संपादकीय

साथ-साथ!(ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...)

दादू - (फोनमध्ये) सदूराया!

सदू - (तिरसट सुरात) कोणॅय?

दादू - (प्रेमळपणाने) अरे, मी तुझा दादू...आवाज नाही ओळखलास?

सदू - (तिरसट धा...) कॅय कॅमॅय?

दादू - (दुखावून) धाकट्या भावाशी बोलायला का काही काम असावं लागतं? कसाही असलास, तरी माझा धाकटा भाऊ आहेस तू! तू विसरलास, पण मी नाही हं विसरलो!!

सदू - (कडवटपणाने) काम असल्याशिवाय तू स्वत-शीसुध्दा बोलत नाहीस, दादू! तीन मिनिटांत कामाचं बोल आणि फोन ठेव!! मला दुसरा एक महत्त्वाचा फोन येणार आहे!!

दादू - (गडबडून) खूप कामात आहेस का?

सदू - (संतापून) छे, रिकामा तर बसलोय! मस्त बागेत आरामात, हवा खात!! तुला कशाला चौकश्‍या? 

दादू - (चाचपणी करत) बागेत? तुमच्या नाशिकला गेलायस की काय?

सदू - (संतापातिरेकानं) नाशिक? नाव नको काढूस त्या गावाचं! एवढ्या बागा, कारंजी, रस्ते, पाणी...काय नाही केलं मी नाशिककरांसाठी? पण ऐनवेळी कावळ्यासारखे वागले!! शिवता शिवले नाहीत पिंडाला!! जाऊ दे. ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणतो, माझंच खरं!! पुन्हा कोणासाठी म्हणून इतकं राबणार नाही!! (स्वप्नात जात) केवढं मोठं फुलपाखरु उभं केलं होतं मी नाशकात...छे!

दादू - (ढील देत) भलताच जिव्हारी लावून घेतलंयस तू!! बाकी तुझं ते गाणं मस्त होतं हं! ‘तुमच्या राजाला साथ द्या...द्या...द्या’!! लोकांनी सात दिले!! हाहा!!

सदू - (सावध होत विषय बदलत) तुझं काय चाललंय सध्या? 

दादू - (सुगावा लागू न देता) मी ना? सध्या विजयोत्सवाचा आनंद लुटतो आहे. लाडू आणि पेढे खाऊन तोंड गोड गोड झालं होतं! शेवटी आज सकाळी ठाण्याहून मिसळ मागवली! तिखटजाळ मिसळ खाताना तुझी आठवण झाली!! 

सदू - (एक पॉज घेत) पुढे काय करणार आहेस?

दादू - (ताकास तूर लागू न देत) हंऽऽ...बघू...विचार चालू आहे...काही ठरवलं नाही अजून! काय घाई आहे? 

सदू - (हेटाळणीच्या सुरात) हु-!! उगीच आखडूपणा करून शेवटी त्या कमळेच्या मागे जाशील!!

दादू - (चिडून) सद्या...तोंड सांभाळून बोल! कमळेच्या मागे जाण्याची आम्हाला काय गरज? वी आर एटीफोर!! चौऱ्यांशी!!

सदू - (आणखी हेटाळणीने) चौऱ्यांशीच्या फेऱ्यात सापडलेल्याला मोक्ष कधी मिळणार, दादूराया?

दादू - (डोळे गरागरा फिरवत) खामोश!! मुंबईकरांच्या अलोट प्रेमाचं दान सलग पाचव्यांदा आमच्या पदरात पडलं, ते काय उगाच? अवघ्या मुंबईला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असंच काम हा दादू करील, ह्याबद्दल खात्री बाळग!!

सदू - (संशयानं) म्हंजे नेमकं काय करणार आहेस?

दादू - (गालातल्या गालात हसत) आहे आमचं गुपित!! तुला का सांगू?

सदू - (एक सुस्कारा सोडत) फोन केलायस नं...म्हणून सांग!

दादू - (चलाख सुरात) सगळेच पत्ते असे उघड करायचे नसतात! मेंढीकोट चढतो मग!!

सदू - (चलाखीने विषय बदलत) काही काम नसेल, तर फोन ठेव! मला कमळावैनींचा फोन येतोय!! घ्यायला हवा!!

दादू - (ठामपणाने) शक्‍यच नाही!! आला तरी घेऊ नकोस त्या कमळेचा फोन!! अत्यंत घातकी बाई आहे ती!! बोल बोल म्हणता तुला गळाला लावील आणि नंतर केसानं गळा कापेल!! सावध, सदूराया, सावध!!

सदू - (उलटा सवाल करत) मला कशाला गळाला लावेल? त्यात तिचा काय फायदा?

दादू - (चिडून चिडून) सवयच आहे तिला! तिच्यामुळे आमची पंचवीस वर्षं सडली!! आपल्या भावाला सतावणाऱ्या बाईशी तुला का बोलायचंय पण?

सदू - (पोक्‍तपणाने) राजकारणात कुणीही स्पृश्‍य-अस्पृश्‍य नसतं! मी किंगमेकर आहे!!

दादू - (धोरणीपणाने) तेच सांगायला फोन केला होता! किंगमेकर हो-क्‍वीनमेकर नको!! कळलं? जय महाराष्ट्र. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT