संपादकीय

ढिंग टांग : एक नोबेल भेट!

ब्रिटिश नंदी

थोर अर्थतज्ज्ञ मा. सर नमोजी आणि नुकतेच नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ ओभिजितबाबू या दोघा भद्रजनांची अर्थपूर्ण भेट राजधानी दिल्ली येथे झाली. दोघांनी एकमेकांना सोळा वेळा हस्तांदोलन केले. नऊ वेळा आलिंगन दिले. या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहो. या दोघांच्या मध्ये आम्ही असण्याला तसा काही अर्थ नाही असे कुणी म्हणेल, पण अशा निरर्थक टीकेला आम्ही अर्थातच भीक घालत नाही.

सर नमोजी यांचे ‘मोदीनॉमिक्‍स’ नावाचे नव्याने डेवलप झालेले अर्थशास्त्र कोणाला माहीत नाही? भारतात तर सर्वांनाच ते ठाऊक आहे. (कोण विव्हळत आहे ते?) तर ओभिजितबाबूंनी गरिबी नष्ट करण्यासाठी काही आर्थिक प्रयोग केले, ते यशस्वी झाले. गरिबास थोडे पैसे (असेच) दिले, तर त्याला जगण्यासाठी ते बरे पडते, असा त्यांचा प्रयोगांती निष्कर्ष निघाला. आम्हाला हा निष्कर्ष तंतोतंत मान्य आहे. कुणीतरी असेच पैसे आपल्याला देत आहे, असे स्वप्न पाहत पाहत तर आम्ही या पृथ्वीतलावर इतके दिवस रेटले. असो. ओभिजितबाबू यांच्याशी सर नमोजी यांचा झालेला संवाद आणि त्याचा (लागेल तसा) अर्थ खाली देत आहोत.

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग. न्यू डेल्ही. वेळ : सकाळची. पात्रे : सर नमोजी, मा. ओभिजितबाबू आणि आम्ही (वेटरच्या भूमिकेत.)

सर नमोजी : (अत्यंत खुशीत) जे श्री क्रष्ण!

ओभिजितबाबू : (चाचरत हात पुढे करत) नोमोश्‍कार! आयाई ग्गं! (हे हस्तांदोलनामुळे! बंगालीत ‘अयाई ग्गं’असा शब्द नाही. ‘ओई मां’ असा आहे. वाचकांच्या सोयीसाठी आम्ही भाषांतर केले.)

सर नमोजी : वेलकम टु द नोबेल विनर्स क्‍लब!

ओभिजितबाबू : (हातातल्या वेदना कसोशीने परतवत) तुम्हाला पण मिळालं की काय?

सर नमोजी : (हात उडवत) त्यात काय एवढं! दोनेक वर्षांत मिळून जाईल! ‘सध्या नको’ असं मीच सांगितलं आहे त्यांना! ढोकळा घ्या ना! (इथे आम्ही अदबीने ढोकळ्याची प्लेट त्यांच्या पुढ्यात सर्कवली.)

ओभिजितबाबू : कोणाला?

सर नमोजी : नोबेलवाल्यांना! म्हटलं दोनेक वर्ष थांबा! तसं ते शांततेचं नोबेल कधीही द्यायला तयार आहेत! ढोकळा?

ओभिजितबाबू : मग घेऊन टाका की!

सर नमोजी : (नाक मुरडत) नको! मला अर्थशास्त्राचं नोबेल हवंय! माझं ‘मोदीनॉमिक्‍स’ अभ्यासा तुम्ही! आणखी एक नोबेल मिळून जाईल!

ओभिजितबाबू : एक पुरेसं आहे मला! ‘मोदीनॉमिक्‍स’ थोडं अवघड आहे!

सर नमोजी : (विषय बदलत) बाकी क्‍या चल रहा है? अहो, ढोकळा राहिला ना!

ओभिजितबाबू : (अर्थशास्त्रातील परिभाषा वापरत) ज्याला आपण ग्लोबल रिसेशन ड्यू टु द ॲडव्हर्स इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणतो, त्यामुळे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्‍शन घसरतं आणि जॉब लॉस, लेस मार्केट ॲक्‍टिव्हिटीज अशा गोष्टींमुळे हंगर इंडेक्‍स वाढून हॅपीनेस इंडेक्‍स घसरतो... हे सगळं धुक्‍यासारखं वाटतं...(इथे सर नमोजी थोडीशी पेंग घेतात. कारण ते रात्री तीन वाजता झोपून पहाटे पावणेचारला उठून योगासने करतात.)

सर नमोजी : (खाडकन जागे होत) करेक्‍ट! मी एमने एमज म्हणत होतो! घ्या, ढोकळा घ्या!!

ओभिजितबाबू : (अखेर ढोकळा उचलत) बाकी तुमची जनधन योजना आणि पीकविमा वगैरे योजना फर्मास आहेत... ढोकळ्यासारख्याच! 

सर नमोजी : (खुशीत) थेंक्‍यू! 

...या क्षणी आम्ही पाण्याचा गिलास आणि बिलाचा फोल्डर (बडीशेप समाविष्ट) ओभिजितबाबूंकडे सर्कवला आणि टिपच्या आशेने तिथेच उभे राहिलो. पण ओभिजितबाबूंनी बडीशेप ‘नोबेल’सारखी उचलत काढता पाय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT