editorial malhar arankalle wirte article phahatpaul
editorial malhar arankalle wirte article phahatpaul 
संपादकीय

आंब्याचं बन

मल्हार अरणकल्ले

रद्दीच्या दुकानातून परवा एक पुस्तक घेतलं. जुन्या कवितांचं. प्रत्येक पानावर एक कविता. साधी-सोपी शब्दकळा. आशयघनतेचं सौष्ठव शब्दाशब्दांत भरलेलं. ओळींतले शब्द जणू स्वतःचेच सूर घेऊन आलेले. वाचताना सुरांची तान कानांत गुणगुणल्यासारखी भोवती घुटमळत राहिलेली. पुस्तकाच्या पानांचा मूळचा रंग पुरता बदलून गेलेला. पिवळसर रंगाचा पोक्तपणा पानांवर पसरलेला. अधेमधे तपकिरी रंगाची नक्षी. उदबत्तीच्या धुराची वलयं हवेवर तरंगताना दिसतात, तशीच ही पुंजक्‍यांची भुरभुरणारी नक्षी. काही शब्द त्या नक्षीआड लपलेले. आधीच्या-नंतरच्या संदर्भांवरून स्वतःच आपापला अर्थ सांगणारे. उलटताना काही पानं फुलपाखरांचे पंख होऊन बोटांच्या चिमटीत अलगद अडकणारी. इतकी अलवार. नाजूक. काही पानांची टोकं वरच्या किंवा खालच्या बाजूला दुमडलेली. पुढंही कुठं कुठं अशा दुमडींच्या खुणा. त्यांच्यामागं काय काय आठवणी दडवून ठेवल्या असतील, त्या पानांच्या कोपऱ्यांना दुमड घालणाऱ्यालाच ठाऊक असलेल्या.

सुरवातीची काही पानं उलटून पुढं गेलो, तेव्हा चिमटीत हळदीच्या शकुनाची खूण आपोआपच भरून गेली. गोंडेदार झेंडूची फुलं हाराच्या दोऱ्यात ओवताना आधी दोरा पिवळटत जातो; आणि मग बोटांवरही ती रंगपंचमी मेंदीसारखी खुलून दिसू लागते, तशीच स्थिती झाली. एक-एक करीत ओवताना या फुलांचा गंध आजूबाजूला पसरतो; आणि सनई-चौघड्याचे मंगल क्षण मनात उमलून येतात, तशी या कवितांची एक मैफलच जमून आली. पानांच्या दुमडी बोटांनी सरळ करू लागलो, तेव्हा त्यांच्या त्रिकोणाकृती पांढऱ्या खुणांच्या पापण्या उघडमीट करू लागल्या.

ढगांची दाटी काही वेळानं विरळत जावी; आणि मधूनच सूर्यप्रकाश पसरू लागावा, तशी पुस्तकाच्या मध्यभागातील पानं आधीपेक्षा उजळत चालली होती. हे पाहत असतानाच अचानक आंब्याचं धमक बिलोरी बन भेटीला आलं. नुसतंच नाही; तर नाचणारा मोर घेऊन ! कधी काळी पुस्तकाच्या पानांत ठेवलेलं एक मोरपिशी स्वप्न अलगद हाती आलं; आणि त्या पानांच्या पंखांतून निरागस-अवखळ बाल्य धावून आलं. मोरपीस हातात घेतलं. पुस्तकात ठेवून त्याच्यावर पानांचा हलका दाब घेऊन ते बाहेर काढण्याचा खेळ आपोआप सुरू झाला. प्रत्येक वेळी पिसाचा रंग अधिकाधिक खुलू लागला. त्याच्या मखमली अंगावर निळं हसू पसरलं. निळ्याच्या जोडीला पोपटी छटा आली. दोन्हींच्या मिलाफातून मोराचा अनोखा रंग तयार झाला. कळ्यांच्या ओंजळींतून फुलांचे गुच्छ उमलावेत, तशी पिसांची टोकं फुलून येऊ लागली. माना उंचावून टकटक बघू लागली. एकमेकांना टाळ्या देऊ लागली. त्यांचे नाजूक तंतू हिरवळीवरील गवतासारखे लवलवू लागले; आणि अख्खं शिवारच दृष्टीला वेढून गेलं. निळं, हिरवं; आणि मोरपिशी रंगाचं वेल्हाळ शिवार. शालेय आठवणींची कोवळी मोरपिसं डोळ्यांपुढं नृत्य करू लागली. एकामागून एक पिसारे फुलत राहिले. पिसांचे दांडे परस्परांना घासून होणाऱ्या संमिश्र आवाजासह थरथरू लागले. आंब्यांच्या मोहोराचा गंध आजूबाजूनं स्पर्श करीत असल्याचे भास जाणवू लागले. पाहता पाहता पुस्तकाच्या पानांची जणू आमराईच होऊन गेली.

आपल्या मनातही आठवणींची कित्येक मोरपिसं लपून बसलेली असतात. काही स्वतः लपविलेली; आणि काही थेट स्वतःच येऊन बसलेली. एखादं पीस हाती आलं, की त्याचे मोर पिसांचा पंखा उघडतात; आणि आमराईतल्या मोहगंधाचा फेर सुरू होतो.
आठवणींची अशी पानं कधी तरी चाळायला हवीत; आणि हे लोभस स्वप्नक्षण अनुभवायला हवेत, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT