dhing tang
dhing tang 
संपादकीय

गहाण! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

कारभारी फडणवीसनाना यांस,
हंगाम बहुत बडबोलीचा चालू आहे, असे साहेबकानीं आले आहे. उचलली जिव्हा टाळ्यांस लाविली ऐसे वर्तन उपेगाचे नाही, हे बरे ध्यानी धरणे. आपणांस राज्याचे कारभारीपद दिल्हे, ते मऱ्हाटी दौलतीचा रखरखाव निगुतीने व्हावा म्हणोन. फुकाफुकी बेलपत्रे वाहत हिंडण्याची हौस असेल, तर काशीयात्रेस जाणेची तजवीज महालाकडोन होईल! त्यासाठी राज्य गहाणखत ठेविण्याचे कारण नाही. साहेबांची मन्शा नसल्यास चुटकीसरशी खुर्ची जाईल, हेदेखील ध्यानी धरणे. हयगय नको. बहुत विचार करोन मगच मुख उघडावे, ऐसे सांगणे आहे.

साहेबकृपेमुळे नागपूर गादीसह मुंबईची गादी आयती मिळाली. रयत सारे पाहातें आहे. वेळवखत पडल्यास राज्य गहाण ठेवू, ऐसे आपण बोलिलात! राज्य गहाण ठेवणार तुम्ही कवण? तुम्हांस राज्य दिल्हे कोणी? त्यावर तुळशीपत्र ठेवण्याचा अधिकार ना तुम्हांस, ना आम्हांस. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. येका निवडणुकीचे रण मारले की राज्य प्राप्त होते काये? त्यासाठी कुडी झिजवावी लागते. टाळीसाठी वचन बोलोन जिव्हा टाळूस लाविण्याचा हा उद्यम अंगलटास आला, तर त्यास आम्ही जिम्मेदार नाही, हे बरे ओळखून असावे. अंथरूण पाहोनच पाय पसरावेत, अंगापेक्षा बोंगा मोठा झालियास बोंग्याचा टांगा होईल, ऐसे शहाणपण आपणांस प्राप्त होवो. गहाणखतीची भाषा बोलोन आपण आमचे दिलास ठेंस पहुचवली असोन ह्या प्रमादास क्षमा करणारे आम्ही कोण? श्री सर्व पाहत आहेत. घोडामैदान दूर नाही. बहुत काय लिहिणें? शब्दच संपले.
उधोजीसाहेब. (शिक्‍का)
ता. क. : ह्याऊप्पर परस्पर गहाणखतीचा घोटाळा केलियास रणमैदानातच भेटू! हर हर महादेव.
* * *
दिगंतकीर्ती महाराष्ट्रतारक उधोजीसाहेब
 यांचे चरणी बालके नानाचा शतप्रतिशत दंडवत विनंती विशेष. आपले खत दरोबस्त मिळाले आणि पुनश्‍च घर भरल्यासारखे वाटू लागलें. आपण परदेश मोहिमेवर गेल्यानंतर उभा महाराष्ट्र ओकाबोका वाटू लागला होता. घरातले कर्ते माणूस बाहेरगावी गेल्यानंतर घर कसें उदास होते, तद्वत झाले होते. परंतु, आपण परत आलात, हेच खूप झाले. तुम्ही नसलात की काही सुचत नाही. दौलतीचे अनेक निर्णय आम्ही ‘साहेब परतले की लग्गेच करू’ असे सांगूनच टाळत होतो.

स्मारकासाठी वेळ पडली तर राज्य गहाण ठेवू, असे मी भाषणात म्हणालो म्हणून आपण रागेजलात का? रागावू नका! मी आपला असेच बोललो होतो. मागल्या खेपेला मी ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजितो दात...’ वगैरेसुद्घा बोललो होतो, हे आपल्याला आठवत असेलच. वाघाचा जबडा राहू दे, गेल्या आठवड्यात आमच्या बंगल्यात एक वाह्यात बोका शिरला होता. त्याला हाकलता हाकलता नाकीनऊ आले!! स्टुलावर चढून उभे राहात त्याला जेव्हा ‘कडक कारवाई करण्यात येईल’ असा इशारा दिला, तेव्हा कोठे तो गेला!! असो.

ॲक्‍चुअली मी राज्य गहाण टाकण्याचे वचन आपल्या वतीनेच दिले होते. परस्पर राज्य गहाण ठेवणारा मी कोण? माझ्या नावावर इथे ना साधा ‘सातबारा’, ना काही प्रापर्टी! (ते सगळे नागपुरात!) वेळवखत पाहून मी कुणाला उसने पैसेसुद्धा देऊ शकत नाही. परवाचीच गोष्ट! आमच्या गिरीशभाऊ महाजनांना राळेगणसिद्धीला जायचे होते, तेव्हा त्यांनी पेट्रोलचे पैसे मागितले. मी म्हटले, ‘सध्या टेम्पोबिम्पोनं जा, पुढे बघू!’’ ह्या ‘पुढे बघू’ धोरणावरच मी सध्या दौलतीचा कारभार हांकतो आहे!! जाऊ दे, झाले!
मी तो लहान मूल! एवढे काय मनावर घेता? क्षमा असावी. आपला आज्ञाधारक. नाना.
ता. क. : राज्य गहाण ठेवण्याची भाषा केली, बुद्धी नव्हे, हे ध्यानी असो द्यावे, ही विनंती!
 नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT