संपादकीय

ऐन दिवाळीतील  राजकीय फटाके!  (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

दिवाळी सुरू झाली आहे आणि न्यायालयीन आदेशानंतर प्रत्यक्षात फटाक्‍यांचा दणदणाट किती होतो, ही कुतूहलाची बाब असली, तरी राजकीय फटाके मात्र त्यापूर्वीच फुटू लागले आहेत. हे फटाके अर्थातच गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आणि त्याच वेळी गुजरातच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर न केल्यामुळे फुटत आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात असे वाटते आणि तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. मात्र, त्याच वेळी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा एकाच वेळी जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाने टाळल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. गुजरातमध्ये मोदी यांना काही मोठ्या घोषणा करावयाच्या असल्यानेच आयोगाने तारखा जाहीर केल्या नाहीत, या विरोधी पक्षांच्या आरोपांना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी उत्तरही दिले आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना काही मोठ्या घोषणा करता येऊ नयेत म्हणून आयोगाने निवडणूक बऱ्याच आधी जाहीर करून, त्यांना आचारसंहितेच्या जाळ्यात अडकवले होते, असा रूपानी यांचा आरोप आहे. मात्र, आता या दोन्ही राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत असे फटाके फुटतच राहतील आणि प्रचारमोहीम रंगात आल्यावर तर त्यांचा आवाज अधिकच वाढेल. या पार्श्‍वभूमीवर पंजाबातील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या पदरी आलेला मोठा पराभव हा कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांचे मनोबल उंचावणारा ठरू शकेल. मात्र या निकालामुळे संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. गुरुदासपूरमध्ये कॉंग्रेसचा विजय जितका अपेक्षित होता, तितकाच केरळमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजपचा पराभव अपेक्षित होता. मात्र, हिमाचलमधील आपली सत्ता टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहात पंजाब या शेजारच्या राज्यातील ताज्या विजयाने मोठी भर पडू शकते. 

गुजरातमध्ये गेली 22 वर्षे असलेले आपले बळ या वेळी कमी होऊ नये म्हणून भाजप कसोशीने प्रयत्न करीत असतानाच, तिकडे हिमाचल प्रदेशातही कॉंग्रेसला आपली सत्ता टिकवण्यासाठी या वेळी मोठी झुंज द्यावी लागणार, अशी चिन्हे आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर नरसिंह राव यांच्या पंतप्रधानांच्या काळात भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे गाजलेले दळणवळणमंत्री सुखराम यांचे चिरंजीव अनिल शर्मा हे विद्यमान मंत्री कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये सामील होत आहेत. भाजपने आपल्याला मंडी मतदारसंघातून उमेदवारीचे आश्‍वासन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे राज्य हातातून जाऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत असले, तरी उमेदवार मिळण्यापासूनच त्यांची अडचण झालेली दिसते. खरे तर हिमाचल प्रदेश हा एकेकाळचा कॉंग्रेसचा गड. जनता पक्षाच्या काळात 1978 मधील निवडणुकीत तो पहिल्यांदा कोसळला आणि शांताकुमार हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तेथे आलटून पालटून कॉंग्रेस वा भाजप हेच सत्तेचे स्पर्धक राहिले आहेत. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप आणि कॉंग्रेस याच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत होत आहे. त्यातच आता देशातील वातावरण बदलत चालले असल्याचे सोशल मीडिया सांगत असल्यामुळे विशेषत: हिमाचलकडील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागणे साहजिक आहे. खरे तर हे देशातील छोटे राज्य आणि विधानसभेचे सदस्यही अवघे 68. त्यात पुन्हा डोंगराळ भाग आणि सखल प्रदेश यातील विकासाच्या अंतराने तेथे जातीपातींपेक्षा प्रादेशिक दुराव्याची दरी मोठी आहे. तेथील निवडणुकीला जेमतेम महिना राहिलेला असतानाही भाजप मुख्यमंत्रिपदाचा आपला चेहरा जाहीर करू शकलेला नाही. त्यामुळे येथील लढतही मोदींनाच पुढे करून लढवली जाईल, असे दिसते. 

भाजपने आपली सर्व शक्‍ती गुजरातमध्येच पणाला लावलेली दिसते. या हक्‍काच्या राज्यातही भाजपपुढे एकीकडे पाटीदार समाजाने आव्हान उभे केले आहे, तर दुसरीकडे दलित, मच्छीमार आणि मुस्लिम समाजही भाजपच्या विरोधात एकवटू पाहत आहे. त्यामुळेच भाजपने एक नव्हे, तर दोन "गौरव यात्रा' काढल्या आणि 182 पैकी 149 मतदारसंघांत फिरलेल्या या यात्रांचा समारोप दस्तुरखुद्द मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. त्यामुळे घोषणांच्या सुकाळात आता दिवाळीच नव्हे, तर हे वर्षही संपणार आहे. अर्थात, हिमाचल प्रदेशापेक्षा देशाचे लक्ष गुजरातच्या निकालांकडेच असेल. तेथे 182 पैकी किमान 150 जागांचे "लक्ष्य' भाजपने आधीच जाहीर केले आहे. भाजपविरोधातील असंतोषाचा फायदा घेऊन कॉंग्रेसने त्याला जरा जरी खिंडार पाडले, तरी ते भाजपच्या जिव्हारीच लागेल. त्यामुळेच भाजपबरोबर कॉंग्रेसही आपले सारे बळ तेथेच पणास लावणार, यात शंका नाही. शिवाय, राहुल गांधीही जातीने तेथील मैदानात उतरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मतदारराजा काय करतो ते बघायचे. घोडा मैदान तर जवळच आहे! 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT