Dhing-Tang
Dhing-Tang 
संपादकीय

ढिंग टांग : बळ, स्वबळ आणि खळबळ!

ब्रिटिश नंदी

हिरमुसलेल्या इतिहासपुरुषाने मलूलपणाने पाहिले. शेजारीच लेखणी धारातीर्थी पडली होती. बखरीचा कागद भेंडोळावस्थेत गतप्राण पडला होता. आता काय लिहायचे? कसे लिहायचे? कधी लिहायचे?...मुळात कां लिहायचे? होत्याचे नव्हते झाले. इतिहास घडता घडता एकदम काहीच्या काहीच होऊन बसले. इतिहासपुरुषाच्या नजरेत नोकरी गमावलेल्या कार्कुनाची कळा होती. 

जेथे फुले वेचली, तिथे... छे! इतिहासपुरुषाने निराशेने मान हलवली. इतक्‍यात...

‘‘चला, पळता काय... विसरलात काय मराठी बाणा? उचला भाले आणि निघा... परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत..!,’’ तोच तो परिचित आवाज दशदिशांत (म्हंजे पुण्यात हं!) घुमला. आँ? हे काय अघटित घडत्ये आहे? इतिहासपुरुष सर्सावून बसला. टकामका बघू लागला... राजियांनी पुन्हा उचल खाल्ली होती. बघता बघता नवनिर्माणाच्या (उरल्यासुरल्या) फौजेत उत्साहाचे वारे भरारले. चला, पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी समुद्राला पालाण घालावयाचे. पुन्हा एकदा नवनिर्माणाचे वारे शिडात भरायचे.

इतिहासपुरुष थरारून गेला. नोकरी गेलेल्या कार्कुनाला सन्मानाने पुन्हा बोलावून हेडकार्कुनाची जागा देऊ करावी, तद्वत नशिबाला कलाटणी मिळाली...

...नुकत्याच झालेल्या जुझात अपेश आल्याने नवनिर्माणाची फौज हुळहुळत होती. (हळहळत नव्हे, हुळहुळत!!)...दोघांच्या मारामारीत तिसऱ्याने मध्ये पडून उगीचच मार खाल्ल्यासारखे काहीतरी जाहले. पदरी निष्कारण अपेश आले... अपेश आले ते ठीक. अशा जुझात कमी-जास्ती व्हावयाचेच; पण गनिमाने त्या अपेशाचे व्हिडिओ की हो काढलेन!! हे तो भलतेच झाले.

‘‘चला चला!,’’ आसमंतात आरोळ्या उठल्या. राजियांच्या चेहऱ्यावर नवतेज चढले होते. भरारा हाकारे घालून त्यांनी आपल्या कडव्या मावळ्यांना आणि सरदारांच्या बाहून स्फूरण आणिले. 

‘‘गनिमाचा बीमोड केलाच पाहिजे आणि तो आम्हीच करणार! पावसकाळ संपता संपता नव्या जुझाला तोंड फोडायचे...’’ राजे त्वेषाने म्हणाले.
‘‘क...क...कुणाचं तोंड फो...फो...फोडायचं?’’ बाळाजीपंत अमात्यांनी चाचरतच शंका विचारली.

‘‘कोणाचे म्हंजे? अर्थात गनिमाचे. आप्त म्हणवणारेच मोगलांसारखे वागो लागले. मऱ्हाटी रयत देशोधडीला लागली. रयतेने पाहावे कोणाकडे? आमच्याकडेच ना? मग गप्प बसोन कैसे चालेल?’’ गर्रकन मान फिरवत भर्रकन वळून सर्रकन तल्वार उप्सत राजे उद्‌गारले.

‘‘थेट तोंडच फोडायचे? की..,’’ बाळाजीपंतांचा विश्‍वास बसेना.
‘‘आधी गनिमी काव्याने रयतेच्या समस्यांना तोंड फोडू... गनिमाच्या तोंडाचे नंतर पाहता येईल!,’’ क्षणभर सुज्ञ विचार करून राजियांनी मुद्दा मांडला.
‘‘चालेल! रयतेच्या समस्यांचे चिक्‍कार व्हिडिओ जमा झालेत आपल्याकडे!’’ बाळाजीपंत आनंदाने म्हणाले.

‘‘खामोश! नाव नका काढू व्हिडिओचं! हल्ली जो उठतो तो ‘लावरे तो व्हिडिओ’ म्हणत खदाखदा हसतो! आमच्या नव्या जुझात आम्ही व्हिडिओबिडिओ नाही, थेट सिनेमाच दाखवणार आहो! जुझाच्या तयारीला लागा..,’’ राजे वैतागून म्हणाले. त्या व्हिडिओ प्रकरणाने नाही म्हटले तरी तोंड पोळले होते, हे खरेच. पुन्हा ती भानगडच नको. आता थेट पुराव्यानिशीच मैदानात उतरायचे. 

‘‘जुझाची तयारी करू, पण पुरेसा फौजफाटा जमवावा लागेल..,’’ बाळाजीपंतांनी समस्या मांडली.
‘‘मग जमवा! पुढले युद्ध आम्ही स्वबळावर लढणार आहो! स्वबळावर आणि स्वत:साठी!!,’’ राजियांनी मसलत जाहीर केली. इतिहासपुरुष तर ह्या घोषणेने काहीच्या काहीच थरारुन गेला. स्वबळावर आणि स्वत:साठी...हे काय ऐकतो आहे? खरेच? भराभरा कागद पुढ्यात ओढून त्याने नव्याने इतिहास लिहायला घेतला.

‘‘ स्वबळ म्हणजे नेमकं कुणाचं म्हणायचं?’’ बाळाजीपंतांनी न राहवून पुन्हा शंका विचारलीच; पण इतिहासपुरुषाने त्याची नोंद घेतली नाही. खळबळलेल्या मनानेच त्याने बखरीच्या कागदावर सर्वांत आधी नवा मथळा लिहून टाकला : ‘नवे युद्ध... नवे निर्माण... नवे स्वबळ!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT