America Bus Toilet
America Bus Toilet sakal
संपादकीय

टॉयलेट : सुखद अनुभव

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अर्चना ठोंबरे

प्रवासात असताना लघवी, शौच अशा क्रियांसाठी सुरक्षित, पुरेशी आणि स्वच्छ सुविधा नसणे ही आपल्याकडील मोठी समस्या आहे. त्यामुळे सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक हाल होत असतात. पण बोलणार कोण? सांगणार कोणाला? असे प्रश्‍न असतात. त्याने समस्या अधिक त्रासदायक होते.

टॉयलेट - सुखद अनुभव! हे लेखाचे नाव वाचून थोडे आश्चर्य वाटणार, पण अनुभवच इतका छान... लिहिल्याशिवाय नाही राहवले. अमेरिकेवरून मुलींना भेटून मागीलच आठवड्यात भारतात परत आले. शिकागो विमानतळावरून मोठी मुलगी गौतमीच्या विद्यापीठामध्ये अरबाना येथे (१४० किलोमीटर) जाताना लोकल ट्रान्सपोर्ट बस घ्यावी लागते. लंडनवरून विमान अगोदरच दोन तास उशिरा निघल्यामुळे शिकागोला पोहोचण्यासाठी रात्री उशीर झाला होता.

लगेच बसमध्ये बसले. गौतमीने लगेच सांगितले की, १७-१८ तास प्रवास झाला आहे. पाणी भरपूर घे आणि झोपून घे! पाणी आणि प्रवासात हे एकत्र विचार करायला भीती वाटली, पण क्षणिकच. कारण माहिती होते बसमध्ये टॉयलेट आहेच! अतिशय स्वच्छ, अगदी टिशू पेपर, हँडवॉश, सॅनिटायझर असलेले छोटे टॉयलेट माझ्यासाठी सुखद अनुभव होता.

माझ्या देशात आणि इतर देशात तुलना करण्याचा लेखाचा हेतू नक्कीच नाही. पण व्यक्तीच्या एका मूलभूत आणि प्राथमिक गोष्टीसाठी सुविधा उपलब्ध असणे हे महत्त्वाचे आहे आणि म्हणून हे लेखन.

समस्यांनी दोघेही त्रस्त

आपल्या येथे रेल्वेसेवा अतिशय उत्तम आहे. टॉयलेट असल्यामुळे स्त्री किंवा पुरुष यांची गैरसोय होत नाही. पण रेल्वेचे आरक्षण अगोदर करून ठेवायला लागते. पण अचानक काही कारणांमुळे प्रवास करावा लागला तर रेल्वेचा आरामदायी पर्याय उपलब्ध नसतो, तसेच अजूनही ग्रामीण भागातून एका गावातून दुसऱ्या ठिकाणी किंवा शहराकडे येण्यासाठी सर्वसामान्य जनतेला बस किंवा खासगी ट्रॅव्हल्स बसशिवाय पर्याय नसतो.

हा प्रवास म्हणजे रात्री झोपण्याच्या वेळेत असला तरी १२ ते १८ तास! प्रवासात एकदा ते दोनदा तरी लघवी आणि सकाळी शौचाला जाणे हे आलेच. ठरलेल्या ठिकाणी एसटीच्या बस किंवा खासगी बस थांबतातही, पण त्याव्यतीरिक्त थांबाही नसतो. सुरक्षितता किंवा वेळेत पोचण्यासाठी पण मध्येच सारखे सारखे बस थांबविणे योग्य नसते. पण याला पर्याय काय?

मी स्त्री म्हणून लिहिते आहे; पण पुरुषांना पण टॉयलेटसाठी त्रास अनुभवायला लागतो. फरक एवढाच असतो की, तो पटकन चालकाला सांगू शकतो, अगदी चालकाने नाही ऐकले तर आवाज चढवून गाडी थांबवू शकतो. रस्त्यावर कोठेही पाठमोरे उभे राहून त्याची ही मूलभूत व प्राथमिक गरज काही वेळा तरी पूर्ण होते.

पण वयस्कर पुरुषांमध्ये त्यांची प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असते. त्यामुळे त्यांना अधिक वेळा लघवीला जावे लागते. मधुमेही व्यक्तीलादेखील अधिक वेळा लघवीला जावे लागते. काही वेळा बस थांबवत नसल्यामुळे मी स्वतः अशा व्यक्तींची अस्वस्थता बघितली आहे.

प्रवास, अडचणी आणि कोंडी

आम्हा महिलावर्गाबद्दल तर काय बोलावे? लघवीसाठी बस कशी थांबवायला सांगायची, हाच तिच्यासाठी फार मोठा प्रश्न असतो. असे होऊ नये म्हणून ती काय काय करते. घरातून निघण्याच्या दोन तास अगोदरपासून पाणी कमी पिण्याचे सुरू करते. अगदी भर उन्हाळ्यामध्येही तहान लागलेली असूनदेखील लहान-लहान घोट पाणी घ्यायचे म्हणजे लघवी लागणार नाही.

मग दुसऱ्या दिवशी पाणी कमी घेतल्यामुळे अनुभवलेला त्रास हा अजून वेगळाच असतो. लघवीला जळजळ होणे, डोके दुखणे इ. बसच्या ठरलेले थांबे सोडून जर चालकाला विनंती करून बस थांबलीच तरी प्रश्न आहेच. कारण रस्त्यावरून इतर वाहने दिवसाही जात-येत असतात आणि रात्री तर त्यांच्या उजेडाच्या प्रकाशात धड तिला लघवीसाठी खाली बसताही येत नाही.

बसमधून कोणी बघत असेल का? हा विचार सारखा मनात घोळत असतो. अंधार असल्यामुळे बसपासून फार दूरदेखील जाता येत नाही. त्यामुळे तिचे शारीरिक हाल होतातच, पण मानसिक कोंडीसुद्धा होते. अशा परिस्थितीमध्ये मुली किंवा स्त्रीची पाळी आलेली असेल तर तो त्रास अजूनच वेगळा असतो. कारण पाणीही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत वैयक्तिक स्वच्छता ही बाब फार दूरची गोष्ट असते.

सुलभ शौचालयाच्या सुविधेमुळे बस स्थानकांवर काही ठिकाणी खरंच चांगली सुविधा निर्माण झाली आहे. पण अशी सुविधा सर्व ठिकाणी असतेच असे नाही आणि प्रवासात बसमध्ये तर नाहीच नाही. पण बसथांबा जिथे असतो तिथेही बऱ्याच ठिकाणी टॉयलेटमध्ये पाणीच उपलब्ध नसणे ही नक्कीच व्यथा आहे.

सर्वांची पण मुख्यतः महिलांसाठी मूलभूत आणि प्राथमिक असलेली ही गरज ‘राइट टू पी’ मोहिमेंतर्गत आता मोफत, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. पण प्रवासामध्येही तिची तसेच इतरांचीही अतिशय महत्त्वाची गरज ओळखून अशावेळी त्याबाबतच्या सुविधा उपलब्ध होण्याची नितांत गरज आहे. ते लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT