Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : ऐसे मनमौजी को मुश्किल है समझाना...!

पत्रिकेतील सूचना अशी होती : संगीत कार्यक्रमाप्रीत्यर्थ वेळेत किल्ले बरवाडा येथे पोचावे. त्यासाठी आपणांस ‘पिचकी पिपाणी’ असा गुप्त कोड देण्यात आला आहे.

ब्रिटिश नंदी

ओमिक्रॉन, शेतकऱ्यांचे आंदोलन, चिन्यांची आगळीक, अर्थव्यवस्थेचा बोजवारा, बुडालेले रोजगार, एस्टी कामगारांचा संप, निवडणुका,आदी भंपक टाइमपासमधून जरा डोके वर काढा, आणि राजस्थानातील सवाई माधोपुरनजीकच्या किल्ले बरवाडा मंगल कार्यालयात सुरु असलेल्या महत्त्वाच्या घडामोडीकडे लक्ष द्या. तेथे एक गुणी सितारा आणि अत्यंत नवगुणी तारका यांचे शुभमंगल पार पडले आहे. या सोयरिकीमुळे जगातील राजकारण आणि समाजकारणात केवढी तरी उलथापालथ होणार आहे. मंगलकार्य सिद्धीस नेण्यास विक्की-क्याट हे दोघेही समर्थ असले तरी कार्याची शोभा करण्यास, (आमच्यासारख्या) दर्दी वऱ्हाडकऱ्यांची खरी गरज होती. विक्की-क्याट विवाहाचे निमंत्रण तुम्हाला नसेल. कसे असणार? तुम्ही कुठे व्हीव्हीआयपी आहा? पण आम्ही आहो!!...आम्हाला दोन्हीकडून निमंत्रण होते.

पत्रिकेतील सूचना अशी होती : संगीत कार्यक्रमाप्रीत्यर्थ वेळेत किल्ले बरवाडा येथे पोचावे. त्यासाठी आपणांस ‘पिचकी पिपाणी’ असा गुप्त कोड देण्यात आला आहे. प्रवेशद्वारावरल्या साडेसहा फूट उंचीच्या सुरक्षा रक्षकास ताबडतोब हा गुप्तकोड सांगावा. अन्यथा विपरीत परिणाम होतील. कोड सांगितल्यावर आत सोडले जाईल. तेथे संगीत कार्यक्रमात आपण ‘अपना टाइम आयेगा’ या मधुर गीताच्या दिलखेचक तालावर नृत्य पेश करावयाचे आहे. तदनुसार आम्ही संगीत कार्यक्रमास उपस्थित राहिलो. नववधूने ‘चिकनी चमेली, बिलकुल अकेली, पव्वा लगा के आई’ या भावमधुर व अर्थपूर्ण गीताच्या तालावर काही पदन्यास करुन उपस्थित वऱ्हाडाच्या डोळ्यांच्या कडा भिजवल्या. गीताचे नवथर बोल आणि त्यावर नवनवोन्मेषशालिनी नृत्य…अहा!! नव-वरानेही असेच कुठलेसे लालित्यपूर्ण नृत्य पेश केले.

स्वत:च्याच विवाहप्रसंगीही मनोरंजनाचे ब्रीद या दांपत्याने सोडले नाही. केवढी ही कर्तव्यनिष्ठा! किती हा जाज्वल्य कर्तव्यभाव! भोजनात प्याज की कचोरी, गोंड पाक, ढोकळा आदी पदार्थांची रेलचेल होती. आम्ही स्वत: साडेतीन तास पानावर बसून श्वास लागेतोवर जेवलो. नंतर आमचा तेथेच डोळा कधी लागला, ते कळले नाही.

विवाहाचे कव्हरेज करण्यासाठी किल्ले बरवाडापासून पाच किलोमीटर अंतरावर ओबी व्हॅनच्या रांगा लागल्या होत्या. जगातील सर्व माध्यमांचे लक्ष नाही म्हटले तरी याच समारंभाकडे लागले होते. एखादी जबरदस्त आंतरराष्ट्रीय घडामोड टिपण्यासाठी माध्यमांची अशी चढाओढ होणारच. सर्वच च्यानले लग्नाचा वृत्तांत देण्यासाठी उत्सुक होती. पण हा दोन जीवांचा खाजगी मामला होता. आपले खाजगीपण जपण्यासाठी विक्की आणि क्याटने ‘लांबून काय ते टिपा’ असे सांगून माध्यमकर्मींना किल्ल्याचे दरवाजे बंद करुन टाकले.

आम्ही मात्र सारे काही जवळून टिपत होतो. बरवाडा किल्ल्यात वरातीचे घोडे उभे होते. पालख्याही होत्या. घोड्यावर बसावे की पालखीत? हा निर्णय आम्हाला घेता येईना. घोड्याजवळ गेलो असता त्याने एकदा ‘फुर्रर्र’ असा आवाज काढला. मागील खूर जोरात हापटला. आम्ही निमूटपणाने पालखीकडे वळलो. परंतु, पालखीवाहकाने (माणूस असूनही) जवळपास तसाच आवाज काढून खूरही हापटला! शेवटी पायीच निघालो…

अक्षता टाकताना शेजारील वऱ्हाडी आम्हास म्हणाला : या लग्नाचे प्रक्षेपणाचे हक्क एका ओटीटी मंचाला ९० कोटीला विकले गेले आहेत. खर्च कसला? प्रॉफिट झालंय…’

लग्नातल्या प्रॉफिटचे विशेष वाटले नाही. ‘भारतातील सर्व उग्र समस्यांचे या मंगलप्रसंगी निराकरण झाले, हेच आपले प्रॉफिट’ असे म्हणून आम्ही मनातल्या मनात अक्षता टाकून उभयतांस ‘नांदा सौख्यभरे’ असा आशीर्वाद देऊन कढीभाताचे जेवण जेवून कार्यालय सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: दोघेही 'क्लास वन' अधिकारी, स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ केले शूट; पुण्यात खळबळ

Matheran: माथेरानमध्ये टॅक्‍सीसेवा बंद, घाटमार्गावर पर्यटकांची पायपीट!

ENG vs IND, 4th Test: अंशुल कंबोजचं पदार्पण नक्की? कर्णधार गिलने स्पष्ट संकेतच दिले; रिषभ पंत खेळणार की नाही, हेही सांगितलं

Sanitation Workers Strike: सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश, अखेर संप मागे!

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरच्या जुन्या स्तंभावरुन नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT