संपादकीय

परदेशातही अजिंक्‍य राहावे! (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

खरे तर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या धरमशाला येथील वातावरण हे पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघासाठी अधिक अनुकूल होते आणि पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणण्याची कांगारूंची जिद्दही सर्वपरिचित! तरीही भारतीय क्रिकेट संघाने, विशेषत: लोकेश राहुल व कर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी संयमाने खेळ केला आणि मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर थेट हिमालयात विजयाची गुढी रोवली. हा विजय सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. एकतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या नऊच्या नऊ देशांविरुद्ध मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताच्या नावावर जमा झाला आहे. विजयाचा हा सिलसिला २००५मध्ये झिंबाब्बेला हरवून सुरू झाला आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यामुळे सलग सात मालिका जिंकल्याची आणखी एक नोंद भारताच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जमा झाली आहे! या यशाला आणखी एक पदर आहे आणि तो म्हणजे गेली दोन-अडीच वर्षे क्रिकेटची मैदाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर दणाणून सोडणारा भारताचा यशस्वी कर्णधार विराट कोहली जायबंदी झाल्यामुळे धरमशालात तंबूत बसून आपल्या खेळाडूंचा जोष बघत होता. विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्‍य रहाणेने आपल्या नेतृत्वाची चुणूक तर या सामन्यात दाखवलीच; शिवाय ऐनवेळी आपल्या क्षेत्ररक्षणाचे, तसेच फलंदाजीचे पाणीही दाखवून दिले. अजिंक्‍यच्या रूपाने सचिन तेंडुलकरनंतर १७ वर्षांनी प्रथमच एका मुंबईकराच्या हाती भारताचे कर्णधारपद आले होते आणि त्याने त्या संधीचे सोने केले. 

भारतीय विजयाची सलग सुरू असलेली मालिका घरच्याच खेळपट्ट्यांवर आणि भारतीय चाहत्यांच्या गर्दीत खेळवली गेली होती, अशी टीका होऊ शकते आणि ती सुरूही झाली आहे. मात्र, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी या अशा टीकाकारांचा, ‘हे सारे सामने घरच्याच खेळपट्ट्यांवर खेळले गेले असले, तरी प्रत्येक खेळपट्टी आणि तेथील वातावरण हे पूर्णपणे वेगवेगळे होते!’ अशा रास्त शब्दांत समाचार घेतला आहे. पुण्यातील पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर आपण हा विजय खेचून आणला आणि त्यापलीकडली आणखी एक बाब म्हणजे भारतीय संघाचा संपूर्ण चेहरामोहरा या मालिकांमधून बदलून गेला आहे. अजिंक्‍य रहाणेपासून रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा, उमेश यादव असे अनेक अनोखे नवे चेहरे या यशाच्या मालिकांमधून पुढे येत गेले. धरमशालाच्या कसोटीने तर कुलदीप यादव नावाचा एक ‘चायनामन’ भारतीय संघाला मिळाला. दोन-पाच वर्षांपूर्वीपर्यंत आपला संघ हा सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे अशा ‘स्टार’ खेळांडूंचा संघ म्हणून ओळखला जात होता. आता हा संघ ‘भारतीय संघ’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुख्य म्हणजे पूर्वी हे ‘स्टार’ कधी अपयशी ठरले, तर अख्खा संघ त्या तडाख्याने गारद होत असे. आता तसे होत नाही; कारण वृद्धिमान साहापासून जडेजापर्यंत तळाचे ‘फलंदाज’देखील भल्या भल्या परदेशस्थ गोलंदाजांना तडाखे देऊ लागले आहेत. त्यात जडेजाच्या रूपाने तर या मालिकांमधून भारताला विजयाचा परीसच गवसला आहे. जडेजा संघात आला, तेव्हा रविचंद्रन अश्‍विन आपल्या तेजाने तळपत होता! मात्र, या मालिकेत जडेजाने सर्वाधिक २५ बळी तर घेतलेच; शिवाय दोन अर्धशतकांसह त्याने काढलेल्या एकूण १२७ धावांचे मोलही या विजयश्रीत मोठे आहे. पुजाराने एका द्विशतकासह या मालिकेत ५७.८५च्या सरासरीने ४०५ धावा ठोकल्या आणि वृद्धिमाननेही एक शतक झळकवले. ही सारीच नावे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर नोंदली गेली आहेत.

विजयाच्या या जल्लोषात हुरहूर लावणारी एक बाब म्हणजे विराटची या मालिकेत म्यान झालेली बॅट. तीन कसोटींतील पाच डावांत मिळून त्याला अवघ्या ९.२ या मानहानिकारक सरासरीने केवळ ४६ धावा फटकावता आल्या. मात्र, कोहली न खेळताही जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या मनात आलेला अमाप आत्मविश्‍वास ही या विजयी मालिकेची आणखी एक देनच म्हणावी लागेल! ऑस्ट्रेलियातील मालिका आणि ‘स्लेजिंग’ या अविभाज्य बाबी. त्याचे गालबोट या मालिकेलाही लागलेच; पण त्याचा फारसा विचार न करता ‘टीम इंडिया’ने उत्तम खेळ केला. आता ‘आयपीएल’ची सर्कस सुरू होईल आणि भारतीय संघातील खेळाडूंबरोबरच नवोदित भारतीयांनाही परदेशस्थ खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या अनुभवात मोठीच भर पडेल. त्या जोरावर भारतीय संघाने परदेशातही आपले अजिंक्‍यपद कायम ठेवावे, याच शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT