drama artist theatre mahabharat lalit kala kendra ftii
drama artist theatre mahabharat lalit kala kendra ftii Sakal
संपादकीय

‘अभिव्यक्ती’ हा अपराध नव्हे; ‘दमन’ हा अपराध!

सकाळ वृत्तसेवा

- सुनील सुकथनकर

‘‘आमच्या धाकूमामांनी मला रंगपटात नेलं. तिथे द्रौपदी आधीच वस्त्रहरण झाल्यासारखी नुसतीच चोळी घालून तंबाखू मळत उभी होती. तेव्हापासून नाटक हे काहीतरी खोटं प्रकरण आहे, असं जे काही मनानं घेतलंय ते आजतागायत.’’ - पु. लं. देशपांडे, असा मी असामी.

हे पुस्तक १९६४ पासून वाचकप्रिय आहे, आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. त्यामुळे ‘कुठे गेली ही विनोदबुद्धी’ असा प्रश्न पडायचं खरंतर कारणच नाही. रंगपटामागे असणारे नट आणि त्यांच्या व्यक्तिरेखा, अगदी त्या नटाचा त्यावेळी ‘द्रौपदी’ असा उल्लेख (द्रौपदीचे काम करणारा नट- असं न लिहिता), तंबाखू खाणे- अश्या विसंगतीतून विनोद निर्माण होतो- हे आपण जाणतो.

तरी ललित कला केंद्रात ‘राडा’ का होतो? आणि एरवी वरील पुस्तक वाचून हसणारेही त्या ‘राड्या’च्या समर्थनात का उतरतात? याचे उत्तर पक्षीय-राजकीय उद्देश आणि आपल्या विचारसरणीची दहशत निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेमध्ये आहे.

अस्मिता दुखावली जाणे, हे शोधलेले निमित्त आहे. दरवर्षी भयानक डेसिबल्समध्ये गणपती या बुद्धीच्या देवतेसमोर चाललेला ओंगळपणा, मंडळांची दादागिरी, वृद्ध किंवा आजारी लोकांच्या धुडकवलेल्या अर्ज-विनंत्या, यांनी कोणाही हिंदूंच्या भावना जर दुखावल्या जात नसतील तर त्या तश्या निबर आहेत, हे त्यांनी मान्य करावं!

अवकाश आक्रसण्याचा प्रयत्न

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि ललित कला केंद्र यांमध्ये झालेल्या दंग्यानंतर त्याच्या समर्थनार्थ उतरलेल्या सर्वांचे एकमेव विधान हेच आहे - ‘आता आम्ही ठरवू, काय चालणार आणि काय नाही’.

या सगळ्या पाठीमागे ‘अशा शिक्षणसंस्था आम्ही डाव्यांच्या हातात जाऊ देणार नाही’, हा खरा आविर्भाव आहे. डावे विचार ही एक ‘वळवळ’ आहे, अशा धारणेतून हा आवेश जन्म घेतो. मी स्वतः ‘एफटीआयआय’मध्ये शिकलो.

एका मध्यम वर्गातून आलेल्या साध्या मुलाला संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे काय, हे तिथे उमजलं. विद्रोहीपणा, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची शक्यता, त्यासाठी चालू व्यवस्थेतल्या त्रुटींचा अभ्यास करण्याची प्रेरणा, त्याचबरोबर स्वतःला तपासून बघण्याची गरज आणि हे सारं बिनधास्त अभिव्यक्त करण्याचा अवकाश- हे सारं मला माझ्या शिक्षणसंस्थेनं दिलं.

आज आपली विचारसरणी मानणारी मंडळी व्यवस्थापनात घेऊन हाच अवकाश आक्रसण्याचा प्रयत्न सर्वत्र होताना दिसतो आहे. या सर्वांना विद्यार्थी चळवळ म्हणजे जणू देशद्रोह वाटतो. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून आलेले ‘अर्बन नक्षल’, ‘टुकडे टुकडे गँग’ असे शेलके शब्द तोंडावर फेकले जातात. ते ‘फेक’ म्हणजे खोटे आहेत हे सिद्ध होऊनही फरक पडत नाही.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राममंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यादिवशी पुण्यात तरी अनेक ठिकाणी उत्सवी, उत्साही आणि अनेक ठिकाणी उन्मादी वातावरण होतं. गृहरचनासंस्थांमध्ये यात सामील न होणाऱ्यांकडे बहिष्काराच्या जळजळीत नजरांनी पहिलं जात होतं. ‘आज सारा देश एकत्र आला असताना तुम्ही का करंटेपणा करता आहात’, असा दरडावणीवजा प्रतिवाद केला गेला.

खरंतर अनेकांना यादिवशी रथयात्रा, मशीद पाडणे, झालेल्या दंगली, गमावलेले जीव, भाजप या पक्षाचे सत्तारूढ होणे, न्यायालयीन लढाई हा सारा प्रवास आठवून खिन्नही वाटत होतं. याच भावनेतून ‘एफटीआयआय’मध्ये कोलाज-फलक हातात धरून विद्यार्थी उभे राहिले.

ज्या माझ्या संस्थेत मला आज दारावर बंदूकधारी जवान अडवतात, नोंद करून आतल्या अधिकाऱ्यांनी होकार दिला तरच सोडतात, त्या प्रांगणात भगवे उपरणेधारी समूह मुक्तपणे आत शिरून विद्यार्थ्यांना मारहाण करतो. मारहाण करणाऱ्यांवर क्षुल्लक गुन्हे दाखल होतात- तेही उशिरा आणि विद्यार्थ्यांना मात्र गंभीर आरोपांना तोंड द्यावं लागतं.

सहिष्णुता- समंजस औदार्य

ललित कला केंद्रात याच २२ जानेवारीची आठवण ताजी असताना रामलीलेचं विडंबनात्मक नाटक होऊच कसं शकतं- म्हणून दंगा होतो. तोही नाटक पूर्ण न होताच. यातही विद्यार्थी आणि विभागप्रमुख यांना पोलिस यंत्रणा गुन्हेगारासारखी वागणूक देते.

या विषयी समाजमाध्यमांवर चिंता व्यक्त करणाऱ्यांची आय-माय उद्धरली जाते. कारण ‘आता आम्ही आमच्या दैवतांची विटंबना चालवून घेणार नाही.’ नाटकात (राम-लक्ष्मण-सीता यांची कामं करणाऱ्या पात्रांच्या तोंडी) शिव्या कश्या दिल्या, असा जाब समाजमाध्यमांवर त्याच शिव्या वापरून मागितला जातो.

या गदारोळात ‘मुस्लिम नाहीतर ख्रिश्चन हे चालवून घेतील का’, ‘सर तन से जुदा’ असा फतवा निघेल- असाही एक उंच स्वर आहे. मेल ब्रुक्स या ज्यू दिग्दर्शकाने किंवा मॅंटि पायथॉन सारख्या विनोदवीराने ख्रिश्चन धर्माची

अगदी अश्लील वाटेल अशी पण बुद्धिमान टवाळी केली आहे. मुस्लिम धर्माविषयी मात्र व्यक्त होण्याची जबर किंमत ‘शार्ली एब्दो’च्या संपादकांना जीव गमावून द्यावी लागली. आज ललित कला केंद्रातल्या घटनेला गंभीर स्वरूप देणारे या भयानक संदर्भाला उजाळा देत आहेत.

खरंच, सामान्य हिंदू माणसाला आपला धर्म हा ज्या सहिष्णूपणाचा रास्त अभिमान बाळगत होता, तो आज लाजिरवाणा वाटू लागला आहे? मला नाही वाटत.

सहिष्णुता ही दुर्बल व्यक्तीने पुढे केलेली सबब नाही तर प्रगल्भ सक्षम व्यक्तीने दाखवलेलं समंजस औदार्य आहे. त्याचा अभिमान वाटायला हवा. म्हणून ज्यांना ज्यांना समाज असहिष्णू व्हावा असं वाटत नाही, त्यांनी निर्भयपणे व्यक्त व्हायला हवं. जे निर्भयपणे बोलताहेत त्यांना निदान साथ तर द्यायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT