karlos alkaras
karlos alkaras sakal
editorial-articles

अग्रलेख : बदलते तारांगण..!

सकाळ वृत्तसेवा

विम्बल्डनच्या कोर्टवर यंदा क्षितिजावरचे तेजस्वी तारे तेवढे बदलले असे नव्हे, तर संपूर्ण नभांगणच बदलून गेले.

लंडनस्थित बकिंगहॅम पॅलेसच्या विशाल प्रांगणात एक दिवसाआड सकाळी पावणेअकरा वाजता ‘चेंज ऑफ गार्ड्’सचा समारंभ होतो. महालावरचे पहारे बदलण्याचा हा सोहळा शतकानुशतके चालू आहे. जुने पहारेकरी महालाच्या चाव्या नव्या रखवाल्यांच्या हाती सोपवून घराकडे निघतात. हा सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळत असते.

‘चेंज ऑफ गार्ड्’स’ हा खरे तर एक प्रतीकात्मक सोहळा. आपल्याकडे राष्ट्रपती भवनातही अशीच परंपरा आहे. हे झाले सर्वोच्च सत्तास्थानांविषयी. पण तसे पाहू गेल्यास कुठल्याही क्षेत्रात रखवालदारांचे बदलणे हे कालक्रमानुसार होतच असते. काहींचे सोहळे होतात, काहींचे होत नाहीत इतकेच.

टेनिसच्या विश्वात असाच एक ‘चेंज ऑफ गार्ड्स’ सदृश सोहळा नुकताच पार पडला. तेही बकिंगहॅम पॅलेसपासून आठेक मैलाच्या अंतरावरल्या विम्बल्डनच्या हिरवळीवर. गेली वीस वर्षे इथल्या हिरव्यागार कोर्टवर फक्त अतिरथी-महारथींचाच वावर होता. टेनिसविश्वातील या अनभिषिक्त- अभिषिक्त सम्राटांची सद्दी संपवत एका वीस वर्षाच्या स्पॅनिश तरुणाने विजेतेपद आणि जागतिक क्रमवारीतले अव्वल स्थान जिगरीने ओढून घेतले.

तो राफाएल नदाल नव्हता, रॉजर फेडरर नव्हता, अँडी मरे नव्हता आणि नोवाक जोकोविच तर नव्हताच. कार्लोस अल्काराझ या विशीतल्या पोराने आपल्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असलेल्या जोकोविचचा पाडाव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. जोकोविच जिंकला असता तर त्यात विशेष नवल नव्हते. गेली ओळीने तीन-चार वर्षे तोच जिंकतो आहे.

यंदाही जिंकला असता तर आठ विम्बल्डन जेतेपदांच्या फेडररच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असती. २०१९ मध्ये याच जोकोविचने रॉजर फेडररशी तीन तास ५७ मिनिटे झुंजून त्याची मक्तेदारी संपवली होती. परवा, त्याच सेंटर कोर्टवर अल्काराझने तीन तास ४२ मिनिटे चिकाटीने हल्ले चढवत जोकोविचचे बुरुज उद्धवस्त केले. गेली वीस वर्षे विम्बल्डने जेतेपद नडाल, फेडरर, मरे आणि जोकोविच यांच्या पलिकडे पाचव्या खेळाडूकडे कधी गेले नाही. यावेळी मात्र ‘चेंज ऑफ गार्ड्स’ सोहळा विम्बल्डनवर पार पडला!

विम्बल्डनची पुरुष आणि महिलांची विजेतेपदे तुलनेने नव्या चेहऱ्यांकडे आली आहेत. महिलांचे जेतेपद जिंकणारी चेक प्रजासत्ताकातली मार्केटा वॉन्सुद्रोवा तर मानांकनाच्या यादीतही कुठे नव्हती. धूमकेतूसारखी उगवली, आणि तिने सारे तारांगणच गिळून टाकले. विम्बल्डन जेतेपदासह मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कमही भलीभक्कम असते.

पुरुष विजेत्यापेक्षा महिलांच्या इनामाची रक्कम यापूर्वी थोडकी कमी असायची. आता मात्र या बाबतीत समानतेचे तत्त्व अवलंबण्यात आले आहे. दोघाही विजेत्यांना प्रत्येकी २५ लाख पौंड बँकेत भरता येतील! अर्थात पैशापेक्षा विम्बल्डनच्या विजेतेपदाची शान काही औरच असते. इथल्या हिरवळीच्या कोर्टवर मिळालेले जेतेपद सम्राटाचा किंवा सम्राज्ञीचा मानमरातब देऊन जाते.

अंतिम लढत बघायला खुद्द ब्रिटनची महाराणी किंवा महाराजा खुद्द येतात, आणि विजेत्याचा गौरव करतात. वीस वर्षाच्या कोवळ्या कार्लोस अल्काराझला याचेच अप्रुप होते. अल्काराझ हा ग्रासकोर्टवर फारसा खेळलेला नाही. क्लेकोर्टवर तो दादा समजला जातो. गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिकलेल्या अल्काराझने गेले काही महिने जागतिक क्रमवारीत आपले अव्वल स्थान राखले आहे.

याऊलट, क्रमवारीत दुसरा असलेला नोवाक जोकोविच हा अनुभवी, परिपक्व आणि कुठल्याही पृष्ठभागावर सराइतपणे खेळणारा गडी आहे. तरीही अल्काराझची तडफ, तारुण्य आणि तयारी सरस ठरली. ‘‘नोवाक (जोकोविच) ला मी इथे (विम्बल्डन सेंटर कोर्ट) हरवू शकतो, हा आत्मविश्वास मला खूप पुढे घेऊन जाईल. मीच काय, माझ्या पिढीतल्या सगळ्याच टेनिसपटूंची उमेद वाढवणारा विजय मी मिळवला आहे’’ असे उद्गार लढतीनंतर अल्काराझने काढले.

त्याच्याकडून हार पत्करणाऱ्या जोकोविचने निराश होऊन, मध्यजाळीच्या खांबावर थाड थाड रॅकेट आपटून ती तोडून टाकली. पण लगेचच तो सावरला. ‘कार्लोस (अल्काराझ)मध्ये नडाल, फेडरर आणि मी (जोकोविच स्वत:) अशा तिघांचाही समुच्चय आहे’ अशी त्याने कार्लोसची मुक्तकंठाने स्तुती केली. अर्थात कार्लोसने ते मान्य केले नाही. ‘मी एक संपूर्ण कार्लोस अल्काराझ आहे, आणि राहीन!’ असे तो बाणेदारपणे म्हणाला.

नव्या पिढीला जुन्यांचा तोंडदेखलेपणाही नकोसा आहे, हेच यातून दिसते का? महिलांचे विजेतेपद मिळवणाऱ्या मार्केटा वॉन्सुंद्रोवाचे नावही धड कोणी ऐकले नव्हते. मानांकनाच्या यादीतही ती कुठे नव्हती. प्राथमिक फेऱ्या पार करत आलेल्या मार्केटाने गतवेळच्या उपविजेत्या ओन्स जॅब्येरला चकित करत थेट जेतेपदाची ढालच उचलली.

वर्षानुवर्षे विजेत्यांची तीच तीच नावे ओठांवर घोळवण्याची टेनिस चाहत्यांना लागलेली सवय आता पुढल्या काळात बहुधा मोडावी लागणार आहे. टेनिस हा ताकदीचा खेळ खूप आधीच झाला होता. आता तो धाडसीही होऊ लागला आहे. धोके पत्करत खेळणारे तगडे टेनिसपटूच टिकाव धरु शकतील, असे या खेळाचे स्वरुप झाले आहे.

यंदाचा थारेपालट त्याचेच द्योतक. परिवर्तन हा जगाचा नियमच आहे. टेनिसचे क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल? पण विम्बल्डनच्या कोर्टवर यंदा क्षितीजावरचे तेजस्वी तारे तेवढे बदलले असे नव्हे, तर संपूर्ण नभांगणच बदलून गेले. त्याची शोभा निराळीच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT