dhing tang
dhing tang 
संपादकीय

कुठे निघालात, कमळाबाई? (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक.
वेळ : अंतिम फैसल्याची! काळ : सांगून आलेला!
प्रसंग : निकराचा. पात्रे : निकराचीच!
(‘मातोश्री महाला’तील खासगीकडील अंत:पुरात सौभाग्यवती कमळाबाई कपड्यांची गाठोडी बांधताहेत. मध्येच पदराने डोळे पुसत आहेत आणि नाकही शिंकरत आहेत! तेवढ्यात लगबगीने साक्षात उधोजीराजे प्रविष्ट होतात. कमळाबाईंचा नूर बघून हबकतात. अब आगे...
उधोजीराजे : उहु उहु!! आम्ही आलोय म्हटलं!!
कमळाबाई : (दुर्लक्ष करत पदराला नाक पुसतात...) फु:!!
उधोजीराजे : (कळवळून) रुमाल ठेवावा हो जवळ...सर्दी झाली असेल तर!
कमळाबाई : (खवळून) अडलंय आमचं खेटर!!
उधोजीराजे : (उजेड पडत) ओहो! एक माणूस रागावलंय तर...
कमळाबाई : (मुसमुसत)...तर, तर! आमच्या रागाला विचारतो कोण? आम्ही बसलोच आहोत इथं!! कोणीही यावे, टपली मारुनी जावे!!
उधोजीराजे : (खट्याळपणे) असा दिल खट्टा करू नका, बाईसाहेब! घोडामैदान आता जवळच आहे! पुन्हा एकदा रणांगणावर जमवाजमव करण्याऐवजी ह्या कपड्यांची जमवाजमव कशापायी करत आहात?
कमळाबाई : (चलाखीने) असंच! आम्हाला वेड लागलंय म्हणून!
उधोजीराजे : (खमकेपणाने) माणसानं नीट उत्तरं द्यायला शिकावं!! असला उद्धटपणा बरा नव्हे!!
कमळाबाई : (फणकारून) अस्सं? तर मग ऐका, उशिरा का होईना, शहाणपण आलंय आम्हाला!! जाईन कुठंही... जिथं थारा मिळेल तिथं जाईन! पण आता इथं राहाणं नको!
उधोजीराजे : (समजूत घालण्याच्या प्रयत्नात) आमच्याकडून अधिकउणा शब्द गेला असेल तर विसरून जावं! उगीच कशाला कपड्यांची गाठोडी बांधताय?
कमळाबाई : (हुंदका आवरत) तुमच्या गोठ्यात स्वत:ला बांधून घेण्यापेक्षा गाठोडी बांधलेली पर्वडली!! गोठ्यातल्या गाई-म्हशींचं तरी सणासुदीला कवतिक होतं! आम्ही कायम ‘ताडन के अधिकारी’! साडेचार वर्षं कशी काढली इथं आमचं आम्हाला माहीत! परवा पंढरपुरात चक्‍क ‘चोर’ म्हणालात आम्हाला... तेही चार्चौघात!! शोभलं का तुम्हाला हे?
उधोजीराजे : (युक्‍तिवादात) अहो, त्यात एवढं काय मनावर घ्यायचं! लहान मुलाला नाही का आपण ‘अरे, चोरा, लब्बाडा!’ असं म्हणतो! त्यानं तो काय चोर ठरतो का? राजकारणात थोडंफार चालायचंच!! आम्हीही प्रेमानंच म्हणालो ते!! तेवढ्यावरून-
कमळाबाई : (आणखी चेवात कपडे बांधत) तुम्हाला नाहीतरी नकोच होती ही सोयरीक! उरलीसुरली अब्रू अगदीच गहाण टाकण्यापेक्षा बऱ्या बोलानं इथनं निघावं, असा पोक्‍त विचार करूनच आम्ही घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे!!
उधोजीराजे : (गंभीर होत) तुमची लक्षणं सुधारावीत, म्हणून आम्ही थोडं कडक बोलत होतो! तुमच्या हाती कारभाराची सूत्रं आम्हीच दिली ना? आमचे शिलेदार तुमच्या दिमतीला दिले ते काय उगीच? आमच्या साध्यासुध्या बोलण्यामुळे तुम्ही डोक्‍यात इतकी राख घालून घ्याल, असं वाटलं नव्हतं! (उसने दु:ख दाखवत) आता तुमचा निर्णयच झाला असेल, तर आम्ही तुम्हाला रोखणार नाही!!
कमळाबाई : (अचानक पवित्रा बदलत) अडलंय आमचं खेटर! आम्ही कुठ्‌ठेही जाणार नाही!! इथ्थेच राहणार!! जायचं असेल तर ज्याला ही सोयरीक नकोय त्यानं जावं!!
उधोजीराजे : (हबकून) अहो, तुम्हीच कपडे बांधायला लागला होता ना?
कमळाबाई : (धूर्त हसत) आम्ही लाँड्रीत टाकायला बांधलेत हे कपडे!! तुमची उगीच गंमत केली!! कळलं?
उधोजीराजे : (हतबल होऊन) अस्सं होय!! आम्हाला वाटलं की-
कमळाबाई : (ठसक्‍यात) तुम्हाला काय वाटलं आम्ही सुखासुखी असे सोडून जाऊ तुम्हाला? येवढं सोप्पं नाही बरं ते!! उचला ती गाठोडी आणि चला आमच्या पाठोपाठ लाँड्रीत!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT