संपादकीय

राजमार्ग

मल्हार अरणकल्ले

कस्तुरीच्या गंधाच्या ओढीनं हरिण धावू लागतं. थकून जातं; पण काही केल्या त्याला कस्तुरी सापडत नाही. सुई घरातील अंधारात हरवली, तरी गोष्टीतल्या आजीबाई घराबाहेर प्रकाशात जाऊन तिचा शोध घेऊ लागतात; पण त्यांना सुई तिथं थोडीच सापडणार? स्वतःजवळ जे आहे, त्याचा शोध आपणही असाच बाहेर, दुसरीकडं कुठं तरी घेत राहतो; आणि फसतो. 

एक मार्मिक गोष्ट आहे. सकाळच्या उन्हात एक मुलगा अंगणात खेळत होता. उन्हात पडलेली स्वतःची सावली मुलाला पकडायची होती. तो धावला, की सावलीही धावे, त्यानं उडी घेतली, की सावलीही उडी घेई. खूप प्रयत्न करूनही त्याच्या हाती सावली येत नव्हती. बिचारा रडवेला झाला होता. तिथून जाणारे एक संन्यासी मुलाचा खेळ पाहत होते. मुलाकडे पाहून ते खळखळून हसले. त्याच्या जवळ गेले; आणि म्हणाले - जन्मोजन्मी मी हेच करीत गेलो. तूही तेच करतो आहेस. आता मला सावली पकडायची युक्ती सापडली आहे! मुलाला आश्‍चर्य वाटलं. त्यानं स्वामीजींकडं हट्ट धरला - मलाही ती युक्ती सांगा म्हणून. स्वामीजींनी मुलाचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोक्‍यावर ठेवला. मुलानं पाहिलं, तर तिकडं सावलीच्या डोक्‍यावरही तसाच हात ठेवला गेला होता. सावली पकडल्याच्या आनंदात मुलगा तिथून उड्या मारीत निघून गेला. 

सावल्या पकडण्याचा खेळ नकळत आपण सगळेच करीत असतो. सावल्या सतत चकवीत राहतात. कालांतरानं आयुष्याची संध्याकाळ दाटून येते; पण हात मात्र रितेच राहिलेले असतात. आजीबाईंनी किंवा मुलानं जे केलं, तेच आपण करू पाहतो. आता तर आपल्या भोवती अनेक सावल्या वाकुल्या दाखवीत उभ्या आहेत. नवनव्या सावल्यांची भर त्यांत सतत पडत आहे. हातांतलं खेळणं टाकून लहान मूल दूरचं खेळणं ओढण्यासाठी धावत राहतं; आणि ते हाती येताच आणखी दुसरीकडं झेपावतं. आपलं हे असलं मूलपण अजून कुठं संपलं आहे? आणि खरोखर ते कधी संपणार तरी आहे? हव्यासाच्या सावल्यांचं जंगल आपल्याला वेढून टाकतंच आहे; आणि त्या पकडण्यासाठी आपण ऊर फुटेपर्यंत धावतो आहोत. 

अमूक एक हवं, ते तितकं हवं, ते तसलंच हवं, ते अमूक एका वेळेलाच हवं... धावण्याची किती तरी कारणं आपली दमवणूक करीत आहेत. सगळं मिळविण्याच्या क्षमता स्वतःमध्येच लपलेल्या आहेत; पण हे आपल्याला उमजत नाही. मुलानं डोक्‍यावर हात ठेवला आणि सावली हाती आली; तसंच आपण आत्मविश्वास हाती घेत नाही, तोपर्यंत सावल्या दूर धावतच राहणार. आपल्या क्षमता एकवटल्या, प्रयत्नांचे सोपान पायांखाली घातले, तर या सावल्या आपल्यालाही पकडता येतील. 

आपली सावली जशी आपल्याबरोबरच असते, तशाच भरीव-वेगळं काही करण्याच्या क्षमताही आपल्या साथीदार असतात. त्यासाठी ठामपणाचा, निर्धाराचा हात छातीवर ठेवून त्यांचं सहकार्य घ्यायला हवं. सावल्यांच्या दाट जंगलातही आपण ध्येयापर्यंत जाणारा राजमार्ग तयार करू शकतो. अगदी हमखास.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT