political flags
political flags 
संपादकीय

Loksabha 2019 : एक चेहरे पे कई रंग... (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे.

होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच, राजकारण्यांच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र उघडे पडू लागले आहेत. शिवाय, त्यांनी आपल्या चेहऱ्यावर आजवर नेमका रंग तरी कोणता फासला होता, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे! महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील तिसऱ्या पातीने चेहऱ्यावरचा काँग्रेसचा तिरंगा पुसून, तिथे भारतीय जनता पक्षाचा भगवा फासला. आता त्याला जेमतेम आठ दिवस होण्याआधीच सोलापुरातील मोहिते-पाटील या आणखी एका मातब्बर राजकीय घराण्यातील तिसऱ्या पातीनेही तोच रंग चेहऱ्याला फासून घेण्याचे निश्‍चित केले आहे. फरक एवढाच की विखे-पाटील घराणे गेली काही वर्षे तिरंगा मिरवत होते, तर मोहिते-पाटील यांच्या घराण्याच्या चेहऱ्यावर रंग कोणताही असला, तरी त्यांनी हाताला राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले होते. मात्र बदलत्या राजकीय हवेचा अंदाज घेऊन त्यांनी ते घड्याळ हातावरून उतरवून ठेवले आहे. त्याच वेळी तिकडे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. सी. खंडुरी यांचे चिरंजीव मनीष यांनी घराण्याचा वारसा असलेल्या भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याऐवजी काँग्रेसच्या तिरंग्यासोबत वाटचाल करण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यामुळे अपरिमित आनंद झाला असून, मनीष यांना त्यांच्या पिताश्रींच्या मतदारसंघातूनच लोकसभा उमेदवारी मिळेल, अशी चिन्हे आहे. तिकडे पूर्व भारतात त्रिपुरा भाजपचे उपाध्यक्ष सुबल भौमिक यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘नागरिकत्व नोंदणी विधेयका’ला विरोध करत काँग्रेसचा गंडा बांधला आहे. त्यामुळेच या राजकारण्यांच्या दिखाऊ चेहऱ्यावर रंग नेमका असतो तरी कोणता प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राचा विचार करता या रंगबदलू राजकारण्यांमधील सर्वांत लक्षणीय रंगबदल अर्थातच विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या चिरंजीवांचा आहे. विजयदादा हे काँग्रेसच्या राजवटीत अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगत लाल दिव्याच्या गाडीतून मिरवत होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर विजयदादांनी त्यांना साथ देणे, हे अपेक्षितच होते. विजयदादा हे अगदी अलीकडल्या काळापर्यंत म्हणजे पवारांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेईपर्यंत त्यांचे कट्टर समर्थक होते. त्यानंतर माढ्यातून ते स्वत: लढतात की त्यांचे चिरंजीव रणजितसिंह एवढाच प्रश्‍न बाकी असताना, रणजितसिंह यांनी भाजपकडे उडी मारली. शिवाय, त्याचवेळी ‘पवारांनी आपल्यावर अन्याय केला!’ असेही तुणतुणे या घराण्याने वाजवले. स्वत: रणजित यांना ‘राष्ट्रवादी’ने राज्यसभेचे सदस्यत्व बहाल केले होते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही दिले होते. २०१४ मध्ये ‘राष्ट्रवादी’च्याच तिकिटावर विजयदादा लोकसभेतही निवडून गेले होते. पिता-पुत्रांना एवढी सत्तेची पदे मिळाल्यानंतरही ‘मोहिते-पाटील घराण्यावर अन्याय’ झाल्याची भाषा करणे म्हणजे या पिता-पुत्रांना नेमके हवे होते तरी काय, असा प्रश्‍न मूढजनांना पडू शकतो. मात्र तो फिजूल आहे. गेल्या काही महिन्यांपर्यंत सोनिया गांधी, तसेच राहुल गांधी यांच्या निकटवर्ती वर्तुळात असलेल्या टॉम वडक्‍कन यांनी निवडणुकीच्या तोंडावर चेहऱ्याला भगवा रंग लावून घेतला असला, तरी त्यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या एका ‘ट्‌विट’मध्ये या प्रश्‍नाचे उत्तर आहे. ‘भाजपमध्ये गेलात की सारे गुन्हे माफ होतात!’ असे वडक्‍कन यांनी म्हटले होते. सत्ताधारी भाजपच्या दृष्टिकोनावर त्याने झगझगीत प्रकाश पडतो.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार करताना, राज्यातील गावोगावची काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ची घराणी मोडून काढण्यावर भर दिला होता. मात्र ही घराणी मोडणे म्हणजे त्यांना पावन करून घेत भाजपमध्ये सामील करून घेणे, असा त्याचा अर्थ असल्याचे कोणाच्या ध्यानीमनीही आले नसेल. मात्र आता घराणेशाही मोडण्याचा एकमेव अर्थ ‘काँग्रेसयुक्‍त भाजप’ करणे, हा आहे हे सर्वांनाच कळून चुकले आहे. लोकप्रतिनिधींच्या ‘आयाराम-गयाराम’ वाटचालीवर बंदी घालण्यासाठी तीन दशकांपूर्वी पक्षांतरबंदी विधेयक आणले गेले आणि या पक्षबदलूंना लगाम घातला गेला असल्याचे चित्र उभे राहिले. प्रत्यक्षात हे दलबदलू भलतेच हुशार निघाले! त्यांनी आता बदलत्या हवेची दिशा लक्षात घेऊन निवडणुकांपूर्वीच ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षे जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्तेची पदे उपभोगल्यानंतर त्यांना आता ती सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत. त्यासाठी मग राजकीय विचारसरणी, पक्षाची ध्येयधोरणे, आजवरचे आदर्श या साऱ्यांना तिलांजली देण्यास त्यांची तयारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT