हे अभिजात कलावंतांना अपमानास्पद वाटत असे. ‘मोगले-आझम’च्या निर्मितीच्या काळात उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांना पाचारण करण्यासाठी संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के. आसिफ यांना नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. एस. डी. बर्मनसाहेबांना पं. सामता प्रसाद यांचा तबला हवा झाला, तेव्हा मिनतवाऱ्याच कराव्या लागल्या होत्या, हा झाला इतिहास. परंतु, आता शास्त्रीय संगीताच्या बैठकीत एखादी नामवंत गायिका किंवा गायक सुरांसाठी इलेक्‍ट्रॉनिक तानपुऱ्याची कळ पिरगाळतो, तेव्हा संगीतातील तंत्रज्ञानाने केलेले परिवर्तन ध्यानी येते. चित्रपटाचे संगीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत ‘धंद्या’ची भाषा करू लागल्यावर स्थित्यंतर होणे अपरिहार्य होते. त्यात भरीस भर म्हणून आजकाल संगणक आणि अन्य ध्वनिशास्त्राचे यमनियम कोळून प्यायलेली अनेक यंत्रे उपलब्ध आहेत. असल्या महागड्या यंत्रांमधून हुकमेहुकूम निर्माण होणारे दिलखेचक संगीत तरुण रसिकांच्या कानात मोबाइल फोनच्या माध्यमांतून अहर्निश शिरते आहे. एका सुरांनी भारलेल्या दालनाचे रूपांतर बघता बघता सुरांच्या मॉलमध्ये झाले. भारतीय चित्रपट संगीताची बाजारपेठ आजमितीस आठशे कोटींच्या वर असल्याचे सांगितले जाते. त्यातला मोलाचा वाटा मोबाइल फोनमधल्या रिंगटोनचा! म्हणजे जी गोष्ट लोक एकेकाळी मंदिरात, सभेत, चौकात ऐकत होते, ती गोष्ट आता कानात बसल्याजागी ओतली जाऊ लागली. लोकही मॉर्निंग वॉकच्या वेळी, रिकाम्या वेळात, दोन फोनकॉलच्या मधल्या काळात असे संगीत ऐकू लागले. मैफलीतून उठून मोबाइलमध्ये गेलेले आपले चित्रपटसंगीत वाढले म्हणायचे की खुरटले? आणि हेच चित्रपटसंगीताचे अटळ प्राक्‍तन असेल, तर एका ज्येष्ठ कलांवताने टाकलेला कालबाह्य उसासा यापलीकडे आशा भोसले यांच्या उद्‌गारांना काहीही अर्थ राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT