Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : नया है वह..! (दिल्ली डायरी : एका माजी मुख्यमंत्र्याची…)

ब्रिटिश नंदी

माझे अतिशय विश्वासू मित्र श्री. नानासाहेब फडणवीस यांच्यासोबतच दिल्लीला आलो. विमानतळावर उतरल्यावर सवयीने टॅक्सीवाल्याला ’१०, जनपथ’ असा ॲड्रेस सांगत होतो, पण नानासाहेबांनी अडवले. म्हणाले, ‘‘आता जिभेला नवे वळण द्या, अशोक्राव!’’ मी चपापलो. जीभ चावून टॅक्सीवाल्याला म्हटले, ‘‘ भाजपमंडपम में जानेका है!’

‘च…च…भारतमंडपम, अशोक्राऽऽव..,’’ नानासाहेब चुकचुकले. भारतमंडपमच्या भव्य वास्तुमध्ये आमच्या पक्षाचे (पक्षी : भाजपचे) राष्ट्रीय अधिवेशन चालू झाले आहे. देशभरातून साडेअकरा हजार प्रतिनिधी आले आहेत. सगळेच्या सगळे पक्षाचे कार्यकर्ते! नेता कुणीच नाहीत!! आमच्या काँग्रेसमध्ये असे नव्हते. तिथे सगळेच नेते असायचे, कार्यकर्ते कोणीच नाही. हा ठळक फरक मी नोंदला.

अधिवेशनाच्या ठिकाणी मंगलमय वातावरण होते. जागोजाग फुले ठेवलेली होती. ताजी ताजी! आमच्या काँग्रेसमध्ये सुताच्या माळा असत. फुलेबिले हॅ:!! एका ठिकाणी स्वत: नड्डाजी फुलांची सजावट करताना दिसले. राजनाथसिंहजी सिक्युरिटीच्या वॉचमनांना समोर उभे करुन शुद्ध तुपात तळलेल्या हिंदी सूचना करत होते : ‘अतएव जब माननीय प्रधानमंत्रीजी पधारेंगे, तब योग्यसमयत: परस्परों में तालमेल रख सुचारुरुपसे सुरक्षा की व्यवस्था संभालनी होगी.

अंतत: यह सब उन्ही के कारण चल रहा है, ध्यान रहें!’’…वगैरे वगैरे. मला गरगरु लागले. खुद्द मोटाभाई ऊर्फ अमितभाई माइक टेस्टिंग करत होते. आपले सर्वांचे लाडके नितीनजी गडकरी लाल कारपेट हा जणू हायवेच असल्यासारखा निरखून बघत होते. किती हा साधेपणा! माझे मन भरुन आले…

पहिल्या गेटपाशी मला सिक्युरिटीवाल्याने ओळखपत्र विचारले. मी शेजारच्या नानासाहेबांकडे बोट दाखवले. म्हटले, ‘‘हेच माझे ओळखपत्र आहेत!’’ त्यांनी आत सोडले. बाकी भाजपवाल्यांची कमाल आहे. त्यांच्या पक्षात प्रवेश करुन जेमतेम अठ्ठेचाळीस तासदेखील झाले नसताना, मला इमेलवर अधिवेशनाचे आमंत्रण आलेसुद्धा! नाहीतर आमची काँग्रेस!! तिथे निमंत्रण वगैरे भानगडी नसतात. स्वत:हून जायचे असते. गेल्यावर हायकमांडच्या पुढे त्यांच्या डोळ्यात येईल, असा वावर ठेवावा लागतो. तीच हजेरी!!

भारतमंडपममध्ये माझे स्नेहपूर्ण स्वागत झाले. ‘नया है वह’ असे माझ्याकडे बघून काहीजण कुजबुजले, पण मी सपशेल दुर्लक्ष केले. आम्ही आपापल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. मी खाली कार्यकर्त्यांमध्ये बसलो, नानासाहेब मंचावर जाऊन बसले. एकंदरीत या गृहस्थांची दिल्लीत भलतीच वट आहे, असे मला दिसले. सगळे जण एकमेकांकडे बघून ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत होते. मी आपला मराठी पद्धतीने ‘राम राम’ घालत होतो. मीसुद्धा आता भगव्या रंगाचा कुर्ता शिवून घेणार आहे.

तेवढ्यात प्रचंड शंखनाद झाला. मला वाटले, साक्षात मोदीसाहेबच आले. पण नाही! उत्तर प्रदेशचे बुल्डोझरबाबा ऊर्फ योगीजींचे आगमन झाले होते. सगळे हात जोडून उभे राहिले. मीही जोडले. थोड्यावेळाने अचानक भव्य मंडपात चिडीचूप शांतता पसरली. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. नो शंखनाद, नो तुतारी! मी हळूच बघितले. प्रवेशद्वारातून मोदीसाहेब येत होते. त्यांच्या मागे फूटभर अंतर ठेवून मोटाभाई आणि त्यांच्याही मागे नड्डाजी!

माझ्याकडे बघून मोदीसाहेबांनी, ‘‘काय कसा काय महाराष्ट्रा?’’ असे शुद्ध मराठीत विचारले. मी ‘मस्त’ अशी खूण केली. त्यांनी ‘च्यांगला हाय’ असे काहीसे पुटपुटून मंचाकडे प्रस्थान केले. मी लक्षपूर्वक देशाच्या विकासाचे मोठमोठे बेत ऐकू लागलो. शेवटी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच खरे. मनात अचानक महामॅडमची आठवण दाटून आली. मी हुंदका आवरुन पुढल्या भाषणांमध्ये लक्ष घातले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT