संपादकीय

शुगरमिठी आणि मगरमिठी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

मिठी हा शब्द उच्चारताच आम्ही गुदमरून जातो. ती उत्स्फूर्त गळाभेट आठवून अंग महिरते. हे हृदयीचे तें हृदयी डेटा ट्रान्स्फर होतो. जिवाशिवाची गाठ पडत्ये. एक अननुभूत थरार देहातून दौडत जातो. हल्लीची समाजमाध्यमे मिठी या विषयाला इतके कवटाळून कां बसली आहेत? हे आम्हाला पडलेले कोडे आहे. मिठी हा विषय संपूर्णत: वैयक्‍तिक असून, ‘दोघात तिसरा’ आला की प्रॉब्लेम होतो, एवढे साधे ह्या माध्यमांना कळू नये? अहह!! मिठी हे एकंदरीत प्रकरण दोघांचेच आहे. तिघा-चौघांनी एकदम मिठी मारण्याचा प्रयत्न प्राय: अपयशी ठरतो, असे आमचे प्रामाणिक मत आहे. इंग्रजीत त्यास ‘ग्रुप हग’ असे म्हटले जाते. हा शब्द उच्चारला की आम्ही एकेकाळी खोखो हसत असू. पण ते जाऊ दे. मिठी ह्याविषयी आमचा अभ्यासपूर्ण आवेग आजवर अनेकांनी वाखाणला आहे. फार प्राचीन काळी आम्ही अशी आवेगपूर्ण अपेक्षा अनुचित ठिकाणी व्यक्‍त केल्याने तीर्थरूपांनी गचांडी धरून पलीकडल्या बाजूस अनन्वित प्रहार केल्याची दुखरी आठवण आम्हास अधूनमधून सतावत्ये. घडले एवढेच होते, की आमच्या चाळीतील बारा नंबरच्या खोलीतील कु. बेबीनंदा हीस आम्ही ‘मेरे बाहो में समा जावोऽऽऽ...मेरी साँसों में गुम हो जावो’ अशा प्रेमयुक्‍त ओळींनिशी आलिंगनाचे आवाहन करणारी चिठ्ठी पाठवली होती. कु. बेबीनंदा ह्या निरागस बालिकेने आलिंगनाऐवजी सदर चिठ्ठी आमच्या तीर्थरूपांच्या मुठीत आणून दिधली. पुढील प्रसंग करुण आहे. त्याविषयी येथे चर्चा नको.

एखादे माणूस आवडले की त्यास आलिंगन द्यावे, ही अत्यंत नैसर्गिक अशी प्रेरणा आहे. आलिंगनाची ऊर्मी मानवास फार्फार प्राचीन काळापासून असावी, असे आमचे संशोधन सांगते. मिठी हे मानवी देहबोलीचे एक महत्त्वाचे अंग आहे. मिठीचे साधारणत: दोन प्रकार संभवतात. शुगरमिठी आणि मगरमिठी. ह्या दोन्ही मिठ्यांचे विविध उपयोग आहेत, तसेच तोटेही आहेत. ते येणेप्रमाणे : 

१. शुगरमिठी : हा प्रकार तुम्ही आधी ऐकला नसणार! पण, नावाप्रमाणेच हा प्रकार अतिगोड आहे!! अतिगोड खाणे मधुमेहाला वाईट!! त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी ह्या प्रकारापासून (दोन हात) दूर राहावे. ह्या मिठीसाठी सामान्य माणसे धडपडत असतात. शुगरमिठीत बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. परंतु, त्या सर्वांची चर्चा करणे येथे अप्रस्तुत ठरावे. शुगरमिठीसंदर्भात आमचा अभ्यास दांडगा असला, तरी प्रात्यक्षिकामध्ये आम्ही अंमळ कमी पडतो, हे कबूल करू. अर्थात, आम्ही ध्यास सोडलेला नाही! संधी मिळताच अभ्यासवर्ग घेण्याइतपत आम्ही धाडशी स्वभावाचे आहो!! परंतु, शुगरमिठीचा गोडवा चाखण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले, पण ते अंगलट आले...असो. 

१. मगरमिठी : हा मिठीचा एक आक्रमक पवित्रा मानावा लागेल. मगर हा उभयचर प्राणी मिठी मारताना आम्ही अद्याप पाहिलेला नाही. परंतु, हा मिठीप्रकार त्याच्या नावावर कां गेला? हे आम्हाला पडलेले एक कोडे आहे. मगर ह्या प्राण्याची ठेवण मिठी मारण्यासाठी सोयीची नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. तथापि, ह्या मिठीसाठी हात पसरणाऱ्याच्या मनात हिंसात्मक विचार असावेत, असे आढळून येते. मगरमिठी कशी मारावी? ह्याचे टेक्‍निक आहे. ताडताड चालत जावे. बसलेल्या व्यक्‍तीला ‘उठ, ऊठ’ असे घाईघाईने सांगावे. तो माणूसही मगरमिठीच्या तंत्रात निष्णात असेल, तर जागचा अजिबात उठणार नाही, ही काळ्या दगडावरची !! मग बसल्याजागीच त्याला कवटाळून कार्यभाग साधून पुन्हा ताडताड चालत येऊन डोळा मारावा!!...ह्या एवढ्या प्रक्रियेस मगरमिठी असे म्हणतात.

...शुगरमिठीपेक्षा मगरमिठीचे लाभ अधिक आहेत, हे सांगणे नलगे. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT