संपादकीय

पतंग आणि माणूस

- महार अरणकले

आकाशाच्या निळाईवर पतंगांच्या अनेक चित्राकृती बेभान होऊन नाचत होत्या. वर-खाली, इकडं-तिकडं. पतंग जिकडं जातील तिकडं त्यांना नृत्याचे वेगवेगळे विभ्रम मिळत होते. अंगात वारं संचारल्यासारखे ते भरारणाऱ्या लाटांवर हेलकावत होते. शेपटीवाले पतंग तर जणू धावणाऱ्या आकृतीच रेखाटत होते. पतंग शिवाशिवी खेळत होते. लपंडावातही दंग होते. आंधळी कोशिंबीर खेळावी, तसे चाचपडतही होते. वारं संथ झालं म्हणजे एखाद्या खुर्चीत बसल्यासारखे गप्पागोष्टींत दंग होत होते. शेजाऱ्यांशी भांडत होते.

दुसऱ्यांच्या कुरबुरीत स्वतःहोऊन ओढले जात होते. गिरक्‍यांच्या लडिवाळ ताना घेत होते. टिपेचा उंच सूर लावीत होते. वाऱ्याच्या कडेवरून खाली उतरत होते. खोडकर मुलांसारखे धूम ठोकत होते. पाखरांना घाबरवीत होते. वावटळीनं बाजूनं फेर धरला, की स्वतःचं अंग आक्रसून घेत होते. वाऱ्याच्या दिशांशी दोन हात करताना मोडून गेले, तरी धावण्याचा वेडेपणा सोडत नव्हते. पतंग वाऱ्याच्या पृष्ठभागावर संथ लयीत होड्यांसारखे हेलकावत होते. कधी लाटांसारखे उसळत होते. महापुराचं पाणी धावावं, तसे वेगाचं पिसं अंगोपांगी वागवीत होते. 

मकर संक्रांतीच्या दिवशी आकाशाच्या चौकोनात ठिकठिकाणी थोड्याफार फरकानं हेच दृश्‍य दिसत होतं. उंचावलेले पतंग स्पर्धेच्या ओढीनं जीवघेण्या कसरती करीत होते. सगळ्यांत उंचावर गेलेल्याला खाली खेचण्यासाठी आजूबाजूनं दुसरे पतंग धडपड करीत होते. हात उंचावत होते. बाहू पसरून दुसऱ्या उंच पतंगाला पकडू पाहत होते. उंचीवरला पतंग जवळच्या टप्प्यात आल्यासारखा दिसताच, पुन्हा दूर पळत होते. एखाद्या पतंगाची शिकार टिपली गेल्याचं चित्र आकाशाच्या कागदावर लगेचच रेखाटलं जात होतं.

शिकार झालेल्या पतंगाच्या चेहऱ्यावर रडू कोसळल्याचं एकाकीपण भरून आलेलं दिसत होतं. घाबरलेपणाच्या रेषांचं जाळं त्या पतंगावर जमा होत होतं. आधीचा उन्मत्तपणा कुठल्या कुठं घरंगळून जात होता. काटाकाटीत तुटलेला पतंगाचा दोरा सैरभैर होऊन गेल्यासारखा हेलकावे घेत राही.

तुटलेल्या पतंगाला सावरण्यासाठी तो वेड्या आशेनं त्याच्या मागं धावण्याचा प्रयत्न करीत राही. वाऱ्यावादळात ही भेट अशक्‍य असल्याचं स्पष्ट दिसत असूनही दोरा आधाराचे हात घेऊन हळवेपणानं त्याचा पाठलाग करीत राही. 

उंचावणाऱ्या इतर पतंगांना त्यांच्या जगातल्या या वास्तवाची जाणीवही नसे. उंच, अधिक उंच, दुसऱ्यापेक्षा उंच हेच त्यांच्या लेखी आनंदनिधान असे. वाऱ्यावर उसळणाऱ्या अवखळ पतंगानं दिलेले धक्के सहन करून थकलेला दोरा या रेटारेटीत चित्रातून कधी पुसून जाई, त्याची दखल कुणालाच नसे. उंचावर गेलेल्या पतंगाला आधाराच्या दोऱ्याचं महत्त्व कधीच कळत नाही; आणि दोरा तुटून गेल्यावर त्याला सावरणारा आधारच उरत नाही. 

माणसाचं आयुष्य आणि पतंगाचं आयुष्य किती सारखं असतं नाही? म्हणूनच आधार कधी निराधार होऊ देऊ नका. हसणाऱ्या फुलांमागं कोवळ्या पानांचा आधार असतो. फुलांचं हसू या पानांच्या आशेचे मंगल सूर असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT