Israel-India
Israel-India File photo
संपादकीय

Israel-India: इतिहासाच्या चष्म्यातून भविष्याकडे बघताना

सकाळ वृत्तसेवा

भारत-इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना तीस वर्षे पूर्ण झाली. इस्राईलच्या राजनैतिक अधिकाऱ्याने या निमित्ताने व्यक्त केलेले मनोगत.

-कोबी शोशानी

तीस वर्षांपूर्वी, १९९२ च्या जून महिन्यात एक तरुण राजनैतिक अधिकारी म्हणून मी दिल्लीच्या जुन्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. उष्म्यामुळे अंगाची काहिली होत असली तरी मला मात्र वसंत ऋतूचे आगमन झाल्यासारखे वाटत होते. भारताने नुकतीच इस्राईलसोबत पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची घोषणा केली होती आणि नवी दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाचे कार्यालय उघडण्यासाठी मी भारतात आलो होतो.

काही दिवसांच्या वास्तव्यानंतर मी मुंबईला भेट दिली. १९५०मध्ये भारताने इस्राईलला मान्यता दिली. मुंबईमध्ये १९५३ पासून इस्रायली कॉन्सुलेट कार्यरत होती. आज भारतातील आमचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास एकत्रितपणे इस्राईलच्या परराष्ट्र विभागाच्या जगभरातील सर्वात मोठ्या कार्यालयांपैकी एक आहेत. गेल्या तीस वर्षांमध्ये भारत आणि इस्राईल संबंधांतील बदल चकित करणारे आहेत.

१९९२ मध्ये भारतातील माझ्या ६ महिन्यांच्या पहिल्या पोस्टिंगदरम्यान मी इस्राईलचे भारतातील पहिले राजदूत इफ्राइम दुबेक यांच्यासोबत काम केले. नवीन संबंध असताना सरकारी अधिकाऱ्यांच्या संशयित नजरा मला आजही आठवतात. पण सामान्य भारतीयांच्या मनातील इस्राईलबद्दलचे प्रेम आणि आत्मीयता पाहून मी भारावून गेलो होतो. भारत आणि इस्राईलमधील संबंधांचा पाया सातत्याने रुंदावत असून त्यात शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, वैज्ञानिक, शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. आज हे संबंध स्वतःच्या पायावर उभे असून उभय देशांच्या अन्य देशांशी असलेल्या संबंधांच्या प्रभावापासून मुक्त आहेत.

भारत-इस्राईल कृषी प्रकल्प हा आमच्या परराष्ट्र मंत्रालयाचा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विकासात्मक सहकार्य प्रकल्प आहे. याद्वारे दरवर्षी हजारो भारतीय शेतकऱ्यांना इस्राईलच्या कृषी क्षेत्रातील अनुभव आणि तंत्रज्ञानाबद्दल शिकण्याची संधी मिळते. जल व्यवस्थापन इस्राईलच्या जनसंपर्काच्या केंद्रस्थानी आहे. आमच्या परराष्ट्र मंत्रालयाने जलव्यवस्थापन तज्ज्ञांसाठी विशेष पद तयार केले असून पहिल्या जलदूतांची नियुक्ती इस्राईलच्या नवी दिल्लीतील दूतावासात करण्यात आली आहे. बुंदेलखंड असो वा मराठवाडा किंवा मुंबई महानगरपालिका; इस्राईल पाण्याच्या एका थेंबांतून जास्तीत जास्त उत्पादन घेणे, पाण्याचा जबाबदारीने वापर आणि पुनर्वापर या क्षेत्रातील ज्ञान आणि तंत्रज्ञान पुरवत आहे.

आज सायबर सुरक्षा क्षेत्रात इस्राईल जागतिक स्तरावर अग्रगण्य देश आहे. भारतात डिजिटल क्रांती घडून येत असून कुशल तंत्रज्ञांची संख्या मोठी असल्याने या क्षेत्रात आम्ही भारताकडे भागीदार म्हणून बघतो. गेल्या तीस वर्षांमध्ये भारत-इस्राईल व्यापार २० पट वाढून वार्षिक चार अब्ज डॉलरच्या घरात पोचला असून अंतर्गत सुरक्षा, वैद्यकीय उपकरणे, एआय, रोबोटिक्स, पदार्थ विज्ञान, स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञान आणि फिनटेकसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याला मोठा वाव आहे. आज इस्रायली विद्यापीठांत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांचा आकडा सर्वात असून आमची विद्यापीठे आणि कंपन्यांत त्यांना मागणी आहे.

संकटांचा सामना करण्यासाठी सहकार्य

भारत आणि इस्राईलला तीव्र दुष्काळ, अवकाळी पाऊस,वाळवंटीकरण आणि सरासरी तापमानातील वाढ अशा नैसर्गिक संकटाच्या धोक्यात वाढ होत आहे. हानिकारक वायूंच्या उत्सर्जनात घट तसेच वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीला नियंत्रित राखण्यातही परस्परांतील सहकार्याला मोठा वाव आहे. सौर ऊर्जा, पाण्याचा जबाबदारीपूर्वक वापर, हरित हायड्रोजन, पर्यायी प्रोटिन्स आणि शाश्वत शेती ही भारत-इस्राईल सहकार्याची नवीन क्षेत्रं होऊ शकतात. आपल्या दोन्ही देशांना प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला असून आधुनिक वैश्विक मूल्यांच्या निर्मितीत दोघांचेही मोठे योगदान आहे. मला विश्वास आहे की, भारत आणि इस्राईल कोविड संकटानंतरच्या जगात समोर येणाऱ्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून त्यांचे संधीत रूपांतर करू शकतील.

शांततामय सहजीवन

आज भारतात ८३ युनिकॉर्न कंपन्या असून त्यांचे एकत्रित गुंतवणूक मूल्य २७७.७७ अब्ज डॉलर इतके आहे. यातील जवळपास निम्या कंपन्या २०२१ साली युनिकॉर्न बनल्या असून यावर्षी त्यात आणखी ५० कंपन्यांची भर पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी इस्राईलमधील ३३ कंपन्या युनिकॉर्न म्हणून घोषित झाल्या. या कंपन्यांनी २५ अब्ज डॉलर गुंतवणूक आकृष्ट केली. विशेष बाब म्हणजे आपल्या दोन्ही देशांतील तंत्रज्ञ अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात. गेल्या वर्षी अमेरिकेत नोंदणी झालेल्या ५०० युनिकॉर्न कंपन्यांच्या १०७८ संस्थापकांपैकी ९० जण जन्माने भारतीय असून ५२ जण इस्राईलमध्ये जन्मले आहेत.

सिलिकॉन व्हॅलीत हिंदी आणि हिब्रू स्थानिक भाषांप्रमाणे बोलल्या जातात. १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून इस्राईलने कायमच शेजारी आणि त्यांच्या सभोवतालच्या देशांसोबत शांततामय सहजीवनाची अपेक्षा केली आहे. दोन वर्षांत चार अरब देशांनी इस्राईलसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले असून इस्राईल आणि यूएईमधील संबंधांनी मोठी उंची गाठली आहे. चाकोरीबाहेरचा विचार करण्याची वृत्ती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखला जाणारा इस्राईल आत्मनिर्भर भारत अभियानात पूरक ठरु शकतो.

गेल्या ३० वर्षांमध्ये भारत आणि इस्राईल यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये वाढ होत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुलै २०१७ मधील इस्राईल दौऱ्याने त्यांना नवीन ऊर्जा प्राप्त झाली. त्यामुळे सामान्य भारतीयांच्या मनातील इस्राईलबद्दलची प्रतिमा बदलली आणि सहकार्याची वाट प्रशस्त झाली. इस्राईलला भारतातील महाराष्ट्रासारख्या राज्यांशीही सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. आपल्या देशांसाठी आणि लोकांसाठीही जलदगतीने आर्थिक विकास गरजेचा असला तरी वातावरणातील बदलांमुळे निसर्गाला त्याची झळ सोसावी लागते.

(लेखक इस्राईलचे मुंबईतील वाणिज्यदूत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT