PNE17N25676
PNE17N25676 
संपादकीय

ज्येष्ठांनो व्हा आनंदाचे 'सांगाती' 

संजीवनी चाफेकर

सध्याच्या काळात खरी गरज आहे ती प्रत्येकाने, अन्य कोणालाही गृहीत न धरता एकूण आयुष्य आपण कसं जगणार आहोत, याची आखणी केलेली असणं. एकूण जीवनमान आणि आरोग्यसेवा चांगल्या झाल्याने साठीनंतरही किमान 10 ते 12 वर्षे माणूस कार्यरत असतो. (बहुतेकांचे "सहस्रचंद्रदर्शन'ही होते) वृद्धापकाळ येतो आहे हे खऱ्या अर्थाने जाणवायला लागतं, जेव्हा प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात आणि एकूण ऊर्जा, उत्साह आणि ताकद कमी व्हायला लागते. मग मुलांनी नाही सांभाळलं, सहचर आपल्या आधीच गेला/गेली तर, वृद्धाश्रमात रहावं लागलं तर, अशा चिंता सुरू होतात. रोज तणावाखाली जगण्यापेक्षा यावर काही उपाय शोधता येईल का? हा विचार मनात यायला एक निमित्त झालं. एका इमारतीत पाच वयोवृद्ध स्त्रिया एकेकट्या आपापल्या मोठाल्या दोन बेडरूमच्या फ्लॅटमधे रहात होत्या. 

रोज प्रत्येकीकडे टीव्हीवर तीच मालिका चालू असायची. प्रत्येकजण वीजबिल, पेपरबिल, फोनबिल, कामवाली, सोसायटीचे पैसे इत्यादी द्यायच्या. वाणसामान आणयाच्या. भाजी आणयच्या. तीसुद्धा आतपाव, अर्धी जुडी अशी. स्वतःच शिजवायचं आणि एकटं बसून खायचं! त्यांना मी सुचवलं की तुम्ही पाचीजणी दोन फ्लॅटमधे एकत्रच का रहात नाही? आठ खोल्यांतील प्रत्येकीला एक स्वतंत्र खोली, एक स्वयंपाकघर, टीव्ही आणि अन्य मनोरंजनासाठी एक खोली, एक हॉल. स्वयंपाकाला, घरकामाला माणूस ठेवा. एकत्र फिरायला जा, पत्ते खेळा, सिनेमा नाटकाला जा, पुस्तकं वाचा, चर्चा करा. जेव्हा एकटं असण्याची गरज वाटेल तेव्हा स्वतःच्या खोलीत जा. एकत्र राहून तुमची जी बचत होईल तिचा वापर गरज असल्यास गाडी आणि ड्रायव्हर ठेवण्यासाठीदेखील करता येईल. पण त्यांना हा मार्ग पटला नाही. याचं कारण म्हणजे नवा बदल स्वीकारण्याविषयीची भीती आणि दुसरा मुद्दा म्हणजे "एकाच इमारतीत राहणाऱ्या' हे सोडता त्यांच्यात काहीच सामाईक नव्हतं. त्यामुळे त्यांचा नकार स्वाभाविक होता. पण जुळवून घेण्याची तयारी दाखविली तर यावर मार्ग निघू शकतो. 

एकट्याने राहणारे ज्येष्ठ नागरिक सुरक्षितही राहिलेले नाहीत. अनेक ज्येष्ठांना आपल्याला काही झालं तर नातेवाईक किंवा शेजारी यांना लगेच कळणारही नाही, याची चिंता पोखरत असते. या सगळ्यावर एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजेच धडधाकट असताना आपणच आपल्या आवडीचा वृद्धाश्रम निर्माण करणं! याची कल्पना अशी आहे.... याला सोयीसाठी "सांगाती' असं नाव देऊ... मुलांच्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर आपल्याच मित्रमंडळींबरोबर आपण एकत्र राहायचं. अर्थातच या मित्रमंडळींची जेव्हढी घट्ट मैत्री असेल आणि जितक्‍या गोष्टी समान असतील तितका हा गट चांगला होईल. सर्वात पहिला फायदा म्हणजे आपण नेहमीच माणसात राहू. तेही ज्यांच्याशी आपली दीर्घकाळ/घट्ट मैत्री आहे आणि काही गोष्टी समान आहेत अशांबरोबर. यात "चीपर बाय डझन' हा फायदा आहेच. शिवाय अनेक जबाबदाऱ्याही वाटल्या जातील. व्यक्ती हे एकक असेल. नवरा, बायको, आई वा वडील असले तरी त्यांना स्वतंत्र खोल्या असतील आणि प्रत्येकजण स्वतंत्रपणे आर्थिक योगदान देईल. म्हणजेच आईवडिलांसहदेखील "सांगाती'त सामील होता येईल. 

वर्षानुवर्ष एकाच घरात राहणाऱ्या सासू-सुना किंवा जावा यांच्यात मुख्य कलहविषय असतो तो म्हणजे पैसे आणि घरकाम. त्यामुळे "सांगाती' चे नियम ठरवताना जिथे जिथे आर्थिक किंवा शारीरिक परिश्रमाचे प्रश्न असू शकतील ते आधीच स्पष्ट करून घेता येतील. पाहुणा आला तर त्यापोटी किती पैसे 
द्यायचे हेही चक्क ठरवून ठेवता येईल. कारण बऱ्याचदा, "आम्ही नाही पै पै चा हिशोब करत' असं म्हणताना, गेल्यावेळी मी बिल दिलं तर या वेळी त्यांनी द्यावं ही अपेक्षा मनात असतेच. हे मी सगळंच ढोबळमानाने मांडते आहे. जो गट "सांगाती' बनवू इच्छितो, तो आपले नियम आपणच बनवेल. यात जास्तीतजास्त 10 ते 12 जण असतील असे अपेक्षित आहे. कारण त्यापेक्षा मोठा गट असेल तर त्याचे व्यवस्थापन हाच एक मोठा उद्योग होऊन बसेल. यात पहिलाच आक्षेप येईल तो म्हणजे "मैत्री असणं' आणि "रोज बरोबर राहणं' यात फरक आहे. 

कुठल्याही दोन व्यक्तींना, नवरा बायको असले तरी काही प्रमाणात एकमेकांशी जुळवूनच घ्यावे लागतेच ना? मग एका मोठ्या टप्प्याची सुरवात म्हणून काही प्रमाणात जुळवून घेण्याची तयारी ठेवायला काय हरकत आहे? या प्रयोगातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यात परतीचा मार्ग आहे. नाही योग्य वाटलं तर आपण आपल्या जुन्या व्यवस्थेत परतू शकतोच! 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT