dhing tang
dhing tang 
संपादकीय

अवघाचि मांडिला बाजार..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

जै उतारावरी वाहे नीर। तळ गाठिता होई अधीर।
उन्मळती दोन्ही तीर। उन्मादभावे।।

जै नभातुनी ससाणा झेपें। निम्न तळींचे भक्ष्य ढापे।
पातळी सोडोनि विक्षेपे। शांतवि भूक।।

की नभांगणातील तारका। तुटोनी येता खाली क्षणिका।
तेजोमय ग्रहगोलिका। होतसे माती।।

जळत जळत पडली उल्का। वातावरणें दाहिली फुका।
बघणारे बघती टकामका। उरले काय।।

जे जे उंचावरीच असते। ते ते येतेचि खालते।
येता येता काही न उरते। अस्तित्व तयाचे।।

तैसेचि होते येता चुनाव। लोकशाहीचा दिसतो बनाव।
प्रत्यक्षीं खुर्चीची हाव। उभारुन येते।।

गावींच्या नालेवोहळा। पुष्टता येईं पर्जन्यकाळा।
भरभरुन येतो मैल काळा । संसर्गजन्य।।

जे जे अभद्र आणि अमंगळ। दुष्टता, वैरता निष्फळ।
लोकजीवनाची घुसळ। निवडणुकीत होते।।

तैसेचि बहुविधांचे वचन। राजकाजे बोलबचन।
संजीवनीगुटीचे आश्‍वासन। रयतेसाठी।।

आश्‍वासनांचा पोकळे गोळा । वाढता वाढे वाटोळा।
निव्वळ गफ्फांचा वानवळा। पेश केला।।

यथेच्छ केलीया शिव्यागाळी । अपार आले
संस्कृतीचे भाळी।
सभ्यतेला लागे उन्हाळी। निरर्गलतेची।।

ऐसा गा कसला हा प्रचार। हे तो नग्ननृत्य साचार।
अवघाचि मांडिला बाजार। लोकशाहीनामें।।

येक म्हणे दुजा चोर। दुजा म्हणे तू मुजोर।
ऐसी भांडाभांड थोर। चालू होते।।

‘अरे’ला म्हणावे ‘कारे’। ‘कारे’ला म्हणावे ‘जारे’।
‘जारे’ला करावे ना रे। हाड हाड।।

जै गल्लीमाजी ग्रामकेसरी। भुंकती पिसाळ येरांवरी।
चावे, कोल्हाळ बोचकारी। उच्छाद होई।।

एकाने दुज्याचा काढावा बाप। त्याने म्हणावे हे तो पाप।
आणि करावा अधिक्षेप। तोडीस तोड।।

चोर, दुष्ट, भ्रष्ट, नष्ट। नीच आणि नतद्रष्ट।
अपशब्दांचा वापर स्पष्ट। मंजूर आहे।।

ह्याला काढावा ऐसे नाही। त्याला झाकावा ऐसेही नाही।
हमामखाना लोकशाही। ह्यासी म्हणावे।।

प्रचाराचा पाहुनि स्तर। लज्जा येई निरंतर।
मते आणि मतांतर। दुय्यम आहे।।

एकोनि ही अभद्र वाणी। अपशब्दांच्या सहस्त्र खाणी।
आवरी आता चक्रपाणि। तूचि आम्हा।।

लोकशाहीचा सण येता। किती चिवडावी घाण आता।
विनवी तुज भगवंता। नंदी म्हणे।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT