Dhing Tang
Dhing Tang 
संपादकीय

एक हिरवट अरण्यवाचन! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

(मुंबई : 2050) 

बांदऱ्यापासून थेट दक्षिण मुंबईपर्यंत राखीव जंगलाचा कोअर एरिया पसरला आहे. तिथे पर्यटकांना परवानगी नाही. बांदऱ्याचा भाग तर पूर्वीपासूनच 'टायगर प्रोजेक्‍ट'मध्ये समाविष्ट होता. आता तेथे व्याघ्र संवर्धन आणि अंडी उबवणी केंद्र आहे. आता वाघ अंडी कधीपासून उबवायला लागला, असे तुम्ही विचारणार! (वाटलेच होते...तुम्ही म्हंजे ना अस्से...जाऊ दे!) वाघ कशाला अंडी उबवेल? व्याघ्र संवर्धन वेगळे आणि अंडी उबवणी केंद्र वेगळे!! पण लोकांच्या निसर्गाबद्दल गैरसमजुती असतात.

आता समजा, अंडी उबवणी केंद्राच्या बाजूलाच असलेल्या मातोसरीच्या पहाडावर वाघ नुसता उन्हे खात पडला असेल, तरी लोकांना वाटणार, हा अंडी उबवतोय! जाऊ दे. 
आधी हा भाग कलानगर म्हणून ओळखला जायचा. आता या भागाला व्याघ्रेश्‍वराचा माळ असे म्हणतात. मोठा निसर्गरम्य भाग आहे. जंगलाच्या मधोमध व्याघ्रेश्‍वराचे एक पुरातन देऊळ आहे. एक पुजारी रोज सायंकाळी इथे येऊन दिवा आणि दुधाचा नैवेद्य ठेवून जातो. एक ढाण्या वाघ इथे रोज रात्री बारा वाजता (चोरून) दूध पिऊन जातो, अशी अख्यायिका आहे. दुधात कॉम्प्लान घातलेले नसेल, त्या रात्री भयानक डरकाळ्या ऐकू येतात, असेही इथल्या आदिवासी पाड्यांवर राहणारे काही लोक सांगतात. असू दे. 

बांदरा ओलांडून दुर्गम पायवाटेने माहीमच्या (कृत्रिम) पाणवठ्यावरून थोडे पुढे आले की 'मोरनाचीचे पठार' लागते. पूर्वी इथे शिवाजी पार्कचे मैदान होते. इथे मोरांची वस्ती आहे. सदोदित त्यांची 'म्याओ, म्याओ' अशी केकावली सुरू असते. मोरांकडे न पाहता आपण पुढे जाऊ. न पाहता अशासाठी की ते कधी पिसारा फुलवून पाठ फिरवतील, भरवसा नाही!! आता इथून भायखळ्यापर्यंतची वाट कमालीची दुर्गम आहे. ऐन, आंबा, बदाम, चिंच, गुलमोहर, जांभूळ, करंज, कडुनिंब, पिंपळ, वड, बांबू, अंजन, अर्जुन, बेहडा, बेल, बोर, सीताफळ, गुळवेल, फणस, हिरडा, कवट, खैर, कांचन, नारळ, निलगिरी, साग आणि काजू अशा अगणित वृक्षांची ही निबीड वनराजी. बेहडा आणि हिरड्याच्या झाडाच्या खोडांवर तुम्हाला वन्य प्राण्यांनी नखांनी खरवडल्याच्या खुणा दिसतील. छे, छे, आपली सरहद्द मुक्रर करण्याचा तो वन्यजीवांचा मार्ग नाही. ती थिअरी जुनी झाली. हिरडा-बेहडा पोट साफ व्हायला फार उत्तम. अपचनाने हैराण झालेले वन्यजीव या झाडांशी झट्या घेतात, म्हणून या खुणा! हिरड्या-बेहड्यावर ओरखडे यायला लागले की वन्यजीव रक्षक इथल्या पाणवठ्यात पतंजलीच्या पाचक चूर्णाची पोती रिकामी करतात. ते पाणी प्यायले की मग वाइल्ड लाइफमधे सगळे ओके होते. असो. 

भायखळ्याला पूर्वी प्राणीसंग्रहालय होते. आता तिथे मानवसंग्रहालय आहे. सर्व प्राणी शनिवार-रविवारी तिथे पिंजऱ्यातली माणसे बघायला जातात. विशेषत: वानरांमध्ये या संग्रहालयाचे आकर्षण आहे. वानराचा वंशज म्हणून माणूस पाहिला जातो. इथून पुढे गेले की आपण अरण्याच्या दक्षिण टोकाला जातो. उजव्या हाताला जो पहाडी इलाखा दिसतो आहे, तो मलबार हिल एरिया म्हणून ओळखला जायचा. तिथे मंत्र्यांचे बंगले होते.- आता गुहा आहेत! मुख्यमंत्र्यांचे घर मात्र गुहेत नसून एका विशाल अंजन वृक्षावरचे मचाण आहे. आसपासच्या वेली-मुळे आणि पारंब्यांना धरून मंत्र्यांची मूव्हमेंट चाललेली असते. विजेच्या वेगाने 'ओऊ ओऊ ओऽऽऽ' अशा आरोळ्या ठोकत पारंब्यांना झोके देत टारझन गेल्यासारखे तुम्हाला वाटेल! पण तो टारझन नाही, ते मुख्यमंत्री आहेत!! पारंबी ट्रान्सपोर्टने ते थेट मंत्रालय कड्यापर्यंत जातात. 

...हे सारे कोणामुळे झाले माहीत आहे? पूर्वीच्या काळी इथे सुधीर्जी मुनगंटीवार्जी नावाचे वनसंरक्षक होते. त्यांनी चार कोटी झाडे मुंबईभर लावली!! सगळी मेली जगली!! मग काय होणार? जंगलच ना? मग म्हणा- 

जंगल जंगल पता चला है, 
जंगल जंगल बात चली है 
चड्‌डी पहन के कमल खिला है, कमल खिला है...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT