Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग ; करेक्ट कार्यक्रमाचे स्वप्न!

-ब्रिटिश नंदी

आजची तिथी : राक्षसनाम संवत्सर श्रीशके १९४३ वैशाख कृ. प्रतिपदा.

आजचा वार : नमोवार…याने की गुरुवार!

आजचा सुविचार : स्वप्नात रंगलो मी, झोपेत जागलो मी!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा जप लिहिणे. नेम चुकवू नये.) कालबुध्द पौर्णिमा होती. गुरुवर्य नमोजी यांनी बुद्धजयंतीनिमित्त जो उपदेश केला, त्याचा परिणाम संध्याकाळपर्यंतच टिकला. कारण तेवढ्यात काँग्रेसवाल्यांनी काहीतरी गडबड सुरु केल्याचे कानावर आले. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाभकास आघाडीत रण पेटले असून काँग्रेसवाल्या नानाभाऊ पटोलेजींनी आवाज चढवल्याने प्रकरण वाढणार, अशी खबर आमचे कमळाध्यक्ष मा. चंदुदादा (कोल्हापूरकर) यांनी दिली. म्हणाले, ‘‘तुमचे बांदऱ्याचे मित्र म्हणतात की सरकार टिकवणं ही काही आमची एकट्याची जबाबदारी नाही!’’ मी चौकशी करुन बातमी कन्फर्म करुन घेतो असे सांगितले. सरकार टिकवण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून माझ्यावरही आहेच!

काहीही असले तरी या महाभकास आघाडीच्या लोकांवर माझा आता विश्वास उरलेला नाही. हे तीनचाकी सरकार स्वत:च्याच वजनाने पडेल, असे भाकित मी अठरा महिन्यांपूर्वी केले होते, पण काय घडले? काहीही नाही! दीडशे किलो वजनी गटातला आळशीढाण माणूस बीपी, मधुमेह अशा सहव्याधीसह कोविड केंद्रात दाखल व्हावा, आणि चारसहा दिवसात हसत हसत बाहेर आल्यावर जे वाटते, तस्से अनेकदा वाटले!! हे सरकार आता पडणार नाही, याची मलाच खात्री वाटू लागली आहे.

सकाळी घरीच चहा घेत असताना मा. चंदुदादा पुन्हा एकदा घाम आणि चष्मा दोन्ही एकाच वेळी पुसत आले. (या दोन्ही कृती ते एकाच वेळी कशा करतात, हे पाहण्याजोगे असते! ) त्यांनी तीन मास्क एकावर एक लावले होते. त्यांना चहा विचारला. मानेनेच नकार देत त्यांनी एकेक मास्क उतरवला.

‘नै…आज गुरुवार, साबुदाणा खिचडी नाही का,?’’ त्यांनी सैपाकघराकडे नजर टाकत पृच्छा केली. मी साबुदाणा अजून नीट भिजला नाही, असे सांगून दिले. त्यांनी दिलेली राजकीय माहिती तशी उत्साहवर्धक होती. पदोन्नतीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसवाल्यानी म्हणे असे ठरवले आहे की जीआर रद्द झाला नाही तर सत्तेतून बाहेर पडायचे, आणि या सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यायचा!

‘मग काय उपयोग?’’ मी म्हणालो.

‘नै…ते बरोबर आहे, पण मला वाटतं की हे सरकार कधीही पडेल. माझा अंदाज असा आहे की, सारे जग झोपेत असताना पडेल!’’ जोराजोरात चष्मा पुसत ते म्हणाले.

‘गेल्या वेळी सारं जग झोपेतून उठत असताना मी शपथ घेतली होती. पुन्हा तसला प्रकार नको!’’ अंगावर शहारे आल्याने माझ्या हातातील चहा बशीत सांडला. नको त्या आठवणी!

‘नै…गेले अठरा महिने या सरकारला बोनसच्या स्वरुपातच मिळाले आहेत!’’ त्यांनी आता उलट्या बाजूने चष्म्याच्या काचा पुसायला घेतल्या.

‘नकोच ते! हे सत्तेला चिपकलेले लोक आहेत. चिपको आंदोलनच ते एकप्रकारचं! ते काही अलग होणार नाहीत!’’ मी कडवटपणाने म्हणालो.

‘नै…इतकं नाराज होण्याचं काही कारण नाही! आपण करु या करेक्ट कार्यक्रम!,’’ त्यांनी धीर दिला. माझ्या घशात हुंदका अडकला होता. काही बोललोच नाही. फक्त नकारार्थी मान हलवली.

…हे सरकार पडलं तरी आता माझा विश्वास बसणार नाही!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT