hous of bamboo sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : मीना’ज वर्ल्ड... बॅग भरो, निकल पडो!

नअस्कार! ‘केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार । शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ।’ असा एक जुना सुविचार आहे. पुण्यात चतुर मनुजांची कमतरता नाही.

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! ‘केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार । शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ।’ असा एक जुना सुविचार आहे. पुण्यात चतुर मनुजांची कमतरता नाही. देशाटन करणारांचीही नाही, नि पंडितमैत्री तर वाडेश्वर, रुपाली, वैशाली, अनिल पानवाला, नळ स्टॉपची खाऊगल्ली अशा कितीतरी ठिकाणी शक्य होते.

सभेत संचारासाठी विविध सभांची योजना गल्लीगल्लीत आहे. शास्त्रग्रंथ विलोकनाची पुणेकरांना येवढी गरज पडत नाही, पण पडलीच, तर तशीही मुबलक सोय आहेच. थोडक्यात, पुणे हे गावच चतुर मनुजांचं. तथापि, अशा चतुर मनुजांपैकी कुणी सात समुद्र ओलांडून जग पालथे घालावं, आणि अधिक चतुर होऊन (पुन्हा पुण्यात) यावं, ऐसा सुपरपुणेकर विरळा!

माझी परमप्रिय मैत्रीण आणि भोसलेनगरची शान डॉ. मीनाताई प्रभू अशीच सुपरपुणेकर अाहे.त्यांचं मी मन:पूर्वक अभिनंदन करत्ये. कारण त्या जगप्रसिद्ध प्रवास-वर्णनकार असून त्यांनी मराठी भाषेची आजवर केलेली सेवा ‘जीवन गौरव’ पुरस्कारास पात्र असल्याचं ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’स एकदाचं कळलं!! त्यांचंही अभिनंदन!!

प्रवासवर्णनकार डॉ. मीनाताई प्रभु यांच्याकडे बघूनच वरील सुविचार सुचला असावा, असं मला वाटत असे. पण मीनाताईंच्या बरंच आधी हे तुळईवरलं वाक्य लिहिलं गेलं होतं, असं आढळतं. सुविचारातला प्रत्येक शब्द मीनाताईंना लागू आहे, हे सांगणं न लगे. नव्हे, जगातील किमान पाच-पन्नास देशांतील वाचकांना ते ठाऊक असेल. जिथेजिथे त्यांची पदकमलं पोचली, तिथेतिथे त्यांनी कलमही चालवलं.

अनेक मराठी माणसांना देशोदेशांची सैर घडवली. ज्या देशांत त्या अद्याप गेल्या नाहीत, त्यांनी ‘आम्हाला का वगळले’, अशी तक्रारवजा विचारणा भारताच्या परराष्ट्र खात्याकडे केल्याचे खात्रीलायक गोटांतून समजते.असो. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब कळून चुकल्यानंतर बऱ्याच काळानं ‘मसाप’लाही याचा सुगावा लागला, हे मात्र बरं झालं.

मीनाताई मूळच्या पुण्याच्या असल्याचे पुरावे लंडनमध्ये मिळतात. पुण्यात त्या डॉक्टरकी शिकल्या. त्या भूलतज्ज्ञ होत्या. पण भूलबिल देण्याची पुणेकरांना गरज नसते, हे वेळीच लक्षात आल्यानं लग्नानंतर त्यांनी लंडन गाठलं. तिथं ‘माझं लंडन’ हे पुस्तक आधी लिहून काढलं.

‘मौजे’च्या राम पटवर्धनांनी त्यांच्या लेखणीला तेव्हा जे टोक काढलं, (अर्थ : आठ-नऊ वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढायला लावलंन!) ते कधी बोथट झालंच नाही. आता पुण्यातल्या रास्ता पेठेतील एका युवतीनं लंडनमध्ये जाऊन साहेबाच्या नाकावर टिच्वून ‘माझं लंडन’ असं ठणकावून सांगणं हा पुणेकर असल्याचाच पुरावा नाही का?

‘माझं लंडन’ मध्ये त्यांनी केलेलं लोकजीवनाचं वर्णन, व्यक्तिरेखा, ठिकाणं मराठी वाचकांना इतकी जवळची वाटली की, आपणही लंडनला राहातो असं काहींना वाटू लागलं! मी स्वत: मीनाताईंचा हात पकडून (पक्षी : पुस्तक हातात पकडून) तुर्कस्तान, ग्रीस, चीन, इराण, वगैरे देश फिरुन आल्ये आहे. नॉर्वेच्या उत्तरीय उजेडाचा नभांगणातला चमत्कार शब्दबद्ध करताना मीनाताईंना तिथं राधा आणि घन:श्यामाचे रंग दिसले होते.

मीनाताईंच्या लेखणीतून उतरलेला तो परिच्छेद अक्षरवाङमयात समाविष्ट झालाय. मीनाताई निम्मं-अधिक जग फिरुन आल्या. परदेशात फिरताना त्यांचं मराठीपण कधीही, एक क्षणभरही सुटलं नाही. म्हणून तर ते प्रवासवर्णन त्यांचं एकटीचं उरलं नाही. आपणही त्यांचे सहप्रवासी झालो.

‘मसाप’चा जीवनगौरव त्यांना आधीच मिळाला असता; पण बाईसाहेबांचा पाय कुठं टिकतो पुण्यात? बॅग भरो, निकल पडो, हाच खाक्या. -मधल्या काळात एखादं पुस्तक!! हेच चालू आहे. यंदा मात्र त्या आयत्या तावडीत सापडल्यामुळे पुरस्काराचं जमून गेलं असावं. चांगलं आहे! मीनाताईंसोबत आणखी काही पुरस्कारही ‘मसाप’नं जाहीर केले आहेत. त्यांचंही मन:पूर्वक अभिनंदन. त्यांची ओळख नंतर कधीतरी देईनच. तूर्त तरी मीनाताईंची पावलं पुरस्कार स्वीकारायला कशी येतात, त्याकडे डोळे लावून बसल्ये आहे. प्रभुच्या चरणांवर भिंगरी असते, हे आधी लक्षातच आलं नव्हतं ना!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT