Jack-Ma 
संपादकीय

अलिबाबा आणि चिनी ‘चोर’

गोपाळ कुलकर्णी

अलिबाबा.. हा केवळ उद्योगसमूह नाही. साम्यवादाच्या विस्तीर्ण अशा पॉलिहाऊसमध्ये बहरलेलं ते ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. त्याला जोवर फळं लागत होती आणि त्याची वाढही सरकारच्या नियंत्रणात होती तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण जेव्हा या झाडाच्या फांद्याच थेट चेअरमन जिनपिंग यांच्या खुर्चीपेक्षाही उंच दिसू लागल्या तेव्हा त्यांची छाटणी अनिवार्य झाली होती...

‘आज कठीण आहे, उद्या आणखी वाईट असेल, पण उद्यानंतर येणाऱ्या दिवशी आशेचा सूर्य दिसू लागेन.’ चीनच्या औद्योगिक पर्वाला डिजिटाईज करणाऱ्या, साम्यवादी हुकूमशाहीच्या छायेतही अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाला लाजवेल इतकं अफाट उद्योग साम्राज्य उभारणाऱ्या अलिबाबाचे संस्थापक जॅक मा अर्थात डॅडी मा यांचं हे वाक्‍य. कधीकाळी त्यांच्या प्रेरणादायी वाक्‍यांनी चीनप्रमाणेच जगाच्या कॉर्पोरेट विश्‍वाचा अवकाश व्यापला होता. त्यांनी अमेरिकेतील उद्योजकांनाही तोंडात बोटं घालायला भाग पाडलं होतं. चीन सरकारनंही त्यांचं वाजतगाजत जगभर प्रमोशन केलं. आता तेच मा चिनी ड्रॅगनसाठी ‘सैतानी भांडवलशहा’ (एव्हिल कॅपिटलिस्ट) ठरलेत.  

मायांचं वेगानं फोफावणारं अर्थकारण आणि चिनी इंटरनेट विश्‍वावरील त्यांचं एकतर्फी वर्चस्व चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या डोळ्यामध्यं सलू लागलंय. याला फक्त अलिबाबाची आर्थिक वाढ हेच एकमेव कारण नाही तर कंपनीच्या हाती एकवटत चाललेलं तांत्रिक बळ आणि त्याच्याखाली दबलेलं मुक्ततेचं वारं कम्युनिस्ट पक्ष आणि पर्यायानं ‘चेअरमन ऑफ एव्हरीथिंग’ बनलेल्या शी जिनपिंग यांना आव्हानात्मक वाटलं नसतं तरच नवल. अलिबाबाच्या या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी चीन सरकारने एकाधिकारशाहीविरोधी कायद्याचा शस्त्रासारखा वापर केला. अलिबाबाप्रमाणं ‘टेनसेंट होल्डिंग’ या कंपनीलाही निर्बंधांना सामोरे जावं लागलं. हे का आणि कसं झालं? याचा धांडोळा घ्यायचा असेल तर आपल्याला या चिनी उद्योगसमूहांच्या उद्योगजाळ्यांत घुसायला हवं. टेनसेंट, अलिबाबा आणि अँट ग्रुप या तीन कंपन्यांची चिनी स्टार्टअप्स आणि उद्योगांमधील गुंतवणूक धडकी भरविणारी आहे. 

सोशल मीडियापासून ते ऑनलाइन कॉमर्सपर्यंत सर्वकाही या कंपन्यांनी गिळून टाकलंय. चिनी माणसाच्या दैनंदिन व्यवहारांना या कंपन्यांनी अक्षरशः कवेत घेतलं आहे. हे वर्चस्व पोलादी कम्युनिस्ट सत्तेला आव्हान देणारं होतं त्यामुळे मा यांना रोखणं एका अर्थाने जिनपिंग यांची राजकीय अपरिहार्यता देखील होती. अर्थसत्ता कितीही फायद्याची असली तरीसुद्धा ती आपलीच मांडलिक राहावी असं देशोदेशीच्या सत्ताधीशांना वाटत असतं. ‘पीपल्स डेली’च्या संपादकीय भाषेत सांगायचं झालं तर ‘उद्योगांची रानटी वाढ ही नियम आणून कमी करावे लागते.’ चीनने आता नेमकं तेच केलंय. 

स्वत ःचं साम्राज्य टिकवायचं तर जॅक मा यांनी चिनी सत्तेसमोर मान तुकवावीच लागेन, म्हणूनच अलिबाबानं अनेक क्षेत्रांतून काढता पाय घेतला आहे. शियामी हा म्युझिक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म बंद करण्याचा कंपनीचा मानस आहे. चिनी मनोरंजन विश्‍वापासून दूर राहण्याचा कंपनीचा विचार आहे. वित्तीय सेवा क्षेत्रामध्येही ‘अँट ग्रुप’चा जीव रमेनासा झालाय. अनेक कंपन्यांमधील मा यांच्या गुंतवणुकीस भविष्यात कात्री लागू शकते. तसं झालं तर अलिबाबाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अर्थात अलिबाबाचे पंख पूर्णपणे कापणे हे चीनला देखील परवडणारं नाहीच. कोरोनाच्या संकटातून चिनी अर्थव्यवस्था आता कोठे सावरू लागली आहे, अशा स्थितीत एका महाकाय उद्योगसमूहाचा बळी देणं हे चिनी यंत्रणेला झेपणारं नाही. म्हणूनच निर्बंधांच्या माध्यमातून अलिबाबाचा होईल तितका शक्तिपात घडवून आणण्यावर चिनी यंत्रणेचा भर दिसतो. 

यंत्रणा झाली चोर 
जॅक मा यांच्या बाबतीत चीन सरकार आता चोरट्यांसारखं वागतंय. आधी त्यांच्या आर्थिक उन्नतीचा लाभ घेणाऱ्या तेथील यंत्रणेनं आता हेच साम्राज्य डोईजड होऊ लागताच त्याला नख लावण्याचं कारस्थान आखलंय. अलिबाबाच्या गुहेत शिरलेल्या या चोरट्यांना डॅडी मां यांचं वर्चस्व खुपू लागलंय. हुकुमशाहीवादी डाव्या अर्थकारणात असं होणं हे काही नवीन नाही; पण कोरोनामुळे सध्या चीनचीच नाही तर अवघ्या जगाची अर्थव्यवस्था संक्रमणकाळामधून वाटचाल करते आहे. अशा स्थितीत एका बड्या उद्योग साम्राज्याचा बळी जाणं दुर्दैवी तर आहेच; पण ते नवउद्यमशील प्रेरणांनाही मारक ठरणारं आहे. 

विशेष म्हणजे डोळ्यासमोर हे सगळंही काही घडत असतानाही भारत अथवा जागतिक समुदाय त्याबाबत काहीही करू शकत नाही, हे सत्य अधिक अस्वस्थ करणारं आहे.

चीन सरकारवरील टीका नडली 
मा विरुद्ध चीन सरकार या संघर्षाची ठिणगी पडली ती  २४ ऑक्‍टोबरला. शांघायमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी चिनी नियमन व्यवस्था नव्या संशोधनाला मारक असल्याचं म्हटलं होतं, एवढंच नाही तर चिनी बॅंकिंग व्यवस्था ही ‘ओल्ड पीपल्स क्‍लब’ असल्याचा दावा केला होता. मा यांची ही विधानं चीन सरकारला चांगलीच झोंबली, त्यानंतर डिसेंबरपासून अलिबाबाच्या पाठीमागं चौकशीचा ससेमिरा लागला. त्याहीआधी नोव्हेंबरमध्ये ‘अँट ग्रुप’चा ३५ अब्ज डॉलरचा आयपीओ शांघाय स्टॉक एक्‍सचेंजने रद्द करत मा यांच्या अर्थकारणाला लगाम घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता ऑक्‍टोबरपासून मा हेच बेपत्ता असल्याचं वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारख्या नियतकालिकांनी प्रसिद्ध केल्यानं खळबळ निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मा यांनी जाणीवपूर्वक विजनवासामध्ये जाणं पसंत केल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. यामागे त्यांचे निश्‍चित असे डावपेच असावेत असंही बोललं जातंय. त्याचं स्वरूप नेमकं काय असेन हे नजीकच्या काळामध्ये दिसेलच. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT