liz truss
liz truss sakal
संपादकीय

अर्थ-विस्तवाचा चटका

सकाळ वृत्तसेवा

अनागोंदी आणि बेशिस्त, मनमानी आणि अहंकार, सत्तेची लालसा नि दूरदर्शीपणाचा अभाव हे सगळे अवगुण एकाचवेळी एकाच ठिकाणी असले तर काय दयनीय अवस्था होते, हे पाहायचे असेल तर ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय कारभाराकडे बोट दाखवावे लागेल. अशा अवगुणांना खतपाणी घालत कारभार केला तर सत्तेवरून पायउतार होण्याशिवाय पर्याय राहात नाही, हेही ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याच्या घटनेने अधोरेखित झाले आहे. विकसित, भक्कम पायावर उभी असलेली अर्थव्यवस्था म्हणून ब्रिटनकडे पाहिले जायचे. तिचा दबदबाही मोठा. तथापि, युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा (ब्रेक्झिट) निर्णय घेतल्यापासून ब्रिटनची अर्थव्यवस्था गर्तेत गेली आहे. युरोपीय महासंघातून बाहेर पडून युरोपातील अन्य देशांसह महासंघाशी व्यवहाराबाबतच्या अनेक गोष्टींवर धोरणात्मक निर्णयाच्या पातळीवर काही बाबी अद्याप बाकी आहेत. तथापि, ही प्रक्रिया प्रगतीत असतानाच ब्रिटनमध्ये थेरेसा मे, बोरिस जॉन्सन आणि आता लिझ ट्रस यांना वेगवेगळ्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कारणांनी पायउतार व्हावे लागले. केवळ ४५ दिवस पदावर राहिलेल्या हुजूर (कॉन्झर्वेटिव्ह) पक्षाच्या ट्रस यांची कारकीर्द ब्रिटनच्या इतिहासात सर्वात अल्पकालीन ठरली.

आता पंतप्रधानपदासाठी काही महिन्यांपूर्वी याच पदावरून पायउतार झालेले बोरिस जॉन्सन, माजी अर्थमंत्री भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्यासह विद्यमान अर्थमंत्री, सुनक समर्थक जेरेमी हंट, माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमॅन अशी नावे घेतली जात आहेत. सुनक यांना हरवून ट्रस पदावर आल्या होत्या आणि त्यांच्या अर्थविषयक धोरणाला त्यांनी कडवा विरोध केला होता.

ट्रस अर्थशास्त्र, समाजशास्त्रातील पारंगत आहेत. जॉन्सन मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्रीपद आक्रमकपणे त्यांनी सांभाळले, थेरेसा मे मंत्रीमंडळातही त्या होत्या. बहुवांशिक असे त्यांचे मंत्रिमंडळ होते, नवे पंधरा चेहरे होते. सत्तेवर येताच त्यांनी करकपात आणि ऊर्जाविषयक खर्चाबाबत दिलासा देण्याचे सूत्र जाहीर केले. श्रीमंतांसह सगळ्यांनाच करकपात दिली. ‘मिनी बजेट’द्वारे सवलतींची खैरात केली. त्यामुळे सरकारच्या गंगाजळीला ओहोटी लागण्याची अप्रत्यक्ष सोयच झाली. त्यातच चाळीस वर्षांत महागाईने कळस गाठला आणि चलनवाढीचा दर १० टक्क्यांवर गेला. डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश पौंडने निचांकी पातळी गाठली. गुंतवणूकदारांनी माघार घेणे सुरू केले.

अर्थव्यवस्थेला अस्थिरतेचे हादरे बसू लागले. त्यामुळेच ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वार्टेना यांना बळीचा बकरा बनवत त्यांचा राजीनामा घेतला. जेरेमी हंट यांच्याकडे सूत्रे दिली आणि त्यांनी ट्रस यांच्या आर्थिक धोरणाची चक्रे उलटी फिरवली. त्यामुळे ट्रस यांच्या धोरणातील फोलपणा अधिक उठावदार झाला. सुनक यांच्या अनुभवपूर्ण सल्ल्याकडे ट्रसनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांच्या समर्थकांशी उभा दावा केला. हटवादीपणाने कारभार केला. ऐंशीच्या दशकात ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर तसेच अमेरिकेत अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी करकपातीतून बिकट आर्थिक स्थितीवर मात, उद्योग-व्यवसाय आणि रोजगाराला चालना असे सूत्र अवलंबले होते. पुढे ते ‘थॅचरनॉमिक्स’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्याला ‘ट्रिकलडाऊन इफेक्ट’ म्हणतात. त्याच्या मर्यादा आणि परिणामकारकता माहिती असताना, ‘ट्रसनॉमिक्स’चा प्रयोग त्यांनी लावला, तथापि तो सपशेल फसला. पौंड आणखी दुर्बल झाला, हेच वास्तव आहे.

आर्थिक अरिष्टातून ब्रिटनला सावरायचे असेल तर कठोर उपाययोजना करत तिजोरी भरभक्कम करणे, महागाईला वेसण घालण्यासाठी कठोर पावले उचलणे आणि बचतीवर भर देत ऊर्जेच्या संकटावर तार्किक उपाययोजना महत्त्वाचे आहे. मुक्त व्यापाराबाबत भारताची ब्रिटनशी करारमदाराची चौकट ठरवण्यासंबंधी बोलणी सुरू आहेत. त्यामुळे उभयतांमधील व्यापाराला चालना मिळणार आहे. या प्रक्रियेला या सत्तांतरनाट्याने काहीसा विलंब लागू शकतो.

राजकीय लोकप्रियता मिळवत राज्यशकट हाकत असताना आर्थिक शिस्तीची चौकट मोडून चालत नाही; किंवा तिला हरताळ फासत, अविचारीपणे निर्णयही घेऊन चालत नाही. लोकानुनयाचे राजकारण करताना वास्तवाचे भान, विवेकाची जोड द्यावी लागते. सरकारच्या तिजोरीचा सल्ला मानावा लागतो.

नाहीतर कपाळमोक्ष हा ठरलेलाच. सबसिडी, सवलतींची खैरात, मोफत नागरी सेवा-सुविधा यांची तोंडभरून आश्‍वासने देत असताना, ज्याच्या बळावर हा रमणा वाटला जाणार आहे, त्यात खुर्दा किती आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. हाच ब्रिटनमधील सत्तांतरनाट्याचा भारतासह साऱ्या जगाला सांगावा आहे. ब्रिटनमधील घटनेचे पडसाद जगभरात उमटतीलच. मात्र, रशिया-युक्रेन युद्धाने निर्माण झालेली जागतिक अस्थिरता, विशेषतः जीवाश्‍म इंधनासह ऊर्जाविषयक घटकांच्या दरात असलेली तेजी, त्यामुळे सगळ्याच देशांचे बिघडत असलेले आर्थिक गणित, मंदीच्या लाटेची चाहूल आणि महागाईचा वणवा युरोप, अमेरिकेसह आशियाई, आफ्रिकी देशांना भेडसावत आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी काटेकोर आर्थिक नियोजन, शिस्त हेच अगत्याचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT