gudi padwa festival MNS Raj Thackeray Shiv Sena bjp Ashish Shelar
gudi padwa festival MNS Raj Thackeray Shiv Sena bjp Ashish Shelar  sakal
संपादकीय

मनसेची नवी पटकथा!

सकाळ वृत्तसेवा

मुखी मृदू भाषा आणि हाती कठीण सोटा या धोरणाने दूरचा पल्ला गाठता येतो.

- थिओडोर रुझवेल्ट, लेखक

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट शिवसेना भवनासमोर गुढी उभारली तेव्हा तेथे भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार यांनी हजेरी लावली होती! त्यानंतरच्या काही तासांतच शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी तसेच शिवसेना यांच्यावर मन:पूत तोंडसुख घेतले. या दोन घटना निव्वळ योगायोग आहेत, असे जर मनसे वा भाजप नेत्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रमाचा भोपळा तसाच राहिलेला बरा! मात्र, मनसेच्या या गुढीपाडवा मेळाव्यामुळे एका गोष्टीवर निश्चितच शिक्कामोर्तब झाले आणि ती म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे ना स्वत:चा काही कार्यक्रम आहे, ना त्यांच्या राजकारणाला काही विशिष्ट दिशा आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी ‘लाव रे तो व्हीडिओ!’ नावाने फड उभे केले होते.

तेव्हा ते काँग्रेस वा राष्ट्रवादी यांच्या वळचणीला उभे राहू पाहत आहेत, असे सतत जाणवत होते. शनिवारी त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य केले, तेव्हा राज ठाकरे यांना आता आपले आगामी राजकारण भाजपच्या वळचणीला राहून करू इच्छित आहेत, यावर एका अर्थाने शिक्कामोर्तबच झाले! दरम्यानच्या काळात राज यांना ‘इडी’ने एक समन्सही धाडले होते, हा निव्वळ योगायोग आहे, असे मानले तरीही त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरचा त्यांचा प्रवास कसा भरकटत गेला आहे, हेच त्यामुळे सामोरे आले. एक मात्र खरे. राज यांच्या या मेळाव्यास गर्दी चांगलीच जमली होती. ‍शिवाजी पार्कवरील अशा सभांना गर्दी जमवण्याच्या कलेत पारंगत असे कोणीही साथीला नसताना वा राज्यभरात कोणत्याही प्रकारची संघटना उभी नसताना अशी गर्दी होणे, हे राज यांच्या लोकप्रियतेचे गमक समजायचे की निव्वळ मनोरजनांसाठी हे लोक पाडव्याच्या सायंकाळी तेथे जमले होते, या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ज्याने त्याने आपल्या मगदुराप्रमाणे द्यायचे आहे! मात्र, गेली १५-१६ वर्षे अशा प्रकारची गर्दी जमवणारा नेता, याच गर्दीचे रूपांतर मतांत का करू शकलेला नाही, या प्रश्नाचे उत्तर मात्र स्वत: राज यांनाच शोधावे लागणार आहे. त्याचे कारण अर्थातच त्यांच्या वेळोवेळी बदलत गेलेल्या रणनीतीत तसेच धोरण विसंगतीत आहे. त्यामुळेच त्याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडते.

शिवसेनेतून बाहेर पडून राज यांनी स्वत:चे स्वतंत्र संस्थान उभे केले तेव्हा महाराष्ट्राच्या आणि विशेषत: मुंबईच्या राजकीय रंगमंचावर शिवसेना-भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी असे दोन प्रमुख खेळाडू होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. या राजकीय वातावरणात किमान मुंबईत तिसरा पर्याय उभा करण्याची राज यांना मोठी संधी होती. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच म्हणजे २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेपेक्षा अधिक आमदार निवडून आणून, त्यांनी आपली ताकद दाखवूनही दिली होती. मात्र, त्यानंतर सारेच काही त्यांच्या हातातून निसटत गेले आणि पुढच्या दोन-पाच वर्षांतच कोणा न कोणा प्रस्थापित राजकीय पक्षाच्या छायेत राहून त्यांचे राजकारण सुरू राहिले. अवघ्या दहा-बारा वर्षांपूर्वी हातात महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ घेऊन जनतेला सामोऱ्या जाणाऱ्या या नेत्यावर आता मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याची हाळी मनसैनिकांना देण्याची वेळ येणे, हा राज यांचा पराभवच आहे. त्यातही सुरुवातीच्या काळात परप्रातीयांना लक्ष्य करत ‘खळ्ळ खट्याक’ अशी नवी ‘राजभाषा’ आणणाऱ्या मनसेवर आपल्या सैनिकांना मराठी ‘भीमरूपी महारूद्रा...’ऐवजी हिंदी ‘हनुमान चालिसा’ पठणाचा आदेश द्यावा लागणे, हे आता त्यांच्या राजकारणाने कशी कोलांटउडी घेतली आहे, तेच दाखवून देत आहे. सुरुवातीच्या काळात थेट बाळासाहेब ठाकरेंच्या देहबोलीची ही ‘नक्कल’ महाराष्ट्राने डोक्यावरही घेतली होती. मात्र, बाळासाहेबांनी राजकारणात उडी घेतली, तेव्हा त्यांच्यासमोर विरोधकांच्या शोधात असलेली जनता होती. राज ठाकरे यांनी हा नकलांचा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा त्यांच्यासमोर अस्सल शिवसेनाच होती. एकाच प्रवृत्तीच्या दोन स्पर्धकांमध्ये लोक मूळच्याला स्वीकारतात, हा इतिहास आहे. त्यातच त्यांची धरसोड करणारा पक्ष ही प्रतिमादेखील राजकीय स्थान न स्थिरावण्याचे कारण आहे.

भाजपसाठी मात्र राज यांचा हा सारा प्रवास सुखद ठरणारा आहे! महाराष्ट्रात डझनभराहून अधिक महापालिकांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करणारा दोस्त आयताच मिळत असेल, तर ते भाजपच्या पथ्यावरच पडणारे असेल. भले भाजप-मनसे यांची आघाडी न होवो; शिवसेनेची मते किमान काही प्रमाणात तरी फोडण्याचे काम शिवसैनिकांमध्ये भ्रम निर्माण करून राज यांनी केले तर ते भाजपला हवेच असणार. शिवाय, कोठेही पाच-दहा मनसे नगरसेवक निवडून आले, तर आघाडी काय ती निवडणुकांनंतरही होऊ शकतेच की! त्यामुळेच राज यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवी पटकथा हातात घेऊन लावलेला हा फड आता गावोगावी रंगणार, अशी चिन्हे आहेत. महाविकास आघाडीला दिलासा देणारी बाब हीच, की या फडाला जमणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतांत करण्यात गेले एक तप तरी राज यांना अपयश येत आहे. शनिवारच्या गर्दीने उत्साहाचे दर्शन घडविले असले तरी तो ‘बॅड पॅच’ गेला, असे म्हणण्यासारखे काही घडलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT