Arvind kejriwal
Arvind kejriwal esakal
editorial-articles

अग्रलेख : अटकेचा ‘अंमल’ चढला...

सकाळ वृत्तसेवा

कथित मद्य गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल यांना झालेल्या अटकेमागे राजकीय हिशेब मांडण्याचे आणि चुकते करण्याचे डावपेच दिसतात. त्यामुळे या प्रकरणी सत्य बाहेर येणार का, हा प्रश्‍नच आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन हे खरे तर देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने एक व्यापक उद्दिष्ट आहे, याविषयी कोणाचेही दुमत होणार नाही. परंतु आपल्याकडील सत्ताधारी आणि विरोधक एकूणच या विषयाकडे निव्वळ राजकीय फायद्या-तोट्याच्या चष्म्यातून पाहात आले आहेत. त्याचे सर्वांत ठळक उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने केलेली अटक.

त्यातली नाट्यमयता, त्यानंतर उमटलेले संतप्त पडसाद, त्यावर सुरू असलेले राजकारण पाहता सत्य बाहेर येण्यात खरोखर कोणाला रस आहे की फक्त धुरळा उडवायचा आहे, अशी शंका येते. केंद्रातील सत्ताधारी आणि नवी दिल्ली या राज्यातील सत्ताधारी यांच्यातील हे घमासान भ्रष्टाचार निर्मूलनाच्या हेतूने चालले आहे की, राजकीय हिशेब मांडणे आणि चुकते करणे, यासाठी चालले आहे, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

दिल्ली सरकारच्या कथित मद्य गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीच ‘ईडी’ने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर गेली काही महिने याच तपासयंत्रणेने थेट ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. स्वत: केजरीवालही आपल्याला अटक करण्यासाठीच केंद्र सरकार ‘ईडी’चा वापर करत आहे, असे उच्चरवाने सातत्याने सांगत होते.

कधी ‘विपश्यनेला जायचे आहे’, असे कारण सांगून; तर कधी ‘विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास जायचे आहे’, अशी सबब पुढे करून ‘ईडी’च्या समन्सना केजरीवाल महाशयांनी एकूण नऊ वेळा दांडी मारली! कायदेशीर प्रक्रियेलाही जुमानत नसल्याचा हा पवित्रा होता. मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या व्यक्तीने कायदेशीर प्रक्रियेबाबत अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवणे हे गैरच!

या अटकेचा जास्तीत जास्त राजकीय फायदा कसा उठवता येईल, असा प्रयत्न ते करताना दिसले.त्यांची अशा प्रकारांच्या माध्यमातून राजकीय ‘हिरो’ होण्याची खुमखुमी सर्वज्ञात आहेच. मुख्यमंत्री असतानाही राजधानीतील रस्त्यावर धरणे धरण्यापासून अनेक प्रकार त्यांनी आजवरच्या वाटचालीत केले होते. हे सगळे खरे असले तरी त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

त्यातील प्रमुख मुद्दा म्हणजे ईडीचा अस्त्र म्हणून होत असलेला वापर. भाजपच्याच नेतेमंडळींनी ज्यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, असे अनेक बडे विरोधी नेते त्यांच्या छावणीत दाखल होताच त्यांना ‘क्लीन चिट’ मिळते आणि हेमंत सोरेन तसेच केजरीवाल यांना मात्र गजाआड जावे लागते, हे चित्र ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे.

सातत्याने विरोधक याविषयी प्रश्न उपस्थित करीत असूनही याविषयी स्पष्टीकरण देण्याची, भूमिका मांडण्याची गरजही भाजप नेत्यांना वाटत नाही. हे कशाचे लक्षण आहे? जे चालले आहे, ते सगळ्यांच्या अंगवळणी पडले आहे की काय?

वास्तविक सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असताना केजरीवालांवर कारवाई करून त्यांनाच राजकीय लाभ मिळू देण्याचे सरकार टाळेल, अशी अटकळ होती. ती मात्र नरेंद्र मोदी सरकारने ती खोटी ठरवली आहे. केजरीवाल यांच्या अटकेमुळे ‘इंडिया आघाडी’च्या हाती कोलितच येईल, हे भाजपच्या लक्षातच आले नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्याच्या परिणामांच्या सर्व शक्यता गृहीत धरूनच हा निर्णय घेण्यात आला असणार.

केजरीवाल यांच्या पाठीशी ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने उभी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. झाडून साऱ्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी तर मोदी यांची संभावना ‘घाबरलेला हुकुमशहा’ अशी केली आहे. या प्रकारची टीका होणार, हे खरे तर भाजपला ठाऊक असणारच. मात्र, हा धोका जाणीवपूर्वक पत्करण्यात आला असावा, असेच तूर्तास तरी दिसते.

या अटकेमागे एक सूत्र निश्चितच आहे. गेल्या दहा वर्षांत ‘ईडी’ने ससेमिरा लावलेल्या नेत्यांमध्ये भाजपविरोधी नेत्यांची संख्या जवळपास ९० टक्क्यांहून अधिक आहे. शिवाय, केजरीवाल यांच्या अटकेस २४ तास उलटायच्या आत तृणमूल काँग्रेसच्या तरुण, तडफदार नेत्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. लोकसभेत प्रश्‍न विचारण्याच्या प्रकरणात मोईत्रा यांचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे.

तर पश्चिम बंगालचेच एक मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घातले आहेत. हे चित्र देशात आपली नेमकी कोणती प्रतिमा उभी करत आहे, हे भाजप नेते जाणून असणार. मुळात केजरीवाल यांचा राजकीय नेता म्हणून उदय हा दहा-बारा वर्षांपूर्वी राजधानीत डॉ. मनमोहन सिंग सरकारविरोधात झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून झाला.

पुढे हा नेता राजकारणात उतरला आणि त्याने सलग तीन निवडणुकांत भाजपला दिल्ली विधानसभा जिंकू दिली नाही. मात्र, येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ आणि काँग्रेस यांची तीन राज्यांत आघाडी झाल्यापासून भाजप नेते अस्वस्थ आहेत. अटकेचे नाट्य घडले, ते या पार्श्वभूमीवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT