संपादकीय

पहाटपावलं : हिरवाईचं पुनरुज्जीवन

डॉ. श्रीकांत चोरघडे

आज माझं वय ऐंशीच्या जवळपास आहे. माझ्यापेक्षा दुपटीनं, किंबहुना जास्त वर्षांनी मोठा असलेला वटवृक्ष गेली कित्येक वर्षे बघतो आहे. मी शालेय मुलगा होतो, तेव्हा सहलीसाठी नागपूरच्या दक्षिणेला अंबाझरी तलाव आहे, त्याच्या बांधावर जेवणाचे डबे घेऊन आम्ही जात असू. बाराही महिने हिरवागार असलेला हा वृक्ष, आसपास वरून येऊन जमिनीत गेलेल्या पारंब्या, विविध पक्ष्यांचा कलरव या अनुभवांची शिदोरी घेऊन आम्ही सायंकाळी घरी जात असू. त्या काळी अंबाझरी तलावाचं पाणी पिण्यायोग्य होतं व आसपासच्या वस्त्यांमध्ये ते नळाद्वारे पुरवलं जायचं. त्या काळात नागपूरचा विस्तार या तलावाच्या पश्‍चिमेकडे होता. तलावाच्या उत्तरेकडे हिरवीगार झाडी होती. 
माझ्या हयातीतच नागपूरचा विस्तार होत गेला, रस्ते रुंद झाले नि हिरवाई कमी झाली. सीताबर्डीपासून अंबाझरी धरणाच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं होती व त्यांचा पिसारा रस्त्यावर सावली धरीत होता. हा रस्ता या महावटवृक्षाच्या बुंध्याला संपतो. शहर मोठं झालं, रस्ते रुंद झाले, तशी या वटवृक्षाची मुळं छाटली जाऊ लागली. पारंब्या कापल्या जाऊ लागल्या. फांद्याही छाटल्या गेल्या आणि हा महावृक्ष वठणार असं वाटू लागलं. मुळांचा आधार गेला तर कोसळण्याची शक्‍यताही निर्माण झाली. 

नागपुरात "ग्रीन व्हिजिल फाउंडेशन' नामक संस्था आहे. ही बाब त्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनाला आणून दिली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व महावृक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला. झाडाभोवती भिंत बांधून त्यात माती, खत टाकून नियमित पाणी दिलं, तर झाड जगू शकेल, नवी उभारी घेऊ शकेल, असा सल्ला फाउंडेशननं दिला व त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. 

जागतिक स्तरावर प्रतिमाणशी झाडांची संख्या कमी झाली आहे. अशा वेळी नवं वृक्षारोपण तर आवश्‍यक आहेच, तसे प्रयत्नही सुरू आहेत. "वनराई'सारख्या संस्थासुद्धा अशा उपक्रमात सहभागी आहेत. वनविभागातर्फे वृक्षारोपण करून नवी जंगलं उभी केली जात आहेत. नागपूरजवळ पेंच प्रकल्पात हा प्रयोग झाला आहे. त्या प्रकल्पाच्या आसपास मोकळं माळरान होतं. तिथं आता दाट जंगल आहे. तिथं वन्यप्राणी, पक्षी बघायला मिळतात. असाच दुसरा गोरेवाडा प्रकल्प नागपूरजवळ सुरू झाला आहे. तरीही जुन्या महावृक्षांचं जतन होण्याला वेगळं महत्त्व आहे. वृक्ष मोठा होण्यासाठी बराच काळ लागतो. या काळात वाढलेला वृक्ष कापला गेला, वाळला किंवा वठला, तर त्या जागी तेवढ्या आकाराचा महावृक्ष व्हायला कित्येक वर्षे लागतील. 

म्हणूनच या सत्याच्या पार्श्‍वभूमीवर अंबाझरी तलावाकाठच्या महावृक्षाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न महत्त्वाचे वाटतात. ही चळवळ देशभर पसरली, तर हरितक्रांती यशस्वी होण्याची प्रक्रिया जास्त वेगाने होईल, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT