dhing tang
dhing tang 
संपादकीय

कर-नाटक : एक चिंतन ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

करनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो.

विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला येणार असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. म्हणजेच कांग्रेस बाजी मारेलच, परंतु कमळ पक्षदेखील बाजीच मारेल, असा ह्याचा अर्थ ! हा निवडणूक अंदाज मात्र आम्हाला काहीच्या काहीच पटला आहे. कां की करनाटकात जाईल तो आजवेरी जिंकूनच आला आहे, असे आमच्या इतिहासाचा अभ्यास सांगतो. होय, भारतीय इतिहास हा आमचा (सखोल) अभ्यासाचा विषय असून, करनाटकाचा इतिहास तर आम्ही कोळून प्यालो आहो !! शाळा सुटल्यानंतर आम्हाला इतिहासाची भारी गोडी लागली. विजयनगरच्या लढाईत कोण जिंकले? ह्या सवालास आम्ही ‘‘चार नंबर खोलीतील अण्णा मोरे’’ असे उत्तर लिहून आलो, ते शाळेतील शेवटचे ऐतिहासिक उत्तर ठरले. (खुलासा : विजयनगर ही आमच्या समोरील आळीच्या तोंडावरील चाळ आहे...असो.) तद्‌नंतर आम्ही शाळेत पाऊल टाकले नसले तरी इतिहासाचा अभ्यास सुरू राहिला. असोच.

ज्याला आपण हल्ली करनाटक असे जे म्हणतो, त्या प्राचीन मुलखाचा इतिहासही फार्फार प्राचीन आहे. पूर्वीच्या काळी ह्या प्रांतास ‘चोळमंडलम’ असेही म्हणत असत. (हे पैल्यांदा वाचले तेव्हा आम्ही जाम हांसलो होतो...असो असो.) करनाटकात सध्या एकमेकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच उद्योग घाऊक प्रमाणात चालू आहे. कांग्रेसने कमळवाल्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मीठ चोळावे, तर कमळवाल्यांनी ‘सिद्धरामय्यांच्या चाळीस लाखाच्या मनगटी घड्याळा’चा आरोप करून कांग्रेसवाल्यांवर मीठ फेकून मोठा जाळ निर्माण करावा ! (अज्ञ व मर्त्य मानवांसाठी खुलासा : मीठ फेकून मोठा जाळ निर्माण करण्याच्या प्रथेबाबत आपापल्या मगदुराने माहिती करून घ्यावी !) तथापि, ‘चोळमंडलम’ ह्या नावाचा जखमांवर मीठ चोळण्याशी काही संबंध असेल, असे कुणाला वाटेल, पण आमच्या संशोधनानुसार, ‘चोळमंडलम’ हे नाव तेव्हाच्या (सनावळी आम्ही गुलदस्तात ठेवत आहो !) ‘चोळवंशीय’ राजवटीमुळे पडले असावे. चोळ हे आडनाव कुणालाच आवडणारे नाही, हे वळखून बहुधा तेथील राजवंशाने हळूच ग्याझेटमध्ये बदल करून आपले आडनाव बदलून घेतले असावे, असा जाणकारांचा निष्कर्ष आहे. साहजिकच कालौघात ‘चोळमंडलम’ हे नाव मागे पडून करनाटक हे नाव रूढ झाले असावे, असा सिद्धांत आम्ही मध्यंतरी मांडला होता. तो सर्वमान्य ठरावा.

करनाटकातील नाटके पूर्वीपासूनच फार प्रसिद्ध. भारतीय रंगभूमीचे जनक जे की भरत मुनी हे करनाटकातील असावेत, असा दाट वहीम आम्हांस आहे. मराठी रंगभूमीचे जनक जे की विष्णुदास भावे (सांगलीकर) ह्यांच्या नाटकातील संगीत हे शतप्रतिशत करनाटकी ढंगाचे असे, हा कसला पुरावा मानावा? त्यादृष्टीने पाहू गेल्यास नाटकाची पहिली नांदी करनाटकातच झडली व सध्याही तेथे तुंबळ नाटके करणे चालू आहे, हे विधान वस्तुस्थितीला धरून होईल. पुन्हा असो. करनाटकातील प्रचारात सारेच नाटक करत आहेत, अशा आशयाचे विधान आमचे (एकमेव) तारणहार आणि बेळगावातही मराठीत भाषण करणारे एकमेव नेते जे की मा. उधोजीसाहेब ह्यांनी म्हटले, ते कोणालाही बव्हंशी पटावे. त्या उद्‌गारांनीच आम्हाला सदरील संशोधनाची प्रेरणा मिळाली. त्यांचा विजय असो !

निष्कर्ष : करनाटक ही एक रंगभूमी असून, त्या रंगात बुडालेले सारे कलावंत ही त्यातील पात्रे आहेत. करनाटकाचे खेळ फुकट्यात बघणारे तुमच्या-आमच्यासारखे प्रेक्षक हे (रिकामटेकडे) नाटकवेडे आहेत, एवढाच त्याचा अर्थ. इत्यलम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT