dhing tang
dhing tang 
संपादकीय

कर्तव्यकठोर! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संतापून मेजावरील नस्तीकडे जळजळीत नजरेने पाहिले. दाढा आवळल्या. नस्तीवर एक माशी बसली होती. सरकारी कामात अडथळा आणण्यासंदर्भातील कायदे-कलमांची त्याने मनातल्या मनात उजळणी केली. सदर माशीवर कायदेशीर कारवाई करण्याचा मनोमन निर्णय घेऊन क. प्र. अधिकाऱ्यांनी हलकेच ड्रावरातील माश्‍या मारण्याचा झारा काढून चपळाईने गुन्हेगार माशीवर आघात केला. पण हाय! माशी उडाली आणि शेजारी ठेवलेल्या चहाच्या रिकाम्या कपाच्या कडेवर जाऊन बसली.

‘‘सरकारी साधनसंपत्तीचा हा दुरुपयोग आहे!’’ क. प्र. अधिकारी संतापून ओरडले. त्यांचा संताप स्वाभाविक होता. प्रशासकीय कचेरीत देण्यात येणारा चहा करदात्यांच्या पैशातून उकळला जातो. कपबशीचा जोडदेखील करदात्यांच्या पैशातूनच येतो. करदात्यांच्या मालकीच्या साधनसंपत्तीवर कुणी उपटसुंभ माशी बिनदिक्‍कत बसते म्हंजे काय? त्यांना आठवले, सदर कपबशी त्यांनी स्वत: (टेंडर काढून) मागवली होती. कपबशीवाल्याने पस्तीस रुपये भाव सांगितल्यामुळे त्यांनी त्याचे टेंडर बरखास्त करुन नगद अठ्ठावीस रुपयेवाली कपबशीचे टेंडर नियमाप्रमाणे पास केले होते.
कपावरील माशीस कशाने हाणावे ह्याचा काही क्षण क. प्र. अधिकाऱ्यांनी विचार केला. एखाद्या प्राणघातक फटक्‍याने माशीस जबर शिक्षा होईल, परंतु, सरकारी साधनसंपत्तीचेही अपरिमित नुकसान होईल. करदात्यांच्या पैशातून पुन्हा चहाची कपबशी मागवणे, ही उधळपट्टी ठरेल...हा विलक्षण तिढा होता. क. प्र. अधिकारी संभ्रमात पडले.

सदर कपबशीचे नुकसान स्वीकारून माशीस दंड केला, तर अन्य माश्‍यांस जरब बसेल का? लेकाच्या फार सोकावल्या आहेत. कुठ्ठेही बसतात! परवा भर नगरपित्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत एक मुजोर माशी थेट क. प्र. अधिकाऱ्यांच्या नाकावर येऊन बसली. ती जागा इतकी नाजूक की आघात करणे बरे दिसले नसते! दुसऱ्या कुणा नगरपित्यास आघात करायला सांगणे अंमळ महागात गेले असते!! क. प्र. अधिकाऱ्यांनी संपूर्ण मीटिंगमध्ये चेहऱ्यावरची माशी उडू दिली नाही. मीटिंग बरखास्त झाल्यानंतर त्यांनी हलकेच माशीमार झारा पेलत खालचा ओठ पुढे आणून तोंडाच्या गरम वाफेचा झोत स्वत:च्याच नाकावर सोडून माशी हवेत उडवली. माशी जराशी उडाली आणि...विराट कोहलीने क्षणार्धात चेंडू कव्हर ड्राइव्हच्या दिशेने सीमापार करावा, तद्वत चापल्याने क. प्र. अधिकाऱ्यांनी माशीस देहदंड दिला...
...इतक्‍यात मेजावरचा फोन खणखणला. असा (अवेळी) फोन वाजला की क. प्र. अधिकाऱ्यांच्या कपाळावर आणखी एक आठी चढते. (ओरिजिनल तीन ऑलरेडी आहेत...) वशिले लावायला मंत्र्याबिंत्र्यांचे पीएबीए फोनबिन करतात. पण असल्या फोनला कोण भीक घालतो?
‘‘कोणॅय?,’’ कर्तव्यकठोर चेहरा करून क. प्र. अधिकाऱ्यांनी फोन कानाला लावला.
‘‘ साहेब, सोडा ना...कशाला त्यांना दणके देता?,’’ मंत्र्याचा पीए पलीकडून दबाव आणत होता.

‘‘करदात्यांच्या पैशातून आलेल्या सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्याला सोडून द्या, असं सांगता? शक्‍य नाही!,’’ क. प्र. अधिकाऱ्याने बजावले. मंत्र्याच्या पीएने काहीतरी पुटपुटत फोन ठेवला. बहुधा शिव्या दिल्या असाव्यात. देऊ देत. कर्तव्यकठोर अधिकाऱ्याला शिव्याशाप खाव्या लागतातच. तेवढ्यात ती समाजकंटक माशी आता चहाच्या कपावरून थेट मेजाच्या काचेवर आल्याचे क. प्र. अधिकाऱ्याने अचूक पाहिले. त्याने पुनश्‍च मक्षिकानिर्दालक झारा उचलला. तेवढ्यात आलेल्या शिपायाने त्याच मेजावर एक सीलबंद लखोटा टाकला. माशी उडाली.
क. प्र. अधिकाऱ्याने लखोटा फोडला. आत ट्रान्सफर ऑर्डर होती. त्वरित नव्या जागी रुजू व्हा असा आदेश होता. क. प्र. अधिकाऱ्याने ड्रावर साफ केला. आपला मक्षिकानिर्दालक झारा उचलून नस्ती काखेत मारत त्याने खुर्ची सोडली. मनात म्हणाला, ‘‘इथे काय, तिथे काय...आपल्यासारख्या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याला ह्या झाऱ्यावाचून पर्याय नाही!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT