संपादकीय

ढिंग टांग : बॅक टु द फ्यूचर..!

ब्रिटिश नंदी

साल : २०२४. वेळ : दुपार्ची.
स्थळ : डाल लेक परिसर, श्रीनगर, इंडिया!

सकाळीच बुलेट ट्रेनने श्रीनगर ऊर्फ नौगाम रेल्वे स्थानकात उतरलो. हल्ली मुंबई-श्रीनगर रेल्वे प्रवास अक्षरश: सहा तासांचा झाला आहे. नौगामच्या हमालाने ब्याग उचलायचे तीनशे रुपये सांगितले. आम्ही पाठीवर ब्याग घेऊन तस्से निघालो. आणखी एखाद-दोघांचे सामान उचलून प्रवासखर्च सोडवावा, असेही मनात येऊन गेले. खोटे का बोला? जाऊ दे. बाहेर सुंदर सजवलेले काश्‍मिरी टांगे उभे होते. असल्या सजवलेल्या टांग्यात ह्यापूर्वी एकदाच बसलो होतो. तेव्हा शेजारी आमचे कलत्र बसलेले होते. आमचा सजवलेला टांगा ओढताना घोड्याच्या तोंडाला आलेल्या फेसावरून आम्हाला पुढले भविष्य कळायला हवे होते, पण...आता ती आठवण नको!! मनाचा हिय्या करून टांगेवाल्याला भाव विचारला. त्याने सातशे वीस रुपये सवारी सांगितली. हबकलोच! पर्यटकांना हे लोक किती लुटतात!! 

‘‘लौकर चला सायेब, शीटा खोळंबल्यात,’’ काश्‍मिरी टांगेवाला लाल दाढी खाजवत शुद्ध मराठीत म्हणाला. तो काश्‍मिरीच होता.  कारण त्याने काश्‍मिरी टोपी घातली होती.

‘‘कुटंशी जायाचं?’’ टांगेवाल्याने विचारल्यावर आम्ही च्याट पडलो. मराठी माणूस कुठल्या कुठे पोचल्याचे पाहून घशात कढ आला. तो आवरून त्याला पत्ता सांगितला. : ‘ ३०१, श्रीरंग सोसायटी, गांधी पुतळ्याजवळ, टिळक रोड, श्रीनगर वेस्ट’. टांगा निघाला...

...श्रीनगरच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असून कांग्रेसवाल्यांना टांग्यात बसवून त्या रस्त्यातून एकदा ने-आण करून आणण्याची अघोरी शिक्षा आम्हाला सुचली. कांग्रेसवाल्यांनी काश्‍मीर प्रॉब्लेम वाढवला. पाच वर्षांपूर्वी तीनशेसत्तर कलमाची ऐशीतैशी करून,आमच्या मोदीजींनी आणि मोटाभाईंनी तो सोडवला. ‘चार वर्षांत काश्‍मीर खोरे पूर्णत: पालटून तेथे विकासाची गंगा वाहील,’ असे ते म्हणाले होते. तस्सेच घडले. काश्‍मिरात गेल्या पाच वर्षांत प्रचंड विकास झाला आहे, हे दिसतच होते. तरीही ह्या पृथ्वीवरील स्वर्गाला पाच वर्षांत (दहिसर) काशीमिऱ्याची कळा आणण्याला मात्र कांग्रेसवालेच जबाबदार आहेत, ह्यात शंका नाही. 

‘‘निशांतबागला जायला किती वेळ लागतो हो आता?’’ आम्ही चौकश्‍या आरंभल्या. पर्यटकाने चौकस असावे, हो की नाही? ‘‘धा मिंटाचा रस्ता...मिनिमममधी जातोय माणूस!,’ विनम्र काश्‍मिरी टांगेवाला बोलका होता. त्याने पुढील माहितीही न विचारता दिली. (तो मराठी होता, हे वर सांगितले आहेच!! असो.) लाल चौकात हल्ली शेअर रिक्षा मिळतात, पण रिक्षावाले फार मुजोर आहेत, अशीही माहिती त्याने दिली. तेवढ्यात एक तांबडी बस धडधडत गेली. ती एसटी होती. मनात आले, ‘गाव तेथे एसटी’ हे किती खरे आहे!! पर्यटनाला येण्यापूर्वी मा. दिवाकरजी रावतेसाहेबांना विनंती केली असती तर एस्टीचा फुकट पास मिळाला असता का? असा विचार मनाला चाटून गेला. ‘‘यष्टीच ती...पण श्रीनगर ट्रान्स्पोर्ट!’’ टांगेवाला म्हणाला. आम्ही विषय बदलला. 

...पाहता पाहता एक हिरवे मैदान लागले. दूरवर उंच उंच इमारती दिसू लागल्या. इमारतींच्या गच्चीवर पडलेले बर्फ उन्हात चमकत होते. मैदानाच्या कडेला काश्‍मिरी सरबताच्या आणि गारीगारच्या गाड्या ओळीने लागलेल्या होत्या. इथे बर्फाचा गोळा फुकट मिळत असेल, अशी पर्यटकांची समजूत असेल तर ती खोटी आहे. इथेही पुण्यासारखाच बर्फाचा गोळा पन्नासेक रुपयांना मिळतो. ‘‘हे मैदान कुठलं हो?’’ आम्ही. एवढे मोठे मैदान बघून हेवा वाटला. ‘‘मैदान? डाल लेक हाय त्ये साहेब...शेवाळ साचलंया!,’’ टांगेवाला म्हणाला. एकेकाळी इथे शिकाऱ्यात बसून मधुचंद्राची जोडपी सेल्फ्या घेत. मनात म्हटले, व्वा!! केवढा विकास झालाय काश्‍मीरचा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT