shivsena-uddhav
shivsena-uddhav 
संपादकीय

ढिंग टांग  : खजूर!

ब्रिटिश नंदी

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ आश्‍विन शु. चतुर्थी
आजचा वार : गांधीवार!
आजचा सुविचार : वैष्णव जन तो तेणे कहिये जे, पीड पराई जाणे रे..!
.........................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) खरे तर ॐ महात्माय नम: अशी सुरवात करून डायरी लिहायला सुरवात करणार होतो. तशी केलीही...पण लिहिलेले खोडले! म्हटले कशाला उगीच? आज गांधी जयंती! मन भरून आले होते. 

‘वैष्णव जन तोऽऽ...तेणे कहिए जे...पीड पराई जाणे रेऽऽ...’ हे भजन गुणगुणतच सारी आन्हिके आटोपली. पवित्र भावनांनी मनात घर केले होते. आमचे पीए आलेलेच होते. त्यांनी तत्काळ ‘गुड मॉर्निंग’ केले. मी त्यांना नमस्कार केला. ‘‘चहा घेता ना?’’ मी विचारले. त्यांना बहुधा प्रचंड धक्‍का बसला असावा. खुर्चीची पाठ घट्ट पकडून आवंढा गिळत त्यांनी ‘हो’ म्हटले.

‘‘नका घेऊ...वाईट असतो तो!’ मी तत्काळ म्हणालो. गांधी जयंतीच्या दिवशी तरी चहा पिणे टाळावे!! ते चेहरा पाडून ‘बरं’ म्हणाले. सात्विक भावनेपोटी दोन प्लेट रताळ्याचा कीस, तीन प्लेट साबुदाणा खिचडी आणि खीर एवढाच अल्पसा नाश्‍ता केला. फलाहार करण्याची इच्छा व्यक्‍त केली. पण सैपाकघरातून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. भांड्याकुंड्यांचे हिंस्त्र आवाज आल्याने तो नाद सोडला. माणसाने हिंसेचा मार्ग सोडावा.

तुपात तळलेले खजूर कसे लागतात, हे बघायचे आजवर राहून गेले होते. गांधीजयंतीनिमित्त आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेब यांना तुपात तळलेले खजूर पाठवावेत, अशी आयडिया मनात आली. त्यांना खरी गरज असणार. मनातले तामसी विचार त्यामुळे नष्ट होतात, असे म्हणतात. परवा समसमान वाटपाचे आकडे त्यांना फोनवर सांगितले तेव्हा अचानक वेगवेगळे आवाज ऐकू आले होते. 

ते कोणावर तरी रागावलेले असावेत, अशी माझी समजूत आहे. ‘बघून घेईन’, ‘वाट लावीन’, ‘समजता काय? केसानं गळा कापता? विश्‍वास ठेवला हेच चुकलं’ असे बरेच काही बोलत होते. बरेच बोलून झाल्यावर पुन्हा फोनवर आले. म्हणाले, ‘‘बोला!’’

‘‘असं रागावू नये हो! तब्बेतीला चांगलं नसतं ते!,’’ मी म्हणालो. त्यावर त्यांनी पुन्हा सरबत्ती सुरू केली, असे वाटले. 

‘‘कोणावर रागावताय एवढं? राग कंट्रोल करावा माणसानं! मी बघा, काहीही झालं तरी सदोदित हसत असतो!’ मी माझेच उदाहरण दिले. त्यावर ते काही बोलले नाहीत. मला राहावले नाही. ‘बोलत का नाही आहात?’ असे मी विचारले.

‘‘तोंडातून शब्द फुटत नाहीएत! काय करू?’’ ते कसेबसे म्हणाले.

उधोजीसाहेब थोडे तापट स्वभावाचे असले तरी मैत्रीला मेणाहुनी मऊ आहेत. मी सांगितलेले सगळे ऐकतात. महायुतीच्या जागांचे समसमान वाटप केल्यानंतरही ते नजर रोखून फक्‍त पाहत राहिले. १४६ पेक्षा १२४ ही संख्या अधिक बलिष्ठ आहे, हे त्यांना मी पटवून दिले. आकडेशास्त्रानुसार १४६ ची न्यूमरिक व्हॅल्यू दोन येते, तर १२४ ची नऊ!! आता दोन मोठे की नऊ? त्यावर त्यांनी मान (बहुधा) डोलावली!! अशा रीतीने आमचे समसमान जागावाटप झाले...

उधोजीसाहेबांच्या मनात परस्पर सौहार्द आणि बंधुभावाचे रोपण व्हावे, म्हणून त्यांना तुपात तळलेले खजूर श्रीखंडाच्या (रिकाम्या) प्लास्टिकच्या डब्यात भरून पाठवले. तासभराचा अवधी गेल्यानंतर त्यांना फोन केला.

‘‘मिळाले का खजूर?’’ मृदुपणाने मी म्हणालो.

‘‘खामोश! खजूर कोणाला म्हणता?,’’ असे ते संतापून बोलायला लागले. इतके संतापणे बरे नाही. माणसाने कसे सदोदित हसतमुख राहावे. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT