dhing tang
dhing tang 
संपादकीय

युतीचा तिळगूळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड गोड बोला!! युतीची बोलणी (काहीच्या काहीच मागे पडल्याने) मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा सुरू करायला हरकत नाही, असे सुचवण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस आपण एकमेकांना तिळगूळ पाठवावेत, असे अनेकांना वाटत होते. तसा तिळगूळ वाटला जाऊ नये, म्हणूनही काही लोक प्रयत्नशील आहेतच. हाच युतीचा तिळगूळ समजून स्वीकार कराल, अशी (जवळजवळ) खात्री असल्यानेच हा पत्रप्रपंच करीत आहे. युती होणार की नाही, ह्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ह्यासंदर्भात आपल्या पक्षाच्या काही नेत्यांनी बैठकाही केल्या. तुमच्यापैकी काही नेत्यांनी युती व्हावी असे म्हटले, तर आमच्यापैकी काही जणांनी ‘युती नको’ असे म्हटले. म्हणूनच हा तिढा उद्‌भवला आहे. परंतु, सांगावयास आनंद वाटतो की कालच मी दिल्लीला फोन लावून ‘तिळगूळ पाठवू का?’ अशी रीतसर परवानगी मागितली. त्यांनी होकार दिला आहे! खरे सांगतो, मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी मिळाल्यानंतरही मला कधी इतका आनंद झालेला नाही. असो.

सोबत तिळगूळ (चार लाडू) आणि काटेरी हलवा (पन्नास ग्रॅम) पाठवत आहे, स्वीकार व्हावा!! पत्र आणि पार्सल आणून देणारा गृहस्थ आमच्या पक्षाचा असून तितकासा भरवशाचा नाही, म्हणून मुद्दाम कळवत आहे. मोजून घेणे! तिळगूळ जास्ती पाठवला असता, पण मन रोखले. तिळगूळ खूप खाल्ला तर पोटाला बाधतो, असा (अनेकांचा) अनुभव आहे. मागल्या खेपेला मी आमचे अध्यक्ष श्रीमान मोटाभाई ह्यांना भरपूर तिळगूळ पाठवला होता. दोन दिवस त्यांचा आवाज खोल गेला होता. पुन्हा असो. कळावे.
आपला लाडका मित्र. नाना फडणवीस.
ता. क. : तुम्हीही तिळगूळ बेतानेच खा!!
* * *
नाना फडणवीस यांसी,

आपण धाडलेला तिळगूळ पावला. तथापि, तुम्ही पत्रात म्हटल्याप्रमाणे त्यात तिळगुळाचे चार नव्हे, तर दोनच लाडू होते आणि काटेरी हलवादेखील जेमतेम एक तोळा (दहा ग्रॅम) आहे!! संधी मिळेल तेथे तुम्ही थापा मारता त्या अशा!! तिळगूळ आणून देणाऱ्यास मी खडसावून विचारले की ‘काय रे दोन लाडू मारलेस का मधल्यामध्ये?’ तो ‘नाही’ म्हणाला!! जाऊ दे. आम्हाला तिळगुळाची कमतरता नाही. जगदंबेच्या कृपेने यंदा घरीच बरेच तिळगुळाचे लाडू केले आहेत. शिवाय दर मकर संक्रांतीला आमच्या ‘मातोश्री’वर मणांच्या हिशेबाने तिळगूळ येतो. ईश्‍वरेच्छेने काहीही कमी नाही!!
आम्ही उलट तिळगूळ पाठवणार नाही, कारण आम्हाला गोड बोलता येत नाही! मारून मुटकून गोड बोलणे आमच्या स्वभावात नाही. तुमच्यासारखे थापाडे तर आम्ही बिलकुलच नाही. एकीकडे ‘पटक देंगे’ अशी कुस्तीच्या आखाड्यातली भाषा करायची आणि दुसरीकडे तिळगूळ पाठवायचा, असा दुतोंडीपणा आम्हाला जमण्यासारखा नाही. आम्हाला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे. तिळगूळ पाठवणे (दोन लाडू) सोपे आहे, पटकणे अशक्‍य हे ध्यानी ठेवा!! एक घाव दोन तुकडे असा आमचा बाणा आहे. तेव्हा उलट तिळगुळाची अपेक्षा तुम्ही करू नये, हे ठीक राहील!!
संक्रांतीचे निमित्त साधून युतीची बोलणी सुरू करावीत, असे आपण सुचवता आहात. पण त्यासाठी नुसता तिळगूळ उपयोगाचा नाही, हे लक्षात ठेवावे. इतर बरेच नाही हवे!! अधिक काय लिहू? कळावे. आपला उधोजी.
ता. क. : तिळगुळाचे लाडू भयंकर कडक होते. दाढा ढिल्या झाल्या! उ. ठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT