दर्शन! (ढिंग टांग)
दर्शन! (ढिंग टांग) 
संपादकीय

दर्शन! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

तसा मी पाणीदार श्रद्धाळू नाही,
आणि आगीनबाज अंधश्रद्धही नाही

हे गणित कसे जुळावे?
उदाहरणार्थ,
माझ्या (ही) सुशिक्षित मध्यमवर्गीय मनाला
खटकत राहतात, बातम्यांमधून
दिसणारे देवस्थानांचे बेहिसाब खजिने
आणि अतिश्रीमंत देवतांच्या
मस्तकावर झळाळणारे
स्मगलिंगच्या सुवर्णाचे किरीट,
आणि तितकेच सलत राहाते
भोळ्या-भाबड्या संभ्रमित
भाविकांना मूर्ख ठरवत
विवेकाचे फलक नाचवणारे अंधश्रद्धेचे निर्मूलनही...

हे गणित कसे जुळावे?

उदाहरणार्थ,
एखाद्या फेमस देवस्थानात, 

फुलवाल्याच्या स्टॉलपाशी
(अंगठा गमावलेली) चप्पल
काढताना सारा भक्‍तिभाव
पदरात लपेटून घेत
फुलांची परडी नि हार घेऊन
रांगेकडे वळणाऱ्या अर्धांगीस
नेहमी मी हसून सांगतो की,
""तुझे होऊ दे सावकाश...इथले
शिलाहारकालीन प्राचीन बांधकाम
न्याहाळताना माझा वेळ जाईल मजेत!‘‘
विश्‍वस्तांच्या आदेशाबरहुकूम
बांबू किंवा धातूजन्य दांड्यांच्यामधून
ढकलाढकली करीत
गर्भागाराकडे निघालेली
भाविकांची अटळ रांग बघून
द्रवते माझे शास्त्रकाट्यावर धडधडणारे
हृदय...आणि त्याचवेळी
अपव्ययाच्या स्वर्गीय कृष्णविवराकडे
वेडावलेल्या वेगाने धुसमळत निघालेले
ते भावविश्‍व पाहून
उसळतोच माझा रक्‍तदाब...

हे गणित कसे जुळावे?

उदाहरणार्थ,
एखाद्या रिकाम्या दिवशी
पायात हळूचकन चपला सर्कवून
कोपऱ्यावरल्या पानबिडीच्या टपरीवर
मावे आणायला निघावे, तर
दरवाज्याच्या चौकटीवर
थर्थरता हात ठेवून
वृद्ध अजीजीने आई म्हणते की,
"येताना फुलपुडी आण रे... काल त्या
मेल्यानं सगळ्या तुळशीच घातल्यान...‘‘
तेव्हा गल्बलते माझ्या व्यसनी हृदयात,
आणि माझ्या तर्ककर्कश जिभेचा
प्रतिपाळ करणाऱ्या (मावायुक्‍त) मुखाला
पडते वैश्‍विक कोरड...

हे गणित कसे जुळावे?

तर्काधारित विज्ञाननिष्ठ
समाजाची उभारणी करण्यासाठी
आवश्‍यक आणि अनावश्‍यक
घटकांचा लेखाजोखा मांडताना
बुद्धीच्या धारदार सुरीने
लागलीच करतो दोन तुकडे
ह्याचे आणि त्याचे
इथले आणि तिथले
"त्यांचे‘ आणि "आपले‘ वगैरे.
घासून पाहतो तर्काच्या फत्तरावर
माझ्या गुणसूत्रांमधल्या परंपरा
ओढतो संतप्त आसूड
-भाविक मूढपणावर
-धर्माच्या दुकानदारांवर
-श्रद्धांच्या अप्पलपोट्या विश्‍वस्तांवर
-समाज नावाच्या उंदरांना
अलगुजाच्या नादावर
मृत्यूनदीत नेऊन सोडणाऱ्या
जादूगारांवर....

पण-
केवळ कुटुंबीयांच्या आग्रहाखातर
(आणि अर्थात परंपरेखातरही)
नेमेचि येणारी ती "श्रीं‘ची मूर्त
इकोफ्रेंडली मखरात बसून
निरांजनाच्या मंद प्रकाशात
ममतेने माझ्याकडे पाहाते, तेव्हा
नकळत जोडले जातात छातीशी
माझे अश्रद्ध हात...
संभ्रमांचा होतो विलय
मनात गुंजारव करतो
"सुखकर्ता, दुखहर्ता‘चा जिव्हाळसूर
वाजतात झांजांचे झनकार
त्यावरही किंवा त्याआतून
अस्पष्टपणे अवतरतो
नादात्मक ॐकार...

देवादिकांचे गल्लोगल्ली
देव्हारे माजवणाऱ्यांना
हेटाळणारा मी
आणि, तुझ्या दर्शनहेळामात्रे
हेलावणारा मी...

हे गणित कसे जुळावे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT