Dhing-Tang
Dhing-Tang 
संपादकीय

ढिंग टांग : पाच वाक्‍ये!

ब्रिटिश नंदी

गेले काही दिवस फार्फार धकाधकीचे गेले. सारे ठरल्याप्रमाणे घडले. जे ठरले होते, ते घडून गेले. पण यापुढे जे काही घडेल, ते ठरलेले नसेल! गेल्या काही आठवड्यांत काही निवडक नेत्यांनी काही महत्त्वाची वक्‍तव्ये केली. वरकरणी ती नुसतीच वक्‍तव्ये आहेत, असे कोणाला वाटेल. (तशी ती असतीलही, पण-) राजकारणात नुसत्या वक्‍तव्याला काहीही अर्थ नसतो. त्याच्या ‘दोन ओळींच्या मधले’ वाचावे लागते. ते वाचता आले तरच खरे, नाहीतर कार्यभाग बुडालाच म्हणून समजा!! म्हणूनच अशी काही महत्त्वाची वक्‍तव्ये आणि त्यांच्या ‘दोन ओळींच्या मधल्या’चा अन्वयार्थ विशद करण्यासाठी आम्ही इथे आज बसलो आहो. 

१. मी इथं नशिबाने आणि भाग्याने आलो. इथे येईन असं कधी म्हटलं नव्हतं, तरीही आलो!
अर्थ : असे उद्‌गार काढणाऱ्याने मंत्रालयावर अखेर भगवा फडकवलाच, यावर विश्‍वास ठेवणे कठीण. बांदऱ्याच्या बंगल्यातून शेवटी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाणे सदर नेत्यास भाग पडले. करम की गती न्यारी, बंधो! ‘इथे येईन’ असे त्यांनी आधी म्हटले नव्हते, तरीही आले!! आड्रेस चुकला, पण तरीही मुक्‍काम गाठलान! कठीण शब्दांचे अर्थ : नशीब : भाग्य, भाग्य : नशीब, इथे : तिथे, येईन : आलो! 

२. मेरा पानी उतरते देख घर मत बसा लेना, समंदर हूं, फिरसे लौटकर आऊंगा!
अर्थ : स्वत:ला समंदर म्हणवून घेणारे हे कविमहाशय स्वभावाने किती खारट असतील, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे! या शेराच्या सुरवातीला ‘अबेऽऽ’ हा खास नागपुरी शब्द होता, परंतु, तो काही कारणास्तव वगळण्यात आला आहे. शायर म्हणतो की ओहोटी लागलेली पाहून (लेको) घरे बांधू नका! याचा अर्थ आपल्या (पक्षाला) ओहोटी लागली आहे, ही कबुली इथे ‘दोन ओळींच्या मध्ये’ आहेच! कठीण शब्दांचे अर्थ : पानी : पाणी, समंदर : समुद्र (अरबी), फिरसे (पुन्हा) आऊंगा : येईन!

३. आरे वनातील मेट्रो कारशेडच्या कामाला मी स्थगिती देत आहे. तिथली झाडं काय, एक पानदेखील तोडू देणार नाही!
अर्थ : उंच पाठीच्या खुर्चीत बसलेला माणूसच असे उद्‌गार काढू शकतो. कारशेडच्या कामाला स्थगिती असली तरी मेट्रोच्या कामाला नाही, हे इथे लक्षात घ्यायला हवे. म्हणजेच शिकारीला परवानगी आहे, पण प्राण्यांची हत्या होता कामा नये! आरेवनातील अडीचेक हजार झाडे ऑलरेडी तोडली गेली आहेत. आता तिथे पानदेखील उरले नाही! फारतर तिथल्या मोकळ्या जागेत टहलताना बनारसी पान चघळता येईल!! कठीण शब्दांचे अर्थ : आरेवन : आरे येथील वन, मेट्रो : मेट्रो, कारशेड : एक प्रकारचे छप्पर, स्थगिती : स्टे.

४.  मी पुन्हा येईन असे म्हटले होते, पण टाइमटेबल सांगितले नव्हते!
अर्थ : हे वाक्‍य महाराष्ट्राने मनावर घेतले पाहिजे. फार्फार भयंकर अर्थ त्यात भरलेला आहे. यात ‘बघून घेईन’ हे वाक्‍यसुद्धा दडलेले आहे. कठीण शब्दांचे अर्थ : पुन्हा : वापस, टाइमटेबल : एक प्रकारचे मेज!

५ : आता पुढे काय?
अर्थ : हे वाक्‍य आपल्या सर्वांच्या मनातले आहे! गेले महिनाभर जो काही लोकशाहीचा डान्स आयटेम आपण सर्वांनी पाहिला, त्यावरची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे! आता पुढे काय? यामध्ये खचलेल्या मनाचा सूर आहे, भविष्याबद्दलचे कुतूहल आहे आणि एक प्रकारची तटस्थ वृत्तीदेखील आहे! टीव्हीवरील नेहमीच्या मालिकांकडे वळण्याची वेळ आली, एवढाच त्याचा अर्थ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT